Thursday, 18 October 2018

'वेध' एक्सपिरियन्स: अमित गोडसे यांचे मुद्दे

मागच्या पोस्टमधे आपण अमृत देशमुख यांनी ‘वेध’मधे बोललेले मुद्दे वाचले. आता ‘बी-मॅन’ अमित गोडसे यांचे मुद्दे मांडतो आहे…

‘वेध’ हा भाषणांचा कार्यक्रम असतो. प्रत्येक कार्यक्रमाला एक थीम असते. थीमनुसार वक्ते बोलावले जातात आणि ते त्यांच्या करीयरसंबंधी, त्यांच्या कामासंबंधी, प्रेरणादायक अशा गप्पा मारतात. ह्यावेळची थीम होती, “झपाटलेपण ते जाणतेपण”.

ज्यांनी “झपाटलेपणा”ने स्वतःला रूची वाटणा-या विषयात काम सुरू केलं, आणि आता चिकाटीने, “जाणतेपणा”ने त्याच विषयात पुढे वाटचाल करत आहेत, असे वक्ते ह्यावेळच्या ‘वेध’ला आले होते.

हा कार्यक्रम आय. पी. एच. (IPH- Institute for psychological Health) ह्यांचा फ्लॅगशिप प्रोजेक्ट आहे. पुण्यात ह्याचं आयोजन एम. सी. दातार क्लासेस, आणि पळशीकर इंस्टिट्यूट, ह्यांनी केलं…

अमृत देशमुख यांच्या सोबतच 'बी-मॅन'सोबतही गप्पा सुरू झाल्या. त्यांच्या कामाला सुरूवात अशी झाली की, ज्या सोसायटीत ते रहात होते, तिथं एक मधमाश्यांचं पोळं लागलं होतं. कोणालाही ते पोळं नको होतं, त्यामुळं सोसायटी मेंबर्सनी पेस्ट कंट्रोल वाल्यांना बोलवून त्या मधमश्यांना मारून टाकलं. जवळ जवळ दिड लाख मधमाश्यांचा जमिनीवर सडा पडला होता. ही गोष्ट अमित गोडसे यांना खूप खराब वाटली. ह्या घटनेनंतर त्यांनी मधमाश्यांचा आभ्यास सुरू केला. मधमाश्या हाताळायचं प्रशिक्षण घेतलं, आणि मधमाश्यांचं 'पुनर्वसन' करण्याचं काम हाती घेतलं.

मला सगळ्यात जास्त विलक्षण वाटलेली गोष्ट म्हणजे, अमित गोडसे यांचं शरीर मधमाश्यांच्या चावण्याला सरावलं आहे, किंवा असं म्हणू की त्यांची रोगप्रतिकारक शक्ती इतकी वाढली आहे की, त्यांच्यावर मधमाशीच्या चावण्याचा काही परिणाम होत नाही. सुजत नाही, किंवा अजुन काही होत नाही. अजुन एक त्यांनी सांगितलं की, २-३ मधमाश्या चावल्या, तर आपल्या आरोग्यासाठी ते चांगलं असतं. जर १०००-१५०० मधमाश्या चावल्या, तरच आपल्याला ते प्राणघातक ठरू शकतं.

मधमाश्याचं पुनर्वसन अमित कसं करतात? तर ज्यांना मधमाश्या नको आहेत, त्यांच्याकडून ते मधमाश्या काढतात आणि त्यांना एका पेटीत ठेवून, ज्यांना त्या हव्या आहेत, त्यांना ते देतात. आता मधमाश्या कोणाला हव्या असतात? तर मधमाश्या परागीभवन करतात, त्यामुळं शेतक-यांना त्या हव्या असतात, अर्बनफार्मिंग (शहरी-शेती) करणा-यांनाही त्या हव्या असतात.

मधमाश्यांबद्दल आपल्याला खूप कमी माहिती असते. फक्त मध आणि चावणे... येवढीच आपल्याला माहिती असते. पण मधमाश्यांचं जग खूप मोठं असतं. परागीभवन, 'क्रॉस पॉलिनेशन' (म्हणजे एका झाडाचे परागकण दुस-या झाडावर रुजवणे ज्यांमुळे झाडांच्या वेगवेगळ्या जाती निर्माण होतात) अशा खूप सा-या गोष्टींमधे मधमाश्या आपल्याला मदत करतात. आणि अल्बर्ट आईंस्टाईन यांनी म्हटलेलं (किंवा घातलेली भिती) प्रसिद्ध आहेच. 'ज्या दिवशी जगातल्या सगळ्या मधमाश्या संपतील, त्यानंतर ४ वर्षांनी सगळी मानवजाती नष्ट होईल…'

एखादी मामूली वाटणारी गोष्ट किती मोठी असू शकते नाही? मधमाश्या घरात आल्या, की आपण पहिल्यांदा त्या घालवता कशा येतील ते बघतो. पण त्यांचं काम केवढं मोठं असतं! फुलं, फळं, सगळं त्यांच्यामुळेच तर येतं! आणि येवढी मोठी गोष्ट वाचवायचं काम पण मोठंच असणार ना!

अमित गोडसे यांनी 'बी बॅस्केट' नावाची कंपनीही स्थापन केली, ज्यामार्फत ते नैसर्गिक मध ही विकतात. ते आदिवासींना मधमाश्या न मारता मध काढण्याचं प्रशिक्षण देतात. त्याद्वारे ते विदर्भ, छत्तीसगड, वगैरे ठिकाणहून मध गोळा करून ते विकतात.

"सध्या मधमाश्या कमी होत आहेत, तरी आपल्या आजुबाजूच्या दुकानांमधे सर्रास मध दिसत असतं. असं कसं काय?" असा त्यांनी प्रश्न उभा केला आणि वाटलं, खरंच की! आपण असा विचार केलाच नव्हता! ह्यातून आपण किती एकतर्फी, किती वरवर विचार करतो हे कळून येतं. आपल्याल मध हवं असलं, की आपण जातो आणि मध घेऊन येतो. पण आपल्या डोक्यात कधीही विचार येत नाही की, हे मध अस्सल असेल का? एका बाजूला माश्या कमी होत आहे, आणि तरी आपल्याला एवढं सर्रास मध मिळत आहे... विचार करायला लावणारी गोष्ट आहे…

पुढचे वक्ते होते जयदीप पाटिल ज्यांनी स्वतःच्या गावाला ‘विज्ञान गाव’ करून टाकलं. त्यांच्याबद्दल पुढच्या पोस्टमधे…

No comments:

Post a Comment