Monday, 8 October 2018

'वेध' एक्सपिरियन्स: तुषार कुलकर्णी यांचे मुद्दे

मागच्या पोस्टमधे आपण यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, पुणे इथे पार पडलेल्या ‘वेध’च्या ८व्या आवर्तनामधे आनंद शिंदे यांनी बोललेले मुद्दे वाचले, या पोस्टमधे तुषार कुलकर्णी यांच्याबद्दल… ज्याप्रमाणे आनंद शिंदे हत्तींसाठी काम करतात, त्याचप्रमाणे तुषार कुलकर्णी जिराफांसाठी काम करतात. त्यांनी ‘वेध’मधे सांगितलेली जिराफांविषयीची माहिती माझ्या शब्दांमधे…

‘वेध’ हा भाषणांचा कार्यक्रम असतो. इथं थीमनुसार वक्ते बोलवले जातात आणि ते त्यांच्या करीयरसंबंधी, त्यांच्या कामासंबंधी, प्रेरणादायक अशा गप्पा मारतात. ह्यावेळची थीम होती, “झपाटलेपण ते जाणतेपण”.

ज्यांनी “झपाटलेपणा”ने स्वतःला रूची वाटणा-या विषयात काम सुरू केलं, आणि आता चिकाटीने, “जाणतेपणा”ने त्याच विषयात पुढे वाटचाल करत आहेत, असे वक्ते ह्यावेळच्या ‘वेध’ला आले होते.

हा कार्यक्रम आय. पी. एच. (IPH- Institute for psychological Health) ह्यांचा फ्लॅगशिप प्रोजेक्ट होता. पुण्यात ‘वेध’चं आयोजन एम. सी. दातार क्लासेस, आणि पळशीकर इंस्टिट्यूट, ह्यांनी केलं.

तर, आनंद शिंदे यांच्यासोबत तुषार कुलकर्णी यांच्याशीही गप्पा सुरू झाल्या. त्यांनी युगांडा आणि कलकत्त्यातही जिराफांसाठी काम केलं आहे. ते जिराफकडे वळले ते एका ‘झू’च्या माध्यमातून. त्यांना ह्या प्राण्याविषयी कुतूहल निर्माण झालं आणि त्यांनी इंटरनेटवर जिराफविषयी खूप वाचलं. त्या प्राण्याविषयी माहिती मिळवली. मला पण कुतूहल होतं की, जिराफ हा प्राणी तसा फारसा कोणाच्या बोलण्यात येत नाही. “जी फॉर जिराफ” सांगताना, किंवा “जिराफची मान उंच कशी झाली?” या प्रश्नाचं उत्तर, “उंच झाडावरची पानं खाण्यासाठी जिराफची मान उंच झाली.” असं देतानाच, आपला आणि जिराफचा तसा संबंध येतो. मग त्यांना जिराफविषयी येवढं कुतूहल कसं निर्माण झालं, की त्यांनी जिराफसंबंधी कामच सुरू करून टाकलं? आणि येवढी माहिती पण कशी काय मिळाली? मी लिहिल्याप्रमाणेच, त्यांनी इंटरनेटवरून माहिती मिळवली. मग त्यांनी झूलॉजीसंबंधी अभ्यास करून, युगांडामधे जिराफसंबंधी काम करायला आणि अभ्यास करायला ते गेले. दरम्यान सर्च करून त्यांना असं कळालं होतं की जिराफांच्या संवर्धनासाठी कोणीच काम करत नाही. जिराफांचं अस्तित्व धोक्यात आहे, हे त्यांना कळालं होतं, त्यामुळं आपण जिराफांसाठी काम करायचं, हे ठरलंच होतं.

त्यांनी युगांडामधील आणि कलकत्त्यामधील काही व्हिडियो दाखवले. एकामधे जिराफाला पकडतानाचं शुटिंग होतं. जिराफ नक्की कोणत्या जातीचा आहे हे शोधायला त्याचे रक्ताचे, केसांचे, असे वेगवेगळे नमुने घ्यायला लागतात. त्यासाठी जर तो जिराफ जंगली असेल, तर पकडावा लागतो. अत्यंत नाट्यमय असा तो व्हिडियो होता. "जिराफला पकडण्यासाठी त्याला डार्ट मारला, की तो पळायला लागतो. त्याच्यावर त्या औषधाचा अंमल येण्याआधी तो खूप पळतो, त्यामुळे त्याला दो-यांनी वगैरे जखडून पकडावं लागतं. त्यावर एकदा औषधाचा अंमल आला, की तो आपोआप बेशुद्ध होऊन आडवा होतो." तुषार कुलकर्णींनी सांगितलं. जिराफचं ब्रिडींग करण्यासाठी जात शोधावी लागते, नाहीतर क्रॉसब्रिडींग होतं आणि ते जिराफांसाठी चांगलं नसतं, असं मला एकंदरीत कळालं.

मग त्यांनी जिराफची 'अमेझिंग फॅक्ट्स' म्हणता येईल अशी काही माहिती सांगितली. जिराफ हा जगातला सगळ्यात मोठा प्राणी आहे. जेव्हा ग्रीक लोकांना जिराफचा शोध लागला, तेव्हा त्यांना वाटलं की, हा प्राणी उंट आणि चित्ता या दोन प्राण्यांपासून तयार झाला आहे. त्याला उंटासारखी लांब मान आहे, आणि चित्त्यासारखे अंगावर पॅचेस आहेत. त्यामुळं, जिराफला सायंटिफिक नाव ‘जिराफ्फा कॅमेलोपार्दालिस (Giraffa Camelopardalis) असं पडलं. आपल्या आणि जिराफाच्या मानेत एक साम्य आहे (!) की, आपल्या आणि त्याच्या मानेत सातच मणके आहेत. (!!) फरक इतकाच, की त्याचे मणके मोठे आहेत त्यामुळं त्याची मान मोठी आहे. जिराफची जिभ १९ इंच लांब असते. तो त्याच्या जिभेचा उपयोग झाडावरील पानं खायला करतो. त्याचा जास्तीत जास्त वेळ जिभ बाहर काढून खाण्यात जातो, त्यामुळं त्याच्या जिभेला उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून जिभेचा पुढचा भाग काळा असतो. जिराफ खूप कमी प्रमाणात आवाज काढतात. पुर्वी संशोधकांचा असा समज होता की जिराफांना आवाजच काढता येत नाही, त्यांना स्वरयंत्र नसतं. पण एवढ्यातच असा शोध लागला आहे, की त्यांना आवाज काढता येतो, त्यांना स्वरयंत्र असतं, पण ते खूप क्वचित आवाज काढतात. त्यांच्या अंगावरचे पॅटर्न्स हे युनिक असतात. म्हणजे त्या पॅटर्न्सवरून प्रत्येक जिराफ वेगळा ओळखता येतो. त्याच बरोबर त्यांच्या पॅटर्नचा उपयोग आजुबाजूच्या झाडांमधे वगैरे लपायला खूप होतो. आणि या सगळ्यापेक्षा मला वेगळी आणि विलक्षण वाटलेली गोष्ट म्हणजे आपल्या पिल्लाला जन्म देताना, मादी जिराफ तिचा स्वतःचा जिथे जन्म झाला, तिथेच जाऊन जन्म देते! ह्या मागचं कारण नक्की काय, हे मला माहित नाही, पण इतकी विलक्षण गोष्ट मी कधीच ऐकली नव्हती...!

तर जिराफांच्या जिभेच्या बाबतीतच तुषार कुलकर्णी यांनी एक किस्सा सांगितला. ते जेव्हा युगांडाहून आले, तेव्हा ते कलकत्त्याच्या एका झूमधे एज्युकेटर म्हणून काम करू लागले. म्हणजे जिराफ बघायला आलेल्या माणसांना त्याच्याबद्दलची १० मिनिटं मनोरंजक माहिती देण्याचं काम ते करू लागले. तर त्या दरम्यान ते जेव्हा त्या जिराफांचं निरिक्षण करत होते, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की, जिराफ सारखे भिंत चाटत आहेत... मग त्याचं कारण शोधल्यावर त्यांच्या लक्षात आलं की, जंगलात जिराफ जिभेने पानं खातात, ते सारखी जिभ हालवत असतात, ती त्यांची सततची होणारी हलचाल असते, आणि झूमधे त्यांना तोंडाने पानं खावी लागतात, कारण ती ट्रेमधे दिली जातात. जिभेचा वापर होत नाही. यानं जी गोष्ट ते दिवसातून कितीतरी तास करायचे, ती त्यांना करताच येत नाही. आणि जेव्हा त्यांच्या अशा त-हेने एका मुख्य कृती करण्यावर आडकाठी येते, तेव्हा त्यांना स्ट्रेस येतो, आणि मग ते जे दिसेल त्या गोष्टीवर जिभ घासून, जिभ वापरून आपला स्ट्रेस कमी करायचा प्रयत्न करतात. कलकत्त्याच्या झूमधे असलेल्या जिराफांच्या बाबतीत, त्यांनी भिंत चाटायला सुरूवात केली. मग त्यावर तुषार कुलकर्णी यांनी काढलेला तोडगा असा, की त्यांनी पाण्याच्या २० लि.च्या कॅन्सना बिळं पाडून त्यात पानं वगैरे घातली. त्यामुळे जिराफांना त्यांच्या जिभेचा वापर करता आला. ते त्या बिळातून जिभ आत घालून पानं खायला लागले. त्यामुळे जे अन्न खायला त्यांना १५ मिनिटं लागत होती, त्याला एक-दिड तास लागू लागला. त्यांचा जास्तीत जास्त वेळ यात जाऊ लागला. याला ते ‘एन्रिचमेंट प्रोजेक्ट’ म्हणतात.

जिराफांच्या मानसिकतेबाबत बोलताना तुषार कुलकर्णी म्हणाले की, "जिराफ कधीही आकारावरून ताकदीचा अंदाज लावत नाहीत, जे आपल्याला इतर प्राण्यांच्या बाबतीत सहज आढळून येतं. ते खूप जेंटल असतात." ते असंही म्हणाले की, "आकाशाला भिडून पाय जमिनीवर ठेवणं, मी जिराफांकडून शिकलो."

खरंच, प्राण्यांकडून इतकं शिकता येऊ शकतं, हे मला ह्या सेशनमधून कळालं.

याच्या पुढचं सेशन, ‘असीम फाऊंडेशन’चे संस्थापक सारंग गोसावी आणि असीम फाउंडेशनच्या कार्यकर्त्या यास्मिन, यांचं होतं. ते पुढच्या पोस्टमधे…

No comments:

Post a Comment