Tuesday, 16 October 2018

'वेध' एक्सपिरियन्स: अमृत देशमुख यांचे मुद्दे

रविवार, ३० सप्टेंबर २०१८च्या ‘वेध’मधे शारदा बापट यांच्यानंतर सेशन होतं, 'बूक ॲन्ड बीज्'… 'बूकलेट गाय' (Booklet Guy) अर्थात अमृत देशमुख, आणि 'बी-मॅन' अमित गोडसे या दोघांशी या सेशनमधे गप्पा झाल्या. या पोस्टमधे अमृत देशमुख यांचे मुद्दे माझ्या शब्दांमधे…

‘वेध’ हा भाषणांचा कार्यक्रम असतो. प्रत्येक कार्यक्रमाला एक थीम असते. थीमनुसार वक्ते बोलावले जातात आणि ते त्यांच्या करीयरसंबंधी, त्यांच्या कामासंबंधी, प्रेरणादायक अशा गप्पा मारतात. ह्यावेळची थीम होती, “झपाटलेपण ते जाणतेपण”.

ज्यांनी “झपाटलेपणा”ने स्वतःला रूची वाटणा-या विषयात काम सुरू केलं, आणि आता चिकाटीने, “जाणतेपणा”ने त्याच विषयात पुढे वाटचाल करत आहेत, असे वक्ते ह्यावेळच्या ‘वेध’ला आले होते.

हा कार्यक्रम आय. पी. एच. (IPH- Institute for psychological Health) ह्यांचा फ्लॅगशिप प्रोजेक्ट आहे. पुण्यात ह्याचं आयोजन एम. सी. दातार क्लासेस, आणि पळशीकर इंस्टिट्यूट, ह्यांनी केलं…

अमृत देशमुख हे त्यांच्या भावामुळे वाचायला लागले. "माझा भाऊ माझ्या वाढदिवसाला सगळ्यांना सांगायचा की, बक्षिस म्हणून काही आणायचं नाही, आणि आणलंच तर फक्त पुस्तकं आणायची! यामुळं माझ्यावर पुस्तकांचा सतत मारा व्हायचा. पण त्यावेळी मला भावाचा राग यायचा." अमृत देशमुख सांगत होते. "मग मी एकदा माझा 'फेक' वाढदिवस साजरा केला, आणि त्याद्वारे ४ खेळणी मिळवली!" हे सगळं नवलच होतं!

अमृत देशमुख यांचं 'बूकलेट' नावाचं ॲप आहे. त्याद्वारे ते पुस्तकांचा सारांश रेकॉर्ड करून टाकतात. त्यांच्या आत्ताच्या स्थितीपर्यंतचा प्रवास खूपच इंट्रेस्टिंग होता.

त्यांना पहिल्यांदा तीन स्टार्ट-अप्समधे फेल्यूअर आलं होतं. ते निराशेत होते. तेव्हा एकदा त्यांना एका मित्राचा फोन आला, की चल पिक्चर बघायला जाऊ. ते गेले. पंधरा मिनिटं आधी थेटरवर पोचले. तर त्या काळात अमृत देशमुख एक पुस्तक वाचत होते, आणि त्या पुस्तकाचा सारांश त्यांनी बसल्या बसल्या त्या मित्राला एकदम एका झटक्यात सांगितला. त्यावर खूश होऊन तो मित्र त्यांना म्हणाला की, “तुझ्या वाचनाचा मला फायदा झाला की!” हे अमृत यांना अगदी पटलं, आणि त्यांनी घरी येऊन असे सारांश लिहून व्हाट्स ॲपद्वारे पाठवायला सुरूवात केली. ब-याच जणांनी अमृत यांना सबस्क्राईब केलं होतं.

एकदा, अमृत यांनी व्हाट्स ॲपवरून एक सर्वे केला. त्यातनं त्यांच्या लक्षात आलं की, ज्यांना ज्यांना ते पुस्तकांचा सारांश लिहून पाठवतात, त्यांपैकी ८० टक्के लोक ते वाचतच नाहीत! त्यांची कारणं खूप असतात, पण तरी यामुळे अमृत यांना खूप वाईट वाटलं. त्या काळात त्यांनी कुठल्यातरी पुस्तकात वाचलं होतं की, ज्या माणसांसाठी तुम्ही काम करताय, त्यांची लाईफस्टाईल एकदा जगून बघा. मग अमृत देशमुख एका लोकल ट्रेनमधे बसले. तिथं त्यांच्या लक्षात आलं, की बरेच जण कानात हेडफोन्स घालून काहीतरी ऐकत असतात. मग ते घरी जाताना एक मायक्रोफोन घेऊन गेले, आणि रेकॉर्डिंग करायला लागले. पहिलं रेकॉर्डिंग खूप रटाळ झालं होतं, असं तेच सांगतात. मग त्यांनी स्टोरीटेलिंगचं प्रशिक्षण घेतलं, ऑडियो एडिटिंगचं सॉफ्टवेअर विकत घेतलं, आणि मग सगळे ऑडियो एडिट करून वॉट्स ॲपवर टाकायला लागले.

त्यांना वॉट्स ॲपने एकदा बॅनही केलं. वॉट्स ॲपचा असा समज झाला की हे खूप मेसेज पाठवून स्पॅमींग करत आहेत. मग त्यांच्या मित्राने त्यांना एक छान ॲप बनवून दिलं. त्याचंच नाव 'बूकलेट'.

सा-या प्रकारच्या पुस्तकांचे सारांश या ॲपवर ऑडियो स्वरूपात असतात. "फिक्शन, स्टोरिज्, अशा प्रकारची पुस्तकं ऐकायला सगळ्यांना आवडतं, म्हणून मी पुस्तकांचे सारांश टाकताना त्यातले ८० टक्के सारांश एज्यूकेशल टाकतो, आणि २० टक्के फिक्शन, स्टोरिज्, एन्टरटेंमेंट असे सारांश टाकतो."

हे प्रोफेशन माझ्यासाठी खूपच विलक्षण, वेगळं होतं. मला स्वतःला पुस्तक वाचायला खूप आवडतं. त्यामुळे ते ह्या प्रोफेशनमधे किती बुडाले असतील हे मला समजू शकतं.

खरंच, भारी वाटलं…!

पुढचे वक्ते ‘बी-मॅन’ अमित गोडसे यांचे मुद्दे पुढच्या पोस्टमधे...

No comments:

Post a Comment