Saturday, 20 October 2018

'वेध' एक्सपिरियन्स: संजय पुजारी यांचे मुद्दे

‘वेध’मधे जयदीप पाटिल यांच्यासोबत संजय पुजारी यांच्याशीही गप्पा सुरू झाल्या. या पोस्टमधे संजय पुजारी यांचे मुद्दे मांडतो…

‘वेध’ हा भाषणांचा कार्यक्रम असतो. प्रत्येक कार्यक्रमाला एक थीम असते. थीमनुसार वक्ते बोलावले जातात आणि ते त्यांच्या करीयरसंबंधी, त्यांच्या कामासंबंधी, प्रेरणादायक अशा गप्पा मारतात. ह्यावेळची थीम होती, “झपाटलेपण ते जाणतेपण”.

ज्यांनी “झपाटलेपणा”ने स्वतःला रूची वाटणा-या विषयात काम सुरू केलं, आणि आता चिकाटीने, “जाणतेपणा”ने त्याच विषयात पुढे वाटचाल करत आहेत, असे वक्ते ह्यावेळच्या ‘वेध’ला आले होते.

हा कार्यक्रम आय. पी. एच. (IPH- Institute for psychological Health) ह्यांचा फ्लॅगशिप प्रोजेक्ट आहे. पुण्यात ह्याचं आयोजन एम. सी. दातार क्लासेस, आणि पळशीकर इंस्टिट्यूट, ह्यांनी केलं…

संजय पुजारींसोबत गप्पा सुरू झाल्या. त्यांचा कुठलीही थेअरी, किंवा कुठलाही प्रयोग सोपा करून समजावून सांगण्यात हातखंडा आहे. लहानपणी दिवाळीचा किल्ला करताना त्यावर विज आणण्यासाठी ते खूप कष्ट घ्यायचे. छोटे छोटे खांब, त्यावर वायर्स, दिवे, ते लागावे म्हणून जनरेटरने विज तयार करणे असं सगळं ते दरवर्षी करायचे. गणपतीचे देखावे करायचे. त्यात विज्ञानाचा वापर करून विलक्षण असे देखावे ते उभारायचे. त्यांना विज्ञानात खूप आवड होती. त्यांचे आई-बाबा दोघंही शिक्षक होते.

विज्ञानाचा प्रसार व्हावा, म्हणून त्यांनी कल्पना चावला विज्ञान केंद्र उभारलं आहे. त्यांनी त्यात २००पेक्षा जास्त वैज्ञानिक प्रयोग हाताळायला ठेवले आहेत. ह्या विज्ञान केंद्राला नाव देतानाचा किस्सा त्यांनी सांगितला. संजय पुजारींना विज्ञान केंद्राला नाव 'कल्पना चावला विज्ञान केंद्र’ असंच द्यायचं होतं, पण त्यासाठी कल्पना चावला यांच्या आई-वडिलांची परवानगी हवी होती. त्यासाठी ते त्यांच्या घरी गेले, त्यांना स्वतःचं काम समजावून दिलं. ते विज्ञान कशाप्रकारे सोपं करून सांगतात, त्यासाठी त्यांनी कसे स्पेसशिप, स्पेस शटल, सॅटालाईट, यांचे मॉडेल्स कसे बनवले आहेत, हे सगळं सांगितलं, आणि मग त्यांना कशा प्रकारचं विज्ञान केंद्र उभारायचं आहे हे सांगून त्यासाठी कल्पना चावला यांचं नाव हवं आहे संजय पुजारी यांनी सांगितलं. कल्पना चावला यांच्या वडिलांनी सांगितलं की मी आतापर्यंत कधीही कोणालाच कल्पना चावला यांचं नाव वापरायला परवानगी नाही दिली, पण तुम्हाला ती परवानगी देत आहे. त्यांनी ती परवानगी दिली, आणि मग विज्ञान केंद्राचं नाव त्यांनी दिलं, 'कल्पना चावला विज्ञान केंद्र'.

ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्याशी झालेल्या भेटीबद्दल सांगताना ते अगदी गहिवरतात. अगदी गर्दीतनं जाऊन ते त्यांना भेटले. त्यांनी ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना सांगितलं की, ते शिक्षक आहेत आणि विज्ञानाचा प्रसार करतात, आणि वचन दिलं की, तुम्ही जी मिसाईल्स बनवायची टेकनिक तयार केली, ती मी सगळ्यांना सोपी करून समजावून देईन... हे सगळं सांगताना ते अगदी गहिवरले होते.

संजय पुजारी यांनी मॉडेल्सद्वारे विज्ञान कसं समजावता येतं, ह्याची एक झलक दाखवली. त्यांनी एक 'स्पेस शटल'चं मॉडेल आणलं होतं. त्याद्वारे स्पेस शटल अंतराळात कसं जातं, हे त्यांनी सांगितलं. अंतराळात जाण्यासाठी लागणा-या वेलॉसिटीबद्दल त्यांनी सांगितलं. स्पेस शटलचे विविध भाग कसे परत वापरता येतात, हे पण त्यांनी समजावून दिलं. जी गोष्ट समजायला खूप अभ्यास करावा लागणार होता, खूप वाचावं लागणार होतं, कॅल्क्युलेशन्स करावी लागणार होती, ते त्यांनी एका मॉडेलद्वारे अगदी सोपं करून सांगितलं. आणि तेही काही मिनिटात! ही समजावून सांगायची पद्धत मला खूप आवडली.

जयदीप पाटिल आणि संजय पुजारी ह्या दोघांच्या विज्ञानाच्या प्रसाराबद्दल चाललेलं काम बघून संघर्ष काय असतो, हे मला कळालं. जयदीप पाटिल ही शिक्षक असून त्यांनी त्यांच्या गावाचं रूपांतर ‘विज्ञान गावा’त केलं. दोघांनीही आपापल्या गावांमधे, जिथे विज्ञानाचा प्रसार करायचा किंवा गावातल्या लोकांनी वैज्ञानिक दृष्टिकोन ठेऊन वागण्याचा फारसा संबंध येत नाही, तिथे विज्ञानाचा यशस्वीपणे प्रसार केला. त्याचं महत्त्वं समजावून दिलं. त्यांनाही वाईट अनुभव आले असतील काम करताना, पण ते थांबले नाहीत. ते काम करत राहिले, आणि अजुनही करत आहेत!

ह्या नंतरचं सेशन होतं, नेहा सेठ ह्यांचं. जाणून घेऊयात त्यांचे मुद्दे पुढच्या पोस्टमधे…

No comments:

Post a Comment