या जगात दोन प्रकारची माणसं असतात... (हे दोन प्रकार पण कित्येक प्रकारचे
असतात, तो भाग वेगळा!) एक, जे एका चौकटीत राहून स्वतःचं आयुष्य जगतात.
पु. ल. देशपांडे यांच्या भाषेत बोलायचं झालं तर, ज्यांची नशिबं सरळ
चालतात, असे! रीतसर शाळा, रीतसर मार्क, रीतसर करीयर (इंजिनीयर, डॉक्टर
असे करीयर), रीतसर जॉब, असं सगळं रीतसर चालू असतं. पण सगळं रीतसर चालू
असलं तरी सगळं एकसूरी असतं, आवडीने चाललेलं करीयर नसतं, मनात करायचं
काहीतरी वेगळं असतं.
दुसरा प्रकार असतो, जे स्वतःला पाहिजे ते करतात. स्वतःला रूचलेल्या
वाटेने जातात. चिकाटीने काम करतात. इतरांपेक्षा थोडा वेगळा विचार करतात.
असेच काही वक्ते ह्यावेळच्या पुण्यामधे पार पडलेल्या 'वेध'च्या ८व्या
आवर्तनाला आले होते. त्यातल्या प्रत्येक वक्त्यांचे मला समजलेले काही
मुद्दे मी रोज मांडणार आहे. प्रत्येक पोस्टमधे एका वक्त्याचे काही मुद्दे
असतील.
ही पहिली पोस्ट आहे, आनंद शिंदे यांच्या प्रवासाची…
शनिवार, २९ सप्टेंबरच्या पहिल्या सेशनमधे आनंद शिंदे यांनी अगदी हत्तींचं
जगणं उलगडून दाखवलं. त्यांचं कळपात राहणं, एकमेकांना चिडवणं, एकमेकांशी
बोलणं, त्यांचे आवाज, त्यांचं वागणं, त्यांच्यातले काही सिग्नल, असं सगळं
उलगडून दाखवलं. आनंद शिंदे यांनी हत्तींसोबत घालवलेले काही क्षण त्यांनी
व्हिडियोच्या माध्यमांतून दाखवले. या व्हिडियोंमधून हत्तींचं खेळणं,
त्यांचं लाड करणं, कुरवाळणं, हे सगळं कळालं. त्यांनी बरेच प्रसंग सुद्धा
सांगितले. त्यातले काही प्रसंग अगदी विनोदी, तर काही मनाला चटका लावणारे
होते, विचार करायला लावणारे होते. जसं की त्यांनी एक व्हिडियो दाखवला,
ज्यात एक हत्तीचं पिल्लू जे स्वतःच्या आईपासून वेगळं झालं आहे, ते
आजुबाजूला असणा-या अंधारामुळे गैरसमज होऊन आईचं आचळ शोधत आहे! हा असा
प्रसंग बघितला, आणि खरंच मन दुःखी झालं. किंवा काही विनोदी किस्से ही
होते, जसं की पाय साखळीने बांधलेले असुनही एक हत्ती रस्त्याने चालता
चालता एका माणसाला लाथ मारतो! ते का? तर आनंद शिंदे यांनी सांगितलं की,
"तो माणूस त्या हत्तीच्या वाटेच्या मधून जाण्याचा प्रयत्न करत होता, जे
त्या हत्तीला पटलं नाही. एकदा हत्तींना त्यांची वाट दाखवून दिली, की
त्याच्यामधून कोणीही गेलेलं त्यांना पटत नाही. म्हणून त्या माणसाला हूल
द्यायला, म्हणून त्या हत्तीने त्याला लाथ मारली!" त्यांनी अजुन एक
व्हिडियो दाखवला, ज्यात हत्ती आनंद शिंदे यांचं नाक ओढत होता! "हा हत्ती
मला भेटला, की नेहमी जे काय माझ्याकडे दिसेल ते ओढायचा प्रयत्न करायचा!"
आनंद शिंदे सांगत होते. "माझा कॅमेरा, माझे केस, असं ओढायचं प्रयत्न
करायचा, आणि काही ओढायला मिळालं नाही, तर माझं नाक ओढायचा! आजुबाजूचे
माहूत म्हणायचे, 'तुम्ही त्याच्याशी हत्तींच्या भाषेत बोलता ना, म्हणून
त्याला वाटतं तुम्ही हत्ती आहात! म्हणून तुमचं नाक छोटं कसं, ह्या
विचाराने तो तुमचं नाक ओढून सोंड करायचा प्रयत्न करतो!" असे ते बरेच
किस्से सांगत होते. मला सगळ्यात जास्त व्हिडियो आवडला, तो हत्ती फुटबॉल
खेळतानाचा! "काही हत्तींना खेळायला शिकवावं लागतं, त्यामुळं ह्या हत्तीला
मी फुटबॉल खेळायला शिकवत होतो..." आनंद शिंदे सांगत होते. "हत्तींना माती
खूप लागते, त्यामुळं हा हत्ती सारखं खेळता खेळता बॉल त्याच्यासाठी
बनवलेल्या खड्ड्यात घेऊन जात होता. ह्याने माझे दोन फुटबॉल फोडले होते,
आणि आता हा तिसरा फुटबॉल घेऊन खेळत होता. ह्याला सांगितलं की 'फुटबॉल
फोडू नको हा!' तर तो फुटबॉल लांब फेकून देत होता..." हा व्हिडियो खरंच
मजेदार आणि निरागस होता!
आनंद शिंदे यांनी एक निरिक्षण सांगितलं, "माणसांचं निरिक्षण करून, आणि
हत्तींचं निरिक्षण करून मी एक गोष्ट ठामपणे सांगू शकतो, की बायकाच जास्त
बोलतात...! हत्तींमधे पाय आपटून बोलायची एक पद्धत असते, त्याद्वारे ते ७
कि.मी.पर्यंत संवाद पाठवू शकतात. ही पद्धत वापरून मादी हत्ती जास्त
बोलतात हे मला लक्षात आलं आहे...!" असं ते म्हणाले. यावर आनंद नाडकर्णी,
जे यांच्याशी गप्पा मारत होते, त्यांचं म्हणणं, "या तुमच्या बोलण्यामुळे
आम्हाला हत्ती अधिक जवळचा वाटायला लागला...!"
सर्वसाधारणपणे, आईपासून वेगळं झाल्यानंतर, किंवा कळपापासून वेगळा
झाल्यानंतर हत्ती एक प्रकारच्या निराशेमधे जातात, असं आनंद शिंदे
यांच्याकडून कळालं. असे निराशेमधे आल्यावर ते एकच हालचाल सारखी करत
राहतात, आणि यामुळे ते आणखी निराशेमधे जातात. अशा हत्तींना 'डान्सिंग
एलिफंट' म्हणतात, पण ते अशा वेळी निराशेत असतात. अशा हत्तींना कौन्सेलिंग
करावं लागतं, आणि या निराशेतून बाहेर काढून त्यांना परत पूर्वपदावर आणावं
लागतं. नाहीतर ते नेहमी निराशेत राहून खाणंपिणंही सोडून देतात. आनंद
शिंदे यांनी असाच एक किस्सा सांगितला, ज्यात त्यांनी सांगितलं की एक
हत्तीचं पिल्लू विहिरीत पडलं होतं. त्याला बाहेर काढल्यावर ते इतक्या
निराशेत गेलं होतं की त्याने खाणंपिणं सोडून दिलं. मग त्याच्याशी आनंद
शिंदे यांनी संवाद साधल्यावर त्याने विहिरीतून बाहेर आल्यावर पहिल्यांदा,
आणि खूप दिवसांनी २० लिटर पाणी पिलं.
आनंद शिंदे यांचे असेच काही किस्से आणि व्हिडियो दाखवल्यावर माणूसच फक्त
हुशार आणि भावना असणारा प्राणी आहे हा माझा समज दूर झाला. हत्तींनाही
भावना असतात. तेही हसतात, रडतात, विनोद करतात, विनोदाला उत्तर देतात,
खेळतात. सगळं करतात. आनंद शिंदे यांनी एक फोटो दाखवला, ज्यात त्यांनी
हत्तीच्या सोंडेवर डोळे मिटून डोकं टेकवलं होतं, आणि हत्तीनेही त्याला
मान देत, स्वतःचे डोळे मिटले होते. ह्या फोटोबद्दल सांगताना आनंद शिंदे
म्हणाले, "तुम्ही जर मनापासून त्यांच्याशी बोलला, तुमच्या भावना
एक्सप्रेस केल्या, तर तेही तुम्हाला प्रतिसाद देतात." आणि ते पटतही होतं.
आनंद शिंदे यांच्यासोबत तुषार कुलकर्णी यांच्यासोबतही गप्पा चालू होत्या,
त्यांच्याबद्दल पुढच्या पोस्टमधे…
- शंतनु शिंदे
shantanuspune@gmail.com
Chan mahiti
ReplyDelete