Tuesday, 9 October 2018

'वेध' एक्सपिरियन्स: सारंग गोसावी आणि यास्मिन यांचे मुद्दे

आजच्या पोस्टमधे, सारंग गोसावी, आणि असीम फाऊंडेशनच्या कार्यकर्त्या यास्मीन, यांनी ‘वेध’च्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, पुणे इथे पार पडलेल्या ८व्या आवर्तनामधे बोललेले मुद्दे, मी माझ्या शब्दांमधे मांडतोये…

‘वेध’ हा भाषणांचा कार्यक्रम असतो. इथं थीमनुसार वक्ते बोलावले जातात आणि ते त्यांच्या करीयरसंबंधी, त्यांच्या कामासंबंधी, प्रेरणादायक अशा गप्पा मारतात. ह्यावेळची थीम होती, “झपाटलेपण ते जाणतेपण”.

ज्यांनी “झपाटलेपणा”ने स्वतःला रूची वाटणा-या विषयात काम सुरू केलं, आणि आता चिकाटीने, “जाणतेपणा”ने त्याच विषयात पुढे वाटचाल करत आहेत, असे वक्ते ह्यावेळच्या ‘वेध’ला आले होते.

हा कार्यक्रम आय. पी. एच. (IPH- Institute for psychological Health) ह्यांचा फ्लॅगशिप प्रोजेक्ट होता. पुण्यात ह्याचं आयोजन एम. सी. दातार क्लासेस, आणि पळशीकर इंस्टिट्यूट, ह्यांनी केलं.

आनंद शिंदे आणि तुषार कुलकर्णी या दोघांच्या सेशननंतर, सारंग गोसावी आणि 'असीम फाऊंडेशन'च्या कार्यकर्त्या यास्मिन, यांचं सेशन सुरू झालं. सारंग गोसावी हे पुण्याचे आहेत. शिक्षणाने ते इंजिनीयर आहेत. सी. ओ. ई. पी. (COEP) मधून त्यांनी इंजिनीयरिंग केलं. २००१ला लेफ्टनंट जनरल पाटणकर हे पुण्याला आले असता, त्यांनी 'तरूणांनी काश्मिरमधे आलं पाहिजे' असं आवाहन दिलं, आणि त्या आवाहनाला साद देत सारंग गोसावी काश्मिरला गेले. त्यांनी काश्मिरला जायच्या आधीचा किस्सा सांगितला. ले. जनरल पाटणकर यांचं भाषण ऐकल्यावर त्यांनी घरी येऊन आईला विचारलं की 'मी काश्मिरला जाऊ का?' आईने सहाजिकच ठामपणे 'नाही' म्हटलं. नाही म्हटल्यावर त्यांनी 'ओके' म्हणून ‘मित्रांसोबत गोव्याला जाऊ का?' म्हणून विचारलं, त्याला संमती मिळाली, आणि मग ते गोव्याला जाण्याऐवजी काश्मिरला गेले...!

तिथे सारंग, ले. जनरल पाटणकर यांना जाऊन भेटले. तिथं त्यांनी सारंग यांना निरनिराळ्या माणसांशी ओळखी करून दिल्या, आणि त्या ओळखींद्वारे सारंग यांनी (त्यांना फक्त कॉम्प्यूटर चांगल्याप्रकारे येत असल्यामुळे) एका पडीक शाळेत कॉम्प्यूटर सेंटर चालू केलं. तिकडच्या माणसांना शिक्षणाचं महत्त्व समजावून दिलं... मग ती शाळा हळू हळू करत वापरात आली. 'ये हमारे बच्चोको सिखा रहा हैं...', अशी सगळ्यांची मानसिकता असल्यामुळे, सगळ्यांना कृतज्ञता असल्यामुळे तिकडच्या माणसांनीही त्यांना खूप पाठिंबा दिला. त्या कॉम्प्यूटर सेंटरमधे शिकता शिकता काश्मिरी तरूणांनी तर स्वतःची छोटी आय. टी. कंपनीही चालू केली!

अतिरेकींचा, आतंकवादींचा कधी त्रास झाला नाही, कारण स्थानिक माणसांचा सारंग यांना पाठिंबा होता. जिथं स्थानिक माणसांचा पाठिंबा असतो, तिथं अतिरेकी काही करू शकत नाहीत, असं सारंग यांनी सांगितलं. मुळात काश्मिरी माणसंच खूप चांगली असतात. स्वागत करणारी असतात. त्यांच्या घरी गेल्यावर ते छान तुमचं स्वागत करतात. तुम्हाला चहा देतात, त्यासोबत फराळ देतात. त्यांच्या घरून निघताना त्यांचं पहिलं वाक्य 'आज ठेहर जाओ...' असं असतं. त्यांच्या अशा वागण्यामुळे त्यांच्याशी पटकन गट्टी झाली, असं सारंग सांगतात. "आम्ही कुठं पार्कमधे कुठलं सेमिनार घेत असलो, तर उत्सुकते पोटी माणसं आजुबाजूला जमायची. अशी माणसं आजुबाजूला असली, तर अतिरेकी काही करू शकत नाहीत." सारंग म्हणतात.

एकदा काश्मिरमधे परिस्थिती पार बिघडली. तरूणांकडून दगडफेक वगैरे होऊ लागली. सारंग यांनी काश्मिरमधे जाऊन तरूणांशी बातचीत केली, तेव्हा तरूणांचं उत्तर साधारण असं होतं की, आमच्याकडे अजुन काही करण्यासारखंच नाही, आम्ही काय करू? तेव्हा सारंग यांनी काश्मिरी लोकांसाठी बेकरीज् सुरू करायच्या ठरवल्या ज्यात काश्मिरी लोक काम करून पैसे मिळवू शकतील. सारंग यांच्या असं लक्षात आलं, की सफरचंद आणि आक्रोड वापरून जर कुकिज बनवले, तर एक चांगलं उत्पादन तयार होऊ शकतं. सफरचंद आणि आक्रोड काश्मिरमधे कधीही कमी पडत नाहीत. मग ह्यावर त्यांनी खूप रिसर्च केला, आणि रेसिपी शोधून काढली. मग या उत्पादनाचा काश्मिरी लोकांना फायदा व्हावा, म्हणून त्यांनी त्यांच्या असीम फाउंडेशन अंतर्गत खूप सा-या जणांना प्रशिक्षण देऊन बेकरीज् चालू केल्या. ह्या बेकरींमधून तयार होणारी बिस्किटं पूर्ण भारतामधे विकली जातात, सारंग म्हणाले.

असीम फाउंडेशनची स्थापना २०१०ला झाली. "असीम हा परिवार आहे." सारंग म्हणतात. "मीच असीममधे सगळ्यात जास्त म्हातारा आहे." असंही ते पुढं म्हणतात. "सध्या मी सगळ्या वाढवलेल्या गोष्टींना मॅनेज करतोये. पण असीमच्या कार्यकर्त्यांनी यात पडू नये असं मला वाटतं. मी जसा पुर्वी सॅक अडकवून निघायचो, तसंच त्यांनी असावं आणि सगळ्यांशी दोस्ती करावी." असं ते म्हणाले.

आर्मी आणि बॉर्डरवरची जनता यांचं नातं दृढ करण्यासाठी सारंग यांनी ‘क्रिकेट प्रिमियर लिग’ सुरू केली! झालं असं की, बॉर्डर लाईनवरची सगळी गावं आर्मीला सपोर्ट करतात. पण एकदा अशाच एका गावाकडून आर्मीवर हल्ला झाला. मग बॉर्डर आणि गावांमधे भिंत घालायचं काम सुरू झालं. हे बघून सारंग यांना वाटलं की हा हल्लाच ह्यासाठी नसेल ना केला? आर्मी आणि जनतेमधला संबंध तोडण्यासाठी? मग ह्यावर विचार सुरू झाला आणि लक्षात आलं की काश्मिरमधला आवडता खेळ क्रिकेट, हे नातं जोडण्यासाठीचा दोर होऊ शकतो. मॅच नीट पार पडायला ग्राऊंड्स लागतात, आणि अशी ग्राऊंड्स काश्मिरमधे फक्त आर्मीचे असतात. ह्या अशा पद्धतीने दर प्रिमीयर लिगला हे नातं दृढच होत चाललं आहे.

यानंतर असीमच्या काश्मिरच्या कार्यकर्त्या यास्मिन यांच्याशी गप्पा सुरू झाल्या. 'असीम'शी जोडल्यावर स्वतःच्या पायावर उभं राहिल्याचा आनंद यास्मिन यांच्या बोलण्यातून दिसत होता. त्या सध्या सायकोलॉजी विषय घेऊन बी. ए. करत आहेत. स्वतःच्या बळावर कॉलेजमधे जायचा तो आनंद, त्यामुळे आलेला आत्मविश्वास, त्यांच्या बोलण्यातून अगदी ठळकपणे दिसत होता. बेकरी चालवून त्यातनं मिळालेल्या पैश्यांनी त्यांनी स्वतः स्वतःच्या कॉलेजसाठीची फी भरली, हे त्यांनी अगदी आत्मविश्वासाने आणि अभिमानाने सांगितलं.

सारंग यांचं एवढं मोठं काम तेही इतक्या लांब राज्यात, जाणून घेऊन अगदी आश्चर्य वाटलं. एकेक प्रोजेक्ट वाढवत त्यांनी असीमचं मोठ काम उभं केलं. काश्मिरी लोकांसाठी एवढ्या 'झपाटल्यापणे' काम करणारा माणूस मी पहिल्यांदा पाहिला. कार्यक्रमात सारंग यांना प्रेरणा ठरलेले ले. ज. पाटणकर ही होते. मग या सगळ्यांच्या समवेत आम्ही सगळ्यांनी राष्ट्रगीत म्हटलं आणि मग शनिवार, २९ सप्टेंबर २०१८चं 'वेध' संपलं.

रविवार, ३० सप्टेंबर २०१८च्या ‘वेध’च्या पहिल्या वक्त्या होत्या शारदा बापट. त्यांच्याबद्दल जाणून घेऊ पुढच्या पोस्टमधे…

No comments:

Post a Comment