Sunday, 21 October 2018

'वेध' एक्सपिरियन्स: नेहा सेठ यांचे मुद्दे

जयदीप पाटिल आणि संजय पुजारी यांचं सेशन संपल्यावर नेहा सेठ यांचं सेशन सुरू झालं. यांचं प्रोफेशन म्हणा, किंवा छंद म्हणा, अगदीच वेगळा आहे. त्यांचे काही मुद्दे माझ्या शब्दांमधे…

‘वेध’ हा भाषणांचा कार्यक्रम असतो. प्रत्येक कार्यक्रमाला एक थीम असते. थीमनुसार वक्ते बोलावले जातात आणि ते त्यांच्या करीयरसंबंधी, त्यांच्या कामासंबंधी, प्रेरणादायक अशा गप्पा मारतात. ह्यावेळची थीम होती, “झपाटलेपण ते जाणतेपण”.

ज्यांनी “झपाटलेपणा”ने स्वतःला रूची वाटणा-या विषयात काम सुरू केलं, आणि आता चिकाटीने, “जाणतेपणा”ने त्याच विषयात पुढे वाटचाल करत आहेत, असे वक्ते ह्यावेळच्या ‘वेध’ला आले होते.

हा कार्यक्रम आय. पी. एच. (IPH- Institute for psychological Health) ह्यांचा फ्लॅगशिप प्रोजेक्ट आहे. पुण्यात ह्याचं आयोजन एम. सी. दातार क्लासेस, आणि पळशीकर इंस्टिट्यूट, ह्यांनी केलं…

नेहा सेठ यांच्याशी गप्पा सुरू झाल्या. नेहा सेठ यांचं एकच ध्येय आहे की, संत कबिर, मीराबाई, गोरखनाथ यांच्या तत्त्वांचा प्रसार करायचा. त्यांचा आत्तापर्यंतचा प्रवास लक्ष वेधून घेण्यासारखा आहे.

त्या शिक्षणाने इलेक्ट्रीकल इंजिनीयर आहेत. त्यांनी ११वी, १२वीला सायन्स केलं, पण त्यांना ते करायचंच नव्हतं. त्यांना वेगळं काहीतरी शिकायचं होतं. मग इंजिनीयरिंग केल्यानंतर त्यांनी शिक्षणव्यवस्थेसंबंधी शिक्षण घ्यायला 'टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स' इथं गेल्या. त्यावेळीस त्या मेडिटेशन, स्वतःचा शोध घेणे, हे सर्व करतच होत्या.

टाटा इंस्टिट्युट ऑफ सोशल सायन्समधूम बाहेर पडल्यावर त्या शाळेत शिकवायला ही लागल्या, पण लवकर उठून जाणं, आणि इतर काही कारणांमुळे शाळा सोडून देऊन त्या त्यांच्या भावाचा बिझनेसमधे काम करायला लगल्या. ८ वर्ष त्यांनी तो बिझनेस पक्का पायावर उभा केला.

एकदा त्याच्या आतल्या एका आवाजाने त्यांना विचारलं की, तुला कसं मरण हवं आहे? तर त्या म्हणाल्या की, मला असं मरण हवं आहे, जेव्हा मला वाटेल की मी सगळं केलं, काही करायचं आता बाकी राहिलं नाही. त्या आवाजाने विचारलं की, तु आत्ता जे करत आहेस त्यातून तुला असं वाटेल का? तर त्या म्हणाल्या, नाही, मी आत्ता बिझनेस करत आहे... तर तो आवाज म्हणाला, की ते सोडून दे... तुला पाहिजे ते कर... आणि तिथून पुढे त्यांचा प्रवास कबीर, मिराबाई, गोरखनाथ यासारख्या संतांच्या वाणीकडे सुरू झाला...

त्या राजस्थानमधे लोकसंगीत शिकल्या. तिथूनच त्यांनी तंबोरा बनवून घेतला. अत्यंत आतून, मनापासून गाणं काय असतं, हे त्यांच्या गायनातून कळालं. कबीर यांचे अर्थपुर्ण दोहे, आणि नेहा सेठ यांचं मनापासून गाणं, हे मिश्रण अगदी अप्रतिम होतं. काही ठराविक संतांचीच संतवाणी त्या का गातात? तर त्या म्हणाल्या की विविध मनस्थितीत त्यांना स्वतःला काय सांगायचं आहे, हे त्यांना त्या ठराविक संतांच्या वाणीत सापडलं, म्हणून त्या त्यांच्या मनाला भावलेली संतवाणी गातात.

त्यांनी त्यांच्या ‘आतल्या आवाजा’बद्दल माहिती दिली. “मनापासून केलेल्या मेडिटेशनमुळे, माझ्या मनाने मला सांगितलेलं मला ऐकू येतं.” नेहा सेठ म्हणाल्या. त्यांनी ह्याबद्दल आणखी सविस्तरपणे सांगताना एक प्रसंग सांगितला. एकदा त्या जंगलात गेल्या होत्या. तिथलं सौंदर्य पाहताना त्यांच्या मनात एक विचार आला, की ह्या फूलांचे रंग, आकार, गंध कोण ठरवतं? ह्या सगळ्या नैसर्गिक गोष्टींचे आकार, रंग वगैरे कोण ठरवतं? तर त्यांना असं वाटलं, की एक इंटेलिजन्स असतो, जो सगळ्या गोष्टींचं रंग, रूप, आकार हे सगळं ठरवतं. हा इंटेलिजन्स माणसावरही काम करत असतो. त्यामुळे त्याच्या आकार, रंग, रूप ह्या सगळ्या गोष्टींसोबतच त्याचे विचार, वागणं त्याने काय करावं, काय करू नये, ह्या गोष्टीही तो इंटेलिजन्स ठरवत असतो. त्यामुळं ह्या इंटेलिजन्सने त्यांना सांगितलेलं त्यांनी ऐकलं आणि त्यानुसार त्या वागल्या, असं नेहा सेठ यांनी सांगितलं.

ही माझ्यासाठी अगदी वेगळी विचारसरणी होती. ह्या पद्धतीने मी कधीच विचार केला नव्हता. नेहा सेठ यांच्या सेशनमधून मला बरेच नविन विचार ऐकायला मिळाले. सगळ्यात जास्त मला भावलेली गोष्ट म्हणजे नेहा सेठ यांचा अगदी मनापासून असलेला आवाज. एवढं मनापासून गायलेलं मी पहिल्यांदा ऐकत होतो.

शनिवारच्या आणि रविवारच्या 'वेध'मधून मी एक समान गोष्ट शिकलो, ती म्हणजे काही वेगळं करायचं असेल, स्वतःला रूचलेलं असं काही करायचं असेल, सगळेजण जे करतात त्याच्याहून भन्नाट काही करायच असेल, तर इतरांकडून चेष्टा-मस्करी, निरनिराळे आपल्याला न पटणारे सल्ले येत राहणार. कदाचित अपयश सुद्धा येईल, पण आपण चिकाटीने काम करत राहिलं पाहिजे. प्रयोग करत राहिलं पाहिजे, अनुभवातून शिकून पुढे जात राहिलं पाहिजे, हेच मी पुण्यात पार पडलेल्या ८व्या 'वेध'मधून शिकलो...

No comments:

Post a Comment