Friday, 12 October 2018

'वेध' एक्सपिरियन्स: शारदा बापट यांचे मुद्दे...

मागच्या सेशनमधे आपण असीम फाउंडेशनचे संस्थापक सारंग गोसावी आणि असीम
फाउंडेशनच्या कार्यकर्त्या यास्मिन, यांचे मुद्दे वाचले. आता रविवार, ३०
सप्टेंबर २०१८ला 'वेध'च्या सगळ्यात पहिल्या वक्त्या शारदा बापट यांचे
मुद्दे माझ्या शब्दांमधे…

'वेध' हा भाषणांचा कार्यक्रम असतो. प्रत्येक कार्यक्रमाला एक थीम असते.
थीमनुसार वक्ते बोलावले जातात आणि ते त्यांच्या करीयरसंबंधी, त्यांच्या
कामासंबंधी, प्रेरणादायक अशा गप्पा मारतात. ह्यावेळची थीम होती,
"झपाटलेपण ते जाणतेपण".

ज्यांनी "झपाटलेपणा"ने स्वतःला रूची वाटणा-या विषयात काम सुरू केलं, आणि
आता चिकाटीने, "जाणतेपणा"ने त्याच विषयात पुढे वाटचाल करत आहेत, असे
वक्ते ह्यावेळच्या 'वेध'ला आले होते.

हा कार्यक्रम आय. पी. एच. (IPH- Institute for psychological Health)
ह्यांचा फ्लॅगशिप प्रोजेक्ट आहे. पुण्यात ह्याचं आयोजन एम. सी. दातार
क्लासेस, आणि पळशीकर इंस्टिट्यूट, ह्यांनी केलं.

रविवारी, सुरूवातीचं सेशन डॉ. शारदा बापट यांचं होतं. त्यांनी फक्त
हौसेपोटी डॉक्टर व्हायचं ठरवलं. त्या एम. बी. बी. एस. (M.B.B.S.) डॉक्टर
झाल्या. त्यांनी आधी 'लॉ'चं शिक्षण घेतलं होत. इलेक्ट्रॉनिक्सचं शिक्षणही
त्यांनी घेतलं होतं. डॉक्टरीच्या पुढील शिक्षणासाठी त्या फिलिपाईन्सला
गेल्या. तिथं डॉक्टरीच्या शिक्षणानंतर करायला लागणारी इंटरशिप करता करता
त्या पायलेटही झाल्या! त्यानंतर त्यांनी पियानो शिकायलाही सुरूवात केली!
केवढी ती क्षेत्रांमधली विविधा!

फिलीपाईन्सला असताना शिक्षणानंतर कराव्या लागणा-या इटर्नशिपमधला त्यांनी
एक किस्सा सांगितला. तिथं चोविस तास ड्यूटी करायची असते असं त्यांनी
सांगितलं. तर, रात्री एक माणूस आला. त्याचं बोट तुटलं होतं. त्या बोटाला
शिवायचं काम त्यांना करायचं होतं. त्यांनी अर्धं शिवलं, पण त्यानंतर
त्यांना, दिवसभर काम केल्यामुळे थकवा जाणवू लागला, अशक्तपणा जाणवू लागला,
आणि त्यांनी ते काम त्यांच्या सिनियरकडे सोपवून दिलं. आता येवढं काम असून
त्या पायलट कशा काय झाल्या?

त्या पायलेट का झाल्या याचं कारण देताना त्या म्हणाल्या, "फिलीपाईन्स हा
बेटांचा देश आहे. तिथं विमानं आणि पायलट यांची सारखी गरज असते. आणि जिथं
आमचं हॉस्पिटल होतं, तिथंच जवळ एक पायलेट स्कूलही होतं. त्यात ब-याच
नव्या गोष्टी शिकवल्या जातात, या आकर्षणाने आणि वेळही हाताशी असल्याने मी
ॲडमिशन घेतलं..."

खरंच, त्यांची कॉन्संट्रेट करण्याची शक्ती, इच्छाशक्ती किती जबरदस्त
असावी, या कल्पनेनेच मला भारी वाटलं. हे सगळं अचंबा करण्यासारखंच होतं.

हे येवढं सगळं कसं काय जमतं? तर त्यांनी एक गोष्ट सांगितली, "स्पष्टपणे
नाही म्हणता आलं पाहिजे. कधी कधी लोकांच्या आपल्याकडून असलेल्या अपेक्षा
वाढतात, तेव्हा आपल्या सोईनुसार 'नाही' म्हणता आलं पाहिजे. तसंच वेळेचं
नियोजनही महत्त्वाचं आहे." खरंच, माझ्यासाठी ही खूपच मोठी प्रेरणा होती.

ह्यानंतरचे वक्ते होते, 'बुकलेट गाय' अमृत देशमुख.. त्यांच्याबद्दल
पुढच्या पोस्टमधे…

No comments:

Post a Comment