Friday, 26 October 2018

My Experience In Katraj Dairy

I am Shantanu and I am sharing my experience of visiting Katraj Dairy’s processing plant. Here are some highlights.

It was a great exposure to have a look at the milk and other milk products’ plant. First, we were shown a documentary which gave information about how milk is collected, how its quality is checked, how it is processed and all steps till its packaging and dispatching in market. It was really amusing to listen, that the company which used to collect “only” 30,000 liters of milk a day now collects 2.5 lakhs liters of milk a day! Imagination of such quantity of milk was beyond capacity of my brain!

The documentary also showed the fridge which chills the milk by some -4 degree Celsius. It also showed the pasteurization plant. (We also saw it in visit of plant.)

In plant, there was a passage from which we were led to have a look. At first we saw a section of cleaning milk transportation crates. The crates enter a machine which cleans them and then crates get ready for further work. In another section, packing of ghee takes place. Beside it, there was section of ghee production.

We saw the printer of printing MRP, Batch number, and other things on labels. Looking it carefully, we pointed out that the printer was not touching the labels. As we asked about it, our guide said that this is laser printer and it prints without touching the labels. Just a person has to keep labels on a conveyer and the printer does its work automatically!

Then we saw flavored milk production and packing section. Beside it, there was ice cream section but there was no entry so we only had a glance over there and leaved.

We saw milk packaging. In plant, we were not able to get a chance to saw it very clearly, but in documentary, we saw it. The packing material is fed to the machine. The milk or any other product is made to flow in a specific proportion through that material and the machine seals it to specific length from both sides making them separate bags.

Then we were led to a gallery which was above plant of the homogenizing milk and beside pasteurization plant. Homogenizing milk means to mix all milk together and equalize fat content, water content, and other contents of milk to certain level. It is an important stage while processing because all milk is collected from various villages and there is even difference between milk of two cows. So to control quality and contents of it is important to homogenize milk.

After the homogenization is done, milk goes for pasteurization. This increases the life of milk. In the containers, milk is boiled to the certain temperature and immediately chilled to the certain temperature. This kills unwanted bacteria and increases the life of milk.

After that, we were led out of plant and then given ice cream! We saw how the label was printed, how ice cream is packed and eat it observing!

Sunday, 21 October 2018

'वेध' एक्सपिरियन्स: नेहा सेठ यांचे मुद्दे

जयदीप पाटिल आणि संजय पुजारी यांचं सेशन संपल्यावर नेहा सेठ यांचं सेशन सुरू झालं. यांचं प्रोफेशन म्हणा, किंवा छंद म्हणा, अगदीच वेगळा आहे. त्यांचे काही मुद्दे माझ्या शब्दांमधे…

‘वेध’ हा भाषणांचा कार्यक्रम असतो. प्रत्येक कार्यक्रमाला एक थीम असते. थीमनुसार वक्ते बोलावले जातात आणि ते त्यांच्या करीयरसंबंधी, त्यांच्या कामासंबंधी, प्रेरणादायक अशा गप्पा मारतात. ह्यावेळची थीम होती, “झपाटलेपण ते जाणतेपण”.

ज्यांनी “झपाटलेपणा”ने स्वतःला रूची वाटणा-या विषयात काम सुरू केलं, आणि आता चिकाटीने, “जाणतेपणा”ने त्याच विषयात पुढे वाटचाल करत आहेत, असे वक्ते ह्यावेळच्या ‘वेध’ला आले होते.

हा कार्यक्रम आय. पी. एच. (IPH- Institute for psychological Health) ह्यांचा फ्लॅगशिप प्रोजेक्ट आहे. पुण्यात ह्याचं आयोजन एम. सी. दातार क्लासेस, आणि पळशीकर इंस्टिट्यूट, ह्यांनी केलं…

नेहा सेठ यांच्याशी गप्पा सुरू झाल्या. नेहा सेठ यांचं एकच ध्येय आहे की, संत कबिर, मीराबाई, गोरखनाथ यांच्या तत्त्वांचा प्रसार करायचा. त्यांचा आत्तापर्यंतचा प्रवास लक्ष वेधून घेण्यासारखा आहे.

त्या शिक्षणाने इलेक्ट्रीकल इंजिनीयर आहेत. त्यांनी ११वी, १२वीला सायन्स केलं, पण त्यांना ते करायचंच नव्हतं. त्यांना वेगळं काहीतरी शिकायचं होतं. मग इंजिनीयरिंग केल्यानंतर त्यांनी शिक्षणव्यवस्थेसंबंधी शिक्षण घ्यायला 'टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स' इथं गेल्या. त्यावेळीस त्या मेडिटेशन, स्वतःचा शोध घेणे, हे सर्व करतच होत्या.

टाटा इंस्टिट्युट ऑफ सोशल सायन्समधूम बाहेर पडल्यावर त्या शाळेत शिकवायला ही लागल्या, पण लवकर उठून जाणं, आणि इतर काही कारणांमुळे शाळा सोडून देऊन त्या त्यांच्या भावाचा बिझनेसमधे काम करायला लगल्या. ८ वर्ष त्यांनी तो बिझनेस पक्का पायावर उभा केला.

एकदा त्याच्या आतल्या एका आवाजाने त्यांना विचारलं की, तुला कसं मरण हवं आहे? तर त्या म्हणाल्या की, मला असं मरण हवं आहे, जेव्हा मला वाटेल की मी सगळं केलं, काही करायचं आता बाकी राहिलं नाही. त्या आवाजाने विचारलं की, तु आत्ता जे करत आहेस त्यातून तुला असं वाटेल का? तर त्या म्हणाल्या, नाही, मी आत्ता बिझनेस करत आहे... तर तो आवाज म्हणाला, की ते सोडून दे... तुला पाहिजे ते कर... आणि तिथून पुढे त्यांचा प्रवास कबीर, मिराबाई, गोरखनाथ यासारख्या संतांच्या वाणीकडे सुरू झाला...

त्या राजस्थानमधे लोकसंगीत शिकल्या. तिथूनच त्यांनी तंबोरा बनवून घेतला. अत्यंत आतून, मनापासून गाणं काय असतं, हे त्यांच्या गायनातून कळालं. कबीर यांचे अर्थपुर्ण दोहे, आणि नेहा सेठ यांचं मनापासून गाणं, हे मिश्रण अगदी अप्रतिम होतं. काही ठराविक संतांचीच संतवाणी त्या का गातात? तर त्या म्हणाल्या की विविध मनस्थितीत त्यांना स्वतःला काय सांगायचं आहे, हे त्यांना त्या ठराविक संतांच्या वाणीत सापडलं, म्हणून त्या त्यांच्या मनाला भावलेली संतवाणी गातात.

त्यांनी त्यांच्या ‘आतल्या आवाजा’बद्दल माहिती दिली. “मनापासून केलेल्या मेडिटेशनमुळे, माझ्या मनाने मला सांगितलेलं मला ऐकू येतं.” नेहा सेठ म्हणाल्या. त्यांनी ह्याबद्दल आणखी सविस्तरपणे सांगताना एक प्रसंग सांगितला. एकदा त्या जंगलात गेल्या होत्या. तिथलं सौंदर्य पाहताना त्यांच्या मनात एक विचार आला, की ह्या फूलांचे रंग, आकार, गंध कोण ठरवतं? ह्या सगळ्या नैसर्गिक गोष्टींचे आकार, रंग वगैरे कोण ठरवतं? तर त्यांना असं वाटलं, की एक इंटेलिजन्स असतो, जो सगळ्या गोष्टींचं रंग, रूप, आकार हे सगळं ठरवतं. हा इंटेलिजन्स माणसावरही काम करत असतो. त्यामुळे त्याच्या आकार, रंग, रूप ह्या सगळ्या गोष्टींसोबतच त्याचे विचार, वागणं त्याने काय करावं, काय करू नये, ह्या गोष्टीही तो इंटेलिजन्स ठरवत असतो. त्यामुळं ह्या इंटेलिजन्सने त्यांना सांगितलेलं त्यांनी ऐकलं आणि त्यानुसार त्या वागल्या, असं नेहा सेठ यांनी सांगितलं.

ही माझ्यासाठी अगदी वेगळी विचारसरणी होती. ह्या पद्धतीने मी कधीच विचार केला नव्हता. नेहा सेठ यांच्या सेशनमधून मला बरेच नविन विचार ऐकायला मिळाले. सगळ्यात जास्त मला भावलेली गोष्ट म्हणजे नेहा सेठ यांचा अगदी मनापासून असलेला आवाज. एवढं मनापासून गायलेलं मी पहिल्यांदा ऐकत होतो.

शनिवारच्या आणि रविवारच्या 'वेध'मधून मी एक समान गोष्ट शिकलो, ती म्हणजे काही वेगळं करायचं असेल, स्वतःला रूचलेलं असं काही करायचं असेल, सगळेजण जे करतात त्याच्याहून भन्नाट काही करायच असेल, तर इतरांकडून चेष्टा-मस्करी, निरनिराळे आपल्याला न पटणारे सल्ले येत राहणार. कदाचित अपयश सुद्धा येईल, पण आपण चिकाटीने काम करत राहिलं पाहिजे. प्रयोग करत राहिलं पाहिजे, अनुभवातून शिकून पुढे जात राहिलं पाहिजे, हेच मी पुण्यात पार पडलेल्या ८व्या 'वेध'मधून शिकलो...

Saturday, 20 October 2018

'वेध' एक्सपिरियन्स: संजय पुजारी यांचे मुद्दे

‘वेध’मधे जयदीप पाटिल यांच्यासोबत संजय पुजारी यांच्याशीही गप्पा सुरू झाल्या. या पोस्टमधे संजय पुजारी यांचे मुद्दे मांडतो…

‘वेध’ हा भाषणांचा कार्यक्रम असतो. प्रत्येक कार्यक्रमाला एक थीम असते. थीमनुसार वक्ते बोलावले जातात आणि ते त्यांच्या करीयरसंबंधी, त्यांच्या कामासंबंधी, प्रेरणादायक अशा गप्पा मारतात. ह्यावेळची थीम होती, “झपाटलेपण ते जाणतेपण”.

ज्यांनी “झपाटलेपणा”ने स्वतःला रूची वाटणा-या विषयात काम सुरू केलं, आणि आता चिकाटीने, “जाणतेपणा”ने त्याच विषयात पुढे वाटचाल करत आहेत, असे वक्ते ह्यावेळच्या ‘वेध’ला आले होते.

हा कार्यक्रम आय. पी. एच. (IPH- Institute for psychological Health) ह्यांचा फ्लॅगशिप प्रोजेक्ट आहे. पुण्यात ह्याचं आयोजन एम. सी. दातार क्लासेस, आणि पळशीकर इंस्टिट्यूट, ह्यांनी केलं…

संजय पुजारींसोबत गप्पा सुरू झाल्या. त्यांचा कुठलीही थेअरी, किंवा कुठलाही प्रयोग सोपा करून समजावून सांगण्यात हातखंडा आहे. लहानपणी दिवाळीचा किल्ला करताना त्यावर विज आणण्यासाठी ते खूप कष्ट घ्यायचे. छोटे छोटे खांब, त्यावर वायर्स, दिवे, ते लागावे म्हणून जनरेटरने विज तयार करणे असं सगळं ते दरवर्षी करायचे. गणपतीचे देखावे करायचे. त्यात विज्ञानाचा वापर करून विलक्षण असे देखावे ते उभारायचे. त्यांना विज्ञानात खूप आवड होती. त्यांचे आई-बाबा दोघंही शिक्षक होते.

विज्ञानाचा प्रसार व्हावा, म्हणून त्यांनी कल्पना चावला विज्ञान केंद्र उभारलं आहे. त्यांनी त्यात २००पेक्षा जास्त वैज्ञानिक प्रयोग हाताळायला ठेवले आहेत. ह्या विज्ञान केंद्राला नाव देतानाचा किस्सा त्यांनी सांगितला. संजय पुजारींना विज्ञान केंद्राला नाव 'कल्पना चावला विज्ञान केंद्र’ असंच द्यायचं होतं, पण त्यासाठी कल्पना चावला यांच्या आई-वडिलांची परवानगी हवी होती. त्यासाठी ते त्यांच्या घरी गेले, त्यांना स्वतःचं काम समजावून दिलं. ते विज्ञान कशाप्रकारे सोपं करून सांगतात, त्यासाठी त्यांनी कसे स्पेसशिप, स्पेस शटल, सॅटालाईट, यांचे मॉडेल्स कसे बनवले आहेत, हे सगळं सांगितलं, आणि मग त्यांना कशा प्रकारचं विज्ञान केंद्र उभारायचं आहे हे सांगून त्यासाठी कल्पना चावला यांचं नाव हवं आहे संजय पुजारी यांनी सांगितलं. कल्पना चावला यांच्या वडिलांनी सांगितलं की मी आतापर्यंत कधीही कोणालाच कल्पना चावला यांचं नाव वापरायला परवानगी नाही दिली, पण तुम्हाला ती परवानगी देत आहे. त्यांनी ती परवानगी दिली, आणि मग विज्ञान केंद्राचं नाव त्यांनी दिलं, 'कल्पना चावला विज्ञान केंद्र'.

ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्याशी झालेल्या भेटीबद्दल सांगताना ते अगदी गहिवरतात. अगदी गर्दीतनं जाऊन ते त्यांना भेटले. त्यांनी ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना सांगितलं की, ते शिक्षक आहेत आणि विज्ञानाचा प्रसार करतात, आणि वचन दिलं की, तुम्ही जी मिसाईल्स बनवायची टेकनिक तयार केली, ती मी सगळ्यांना सोपी करून समजावून देईन... हे सगळं सांगताना ते अगदी गहिवरले होते.

संजय पुजारी यांनी मॉडेल्सद्वारे विज्ञान कसं समजावता येतं, ह्याची एक झलक दाखवली. त्यांनी एक 'स्पेस शटल'चं मॉडेल आणलं होतं. त्याद्वारे स्पेस शटल अंतराळात कसं जातं, हे त्यांनी सांगितलं. अंतराळात जाण्यासाठी लागणा-या वेलॉसिटीबद्दल त्यांनी सांगितलं. स्पेस शटलचे विविध भाग कसे परत वापरता येतात, हे पण त्यांनी समजावून दिलं. जी गोष्ट समजायला खूप अभ्यास करावा लागणार होता, खूप वाचावं लागणार होतं, कॅल्क्युलेशन्स करावी लागणार होती, ते त्यांनी एका मॉडेलद्वारे अगदी सोपं करून सांगितलं. आणि तेही काही मिनिटात! ही समजावून सांगायची पद्धत मला खूप आवडली.

जयदीप पाटिल आणि संजय पुजारी ह्या दोघांच्या विज्ञानाच्या प्रसाराबद्दल चाललेलं काम बघून संघर्ष काय असतो, हे मला कळालं. जयदीप पाटिल ही शिक्षक असून त्यांनी त्यांच्या गावाचं रूपांतर ‘विज्ञान गावा’त केलं. दोघांनीही आपापल्या गावांमधे, जिथे विज्ञानाचा प्रसार करायचा किंवा गावातल्या लोकांनी वैज्ञानिक दृष्टिकोन ठेऊन वागण्याचा फारसा संबंध येत नाही, तिथे विज्ञानाचा यशस्वीपणे प्रसार केला. त्याचं महत्त्वं समजावून दिलं. त्यांनाही वाईट अनुभव आले असतील काम करताना, पण ते थांबले नाहीत. ते काम करत राहिले, आणि अजुनही करत आहेत!

ह्या नंतरचं सेशन होतं, नेहा सेठ ह्यांचं. जाणून घेऊयात त्यांचे मुद्दे पुढच्या पोस्टमधे…

Friday, 19 October 2018

'वेध' एक्सपिरियन्स: जयदीप पाटिल यांचे मुद्दे

अमृत देशमुख आणि अमित गोडसे यांच्या ‘वेध’च्या सेशननंतर जयदीप पाटील आणि संजय पुजारी यांचं सेशन होतं. दोघंही शिक्षक आहेत. पहिल्यांदा जयदीप पाटिल यांच्याशी गप्पा सुरू झाल्या….

‘वेध’ हा भाषणांचा कार्यक्रम असतो. इथं थीमनुसार वक्ते बोलावले जातात आणि ते त्यांच्या करीयरसंबंधी, त्यांच्या कामासंबंधी, प्रेरणादायक अशा गप्पा मारतात. ह्यावेळची थीम होती, “झपाटलेपण ते जाणतेपण”.

ज्यांनी “झपाटलेपणा”ने स्वतःला रूची वाटणा-या विषयात काम सुरू केलं, आणि आता चिकाटीने, “जाणतेपणा”ने त्याच विषयात पुढे वाटचाल करत आहेत, असे वक्ते ह्यावेळच्या ‘वेध’ला आले होते.

हा कार्यक्रम आय. पी. एच. (IPH- Institute for psychological Health) ह्यांचा फ्लॅगशिप प्रोजेक्ट होता. पुण्यात ह्याचं आयोजन एम. सी. दातार क्लासेस, आणि पळशीकर इंस्टिट्यूट, ह्यांनी केलं. 

जयदीप पाटील हे जळगावातल्या 'कल्याणहोळ' गावचे. त्यांनी लहानपणीपासूनच त्यांच्या गावात जादूटोणा, कर्मकांड, असं सगळं बघितलं. त्यांची आई खूप श्रद्धाळू होती. पण तरी जयदीप यांना विज्ञानाची आवड होती. त्यांच्या घरी टि.व्ही नव्हता, फ्रिज नव्हता, तरी ‘टि.व्ही कसा चालतो’, किंवा ‘फ्रिज कसा चालतो’ ह्याची माहिती करून घेऊन त्यांनी त्या गोष्टींची उणीव भरून काढली होती. हळू हळू करत त्यांची विज्ञानाची आवड वाढत गेली. त्यांचं स्वप्न होतं, एक कृतिशील शिक्षक बनायचं. त्यांनी ते पुर्ण केलं. त्यांनी त्यांच्या शाळेची सहल एकदा ‘इस्रो’ (ISRO)ला नेली! जादूटोणा वगैरे बंद करण्यासाठी वैज्ञानिक दृष्टीकोन जागवणं महत्वाचं आहे हे त्यांना जाणवलं. त्या नुसार ते त्यांच्या गावात काम करत आहेत.

त्यांचं गाव आता 'विज्ञान गाव' म्हणून ओळखलं जातं. त्यांनी एक 'मिशन नोबेल प्राईज' नावाची एक चळवळ उभी केली आहे. ह्या चळवळीची सुरूवात कशी झाली, हे त्यांनी सांगितलं. त्यांनी सांगितलं की, एकदा एका वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर 'भारताला नोबेल प्राईज' अशी मोठी बातमी आली. त्यात एक ओळ आली की, अमेरिकेची लोकसंख्या ६५ कोटी आहे, तरी त्यांच्यात १०-१५ नोबेल प्राईज विजेते, आणि आपली लोकसंख्या काहीशे कोटी असुनही आपले फक्त ३-४ नोबेल प्राईज विजेते का? हे स्टॅटिस्टिक्स त्यांना काही पटलं नाही. मग त्यांनी ठरवलं की, आपणच त्यासाठी प्रयत्न करायचे, आणि मग अशी तयार झाली, 'मिशन नोबेल प्राईज' चळवळ. ह्या अंतर्गत ते त्यांच्या गावाजवळच्या काही शाळांमधे आणि महाविद्यालयांमधे नोबेल प्राईज म्हणजे नक्की काय आहे, आणि ते मिळणं आपल्याला कसं जरूरी आहे, ह्याविषयी लेक्चर द्यायचे.

अशी लेक्चर्स देत असताना त्यांना एकांनी असं सांगितलं की, यावर नुसतं बोलून काही नाही होणार. ह्यासाठी काहीतरी क्रियेटिव्ह वर्क केलं पाहिजे. ठोस काम केलं पाहिजे. मग त्यांना असं वाटलं की, ह्यासाठी आपण सगळ्यांमधे वैज्ञानिक दृष्टिकोन तयार केला पाहिजे. त्यांच्या गावात कर्मकांड, भोंदूगिरी खूप चालायची. हे सगळं घालवण्यासाठी लोकांना विज्ञानाच्या माध्यमातून शहाणं केलं पाहिजे असं त्यांना असं वाटलं, आणि मग त्यांनी त्यांच्या गावाला 'विज्ञान गाव' करायची तयारी सुरू केली. सध्या त्यांच्या गावातल्या प्रत्येक विजेच्या खांबावर वेगवेगळ्या शास्त्रज्ञांचे फोटो आहेत. ठिकठकाणी विज्ञान केंद्रे आहेत. शाळेतील मुलांमधे प्रयोग करून बघण्याची गोडी निर्माण करण्यात येत आहे.

मला ही कल्पना जरा वेगळी वाटली. मी नुकताच महाराष्ट्र शासनाने तयार केलेल्या ‘पुस्तकांच्या गावा’ला (भिलार, ता. महाबळेश्वर, जि. सातारा) जाऊन आलो. त्यामुळे आता हे ‘विज्ञान गाव’ कसं असेल, हे जाणून घ्यायची उत्सूकता वाढली आहे. काहीतरी वेगळी कल्पना असणार हे नक्की…

जयदीप यांच्यासोबतच संजय पुजारी यांच्याशीही गप्पा सुरू झाल्या. त्यांच्याबद्दल पुढच्या पोस्टमधे...

Thursday, 18 October 2018

'वेध' एक्सपिरियन्स: अमित गोडसे यांचे मुद्दे

मागच्या पोस्टमधे आपण अमृत देशमुख यांनी ‘वेध’मधे बोललेले मुद्दे वाचले. आता ‘बी-मॅन’ अमित गोडसे यांचे मुद्दे मांडतो आहे…

‘वेध’ हा भाषणांचा कार्यक्रम असतो. प्रत्येक कार्यक्रमाला एक थीम असते. थीमनुसार वक्ते बोलावले जातात आणि ते त्यांच्या करीयरसंबंधी, त्यांच्या कामासंबंधी, प्रेरणादायक अशा गप्पा मारतात. ह्यावेळची थीम होती, “झपाटलेपण ते जाणतेपण”.

ज्यांनी “झपाटलेपणा”ने स्वतःला रूची वाटणा-या विषयात काम सुरू केलं, आणि आता चिकाटीने, “जाणतेपणा”ने त्याच विषयात पुढे वाटचाल करत आहेत, असे वक्ते ह्यावेळच्या ‘वेध’ला आले होते.

हा कार्यक्रम आय. पी. एच. (IPH- Institute for psychological Health) ह्यांचा फ्लॅगशिप प्रोजेक्ट आहे. पुण्यात ह्याचं आयोजन एम. सी. दातार क्लासेस, आणि पळशीकर इंस्टिट्यूट, ह्यांनी केलं…

अमृत देशमुख यांच्या सोबतच 'बी-मॅन'सोबतही गप्पा सुरू झाल्या. त्यांच्या कामाला सुरूवात अशी झाली की, ज्या सोसायटीत ते रहात होते, तिथं एक मधमाश्यांचं पोळं लागलं होतं. कोणालाही ते पोळं नको होतं, त्यामुळं सोसायटी मेंबर्सनी पेस्ट कंट्रोल वाल्यांना बोलवून त्या मधमश्यांना मारून टाकलं. जवळ जवळ दिड लाख मधमाश्यांचा जमिनीवर सडा पडला होता. ही गोष्ट अमित गोडसे यांना खूप खराब वाटली. ह्या घटनेनंतर त्यांनी मधमाश्यांचा आभ्यास सुरू केला. मधमाश्या हाताळायचं प्रशिक्षण घेतलं, आणि मधमाश्यांचं 'पुनर्वसन' करण्याचं काम हाती घेतलं.

मला सगळ्यात जास्त विलक्षण वाटलेली गोष्ट म्हणजे, अमित गोडसे यांचं शरीर मधमाश्यांच्या चावण्याला सरावलं आहे, किंवा असं म्हणू की त्यांची रोगप्रतिकारक शक्ती इतकी वाढली आहे की, त्यांच्यावर मधमाशीच्या चावण्याचा काही परिणाम होत नाही. सुजत नाही, किंवा अजुन काही होत नाही. अजुन एक त्यांनी सांगितलं की, २-३ मधमाश्या चावल्या, तर आपल्या आरोग्यासाठी ते चांगलं असतं. जर १०००-१५०० मधमाश्या चावल्या, तरच आपल्याला ते प्राणघातक ठरू शकतं.

मधमाश्याचं पुनर्वसन अमित कसं करतात? तर ज्यांना मधमाश्या नको आहेत, त्यांच्याकडून ते मधमाश्या काढतात आणि त्यांना एका पेटीत ठेवून, ज्यांना त्या हव्या आहेत, त्यांना ते देतात. आता मधमाश्या कोणाला हव्या असतात? तर मधमाश्या परागीभवन करतात, त्यामुळं शेतक-यांना त्या हव्या असतात, अर्बनफार्मिंग (शहरी-शेती) करणा-यांनाही त्या हव्या असतात.

मधमाश्यांबद्दल आपल्याला खूप कमी माहिती असते. फक्त मध आणि चावणे... येवढीच आपल्याला माहिती असते. पण मधमाश्यांचं जग खूप मोठं असतं. परागीभवन, 'क्रॉस पॉलिनेशन' (म्हणजे एका झाडाचे परागकण दुस-या झाडावर रुजवणे ज्यांमुळे झाडांच्या वेगवेगळ्या जाती निर्माण होतात) अशा खूप सा-या गोष्टींमधे मधमाश्या आपल्याला मदत करतात. आणि अल्बर्ट आईंस्टाईन यांनी म्हटलेलं (किंवा घातलेली भिती) प्रसिद्ध आहेच. 'ज्या दिवशी जगातल्या सगळ्या मधमाश्या संपतील, त्यानंतर ४ वर्षांनी सगळी मानवजाती नष्ट होईल…'

एखादी मामूली वाटणारी गोष्ट किती मोठी असू शकते नाही? मधमाश्या घरात आल्या, की आपण पहिल्यांदा त्या घालवता कशा येतील ते बघतो. पण त्यांचं काम केवढं मोठं असतं! फुलं, फळं, सगळं त्यांच्यामुळेच तर येतं! आणि येवढी मोठी गोष्ट वाचवायचं काम पण मोठंच असणार ना!

अमित गोडसे यांनी 'बी बॅस्केट' नावाची कंपनीही स्थापन केली, ज्यामार्फत ते नैसर्गिक मध ही विकतात. ते आदिवासींना मधमाश्या न मारता मध काढण्याचं प्रशिक्षण देतात. त्याद्वारे ते विदर्भ, छत्तीसगड, वगैरे ठिकाणहून मध गोळा करून ते विकतात.

"सध्या मधमाश्या कमी होत आहेत, तरी आपल्या आजुबाजूच्या दुकानांमधे सर्रास मध दिसत असतं. असं कसं काय?" असा त्यांनी प्रश्न उभा केला आणि वाटलं, खरंच की! आपण असा विचार केलाच नव्हता! ह्यातून आपण किती एकतर्फी, किती वरवर विचार करतो हे कळून येतं. आपल्याल मध हवं असलं, की आपण जातो आणि मध घेऊन येतो. पण आपल्या डोक्यात कधीही विचार येत नाही की, हे मध अस्सल असेल का? एका बाजूला माश्या कमी होत आहे, आणि तरी आपल्याला एवढं सर्रास मध मिळत आहे... विचार करायला लावणारी गोष्ट आहे…

पुढचे वक्ते होते जयदीप पाटिल ज्यांनी स्वतःच्या गावाला ‘विज्ञान गाव’ करून टाकलं. त्यांच्याबद्दल पुढच्या पोस्टमधे…

Tuesday, 16 October 2018

'वेध' एक्सपिरियन्स: अमृत देशमुख यांचे मुद्दे

रविवार, ३० सप्टेंबर २०१८च्या ‘वेध’मधे शारदा बापट यांच्यानंतर सेशन होतं, 'बूक ॲन्ड बीज्'… 'बूकलेट गाय' (Booklet Guy) अर्थात अमृत देशमुख, आणि 'बी-मॅन' अमित गोडसे या दोघांशी या सेशनमधे गप्पा झाल्या. या पोस्टमधे अमृत देशमुख यांचे मुद्दे माझ्या शब्दांमधे…

‘वेध’ हा भाषणांचा कार्यक्रम असतो. प्रत्येक कार्यक्रमाला एक थीम असते. थीमनुसार वक्ते बोलावले जातात आणि ते त्यांच्या करीयरसंबंधी, त्यांच्या कामासंबंधी, प्रेरणादायक अशा गप्पा मारतात. ह्यावेळची थीम होती, “झपाटलेपण ते जाणतेपण”.

ज्यांनी “झपाटलेपणा”ने स्वतःला रूची वाटणा-या विषयात काम सुरू केलं, आणि आता चिकाटीने, “जाणतेपणा”ने त्याच विषयात पुढे वाटचाल करत आहेत, असे वक्ते ह्यावेळच्या ‘वेध’ला आले होते.

हा कार्यक्रम आय. पी. एच. (IPH- Institute for psychological Health) ह्यांचा फ्लॅगशिप प्रोजेक्ट आहे. पुण्यात ह्याचं आयोजन एम. सी. दातार क्लासेस, आणि पळशीकर इंस्टिट्यूट, ह्यांनी केलं…

अमृत देशमुख हे त्यांच्या भावामुळे वाचायला लागले. "माझा भाऊ माझ्या वाढदिवसाला सगळ्यांना सांगायचा की, बक्षिस म्हणून काही आणायचं नाही, आणि आणलंच तर फक्त पुस्तकं आणायची! यामुळं माझ्यावर पुस्तकांचा सतत मारा व्हायचा. पण त्यावेळी मला भावाचा राग यायचा." अमृत देशमुख सांगत होते. "मग मी एकदा माझा 'फेक' वाढदिवस साजरा केला, आणि त्याद्वारे ४ खेळणी मिळवली!" हे सगळं नवलच होतं!

अमृत देशमुख यांचं 'बूकलेट' नावाचं ॲप आहे. त्याद्वारे ते पुस्तकांचा सारांश रेकॉर्ड करून टाकतात. त्यांच्या आत्ताच्या स्थितीपर्यंतचा प्रवास खूपच इंट्रेस्टिंग होता.

त्यांना पहिल्यांदा तीन स्टार्ट-अप्समधे फेल्यूअर आलं होतं. ते निराशेत होते. तेव्हा एकदा त्यांना एका मित्राचा फोन आला, की चल पिक्चर बघायला जाऊ. ते गेले. पंधरा मिनिटं आधी थेटरवर पोचले. तर त्या काळात अमृत देशमुख एक पुस्तक वाचत होते, आणि त्या पुस्तकाचा सारांश त्यांनी बसल्या बसल्या त्या मित्राला एकदम एका झटक्यात सांगितला. त्यावर खूश होऊन तो मित्र त्यांना म्हणाला की, “तुझ्या वाचनाचा मला फायदा झाला की!” हे अमृत यांना अगदी पटलं, आणि त्यांनी घरी येऊन असे सारांश लिहून व्हाट्स ॲपद्वारे पाठवायला सुरूवात केली. ब-याच जणांनी अमृत यांना सबस्क्राईब केलं होतं.

एकदा, अमृत यांनी व्हाट्स ॲपवरून एक सर्वे केला. त्यातनं त्यांच्या लक्षात आलं की, ज्यांना ज्यांना ते पुस्तकांचा सारांश लिहून पाठवतात, त्यांपैकी ८० टक्के लोक ते वाचतच नाहीत! त्यांची कारणं खूप असतात, पण तरी यामुळे अमृत यांना खूप वाईट वाटलं. त्या काळात त्यांनी कुठल्यातरी पुस्तकात वाचलं होतं की, ज्या माणसांसाठी तुम्ही काम करताय, त्यांची लाईफस्टाईल एकदा जगून बघा. मग अमृत देशमुख एका लोकल ट्रेनमधे बसले. तिथं त्यांच्या लक्षात आलं, की बरेच जण कानात हेडफोन्स घालून काहीतरी ऐकत असतात. मग ते घरी जाताना एक मायक्रोफोन घेऊन गेले, आणि रेकॉर्डिंग करायला लागले. पहिलं रेकॉर्डिंग खूप रटाळ झालं होतं, असं तेच सांगतात. मग त्यांनी स्टोरीटेलिंगचं प्रशिक्षण घेतलं, ऑडियो एडिटिंगचं सॉफ्टवेअर विकत घेतलं, आणि मग सगळे ऑडियो एडिट करून वॉट्स ॲपवर टाकायला लागले.

त्यांना वॉट्स ॲपने एकदा बॅनही केलं. वॉट्स ॲपचा असा समज झाला की हे खूप मेसेज पाठवून स्पॅमींग करत आहेत. मग त्यांच्या मित्राने त्यांना एक छान ॲप बनवून दिलं. त्याचंच नाव 'बूकलेट'.

सा-या प्रकारच्या पुस्तकांचे सारांश या ॲपवर ऑडियो स्वरूपात असतात. "फिक्शन, स्टोरिज्, अशा प्रकारची पुस्तकं ऐकायला सगळ्यांना आवडतं, म्हणून मी पुस्तकांचे सारांश टाकताना त्यातले ८० टक्के सारांश एज्यूकेशल टाकतो, आणि २० टक्के फिक्शन, स्टोरिज्, एन्टरटेंमेंट असे सारांश टाकतो."

हे प्रोफेशन माझ्यासाठी खूपच विलक्षण, वेगळं होतं. मला स्वतःला पुस्तक वाचायला खूप आवडतं. त्यामुळे ते ह्या प्रोफेशनमधे किती बुडाले असतील हे मला समजू शकतं.

खरंच, भारी वाटलं…!

पुढचे वक्ते ‘बी-मॅन’ अमित गोडसे यांचे मुद्दे पुढच्या पोस्टमधे...

Friday, 12 October 2018

'वेध' एक्सपिरियन्स: शारदा बापट यांचे मुद्दे...

मागच्या सेशनमधे आपण असीम फाउंडेशनचे संस्थापक सारंग गोसावी आणि असीम
फाउंडेशनच्या कार्यकर्त्या यास्मिन, यांचे मुद्दे वाचले. आता रविवार, ३०
सप्टेंबर २०१८ला 'वेध'च्या सगळ्यात पहिल्या वक्त्या शारदा बापट यांचे
मुद्दे माझ्या शब्दांमधे…

'वेध' हा भाषणांचा कार्यक्रम असतो. प्रत्येक कार्यक्रमाला एक थीम असते.
थीमनुसार वक्ते बोलावले जातात आणि ते त्यांच्या करीयरसंबंधी, त्यांच्या
कामासंबंधी, प्रेरणादायक अशा गप्पा मारतात. ह्यावेळची थीम होती,
"झपाटलेपण ते जाणतेपण".

ज्यांनी "झपाटलेपणा"ने स्वतःला रूची वाटणा-या विषयात काम सुरू केलं, आणि
आता चिकाटीने, "जाणतेपणा"ने त्याच विषयात पुढे वाटचाल करत आहेत, असे
वक्ते ह्यावेळच्या 'वेध'ला आले होते.

हा कार्यक्रम आय. पी. एच. (IPH- Institute for psychological Health)
ह्यांचा फ्लॅगशिप प्रोजेक्ट आहे. पुण्यात ह्याचं आयोजन एम. सी. दातार
क्लासेस, आणि पळशीकर इंस्टिट्यूट, ह्यांनी केलं.

रविवारी, सुरूवातीचं सेशन डॉ. शारदा बापट यांचं होतं. त्यांनी फक्त
हौसेपोटी डॉक्टर व्हायचं ठरवलं. त्या एम. बी. बी. एस. (M.B.B.S.) डॉक्टर
झाल्या. त्यांनी आधी 'लॉ'चं शिक्षण घेतलं होत. इलेक्ट्रॉनिक्सचं शिक्षणही
त्यांनी घेतलं होतं. डॉक्टरीच्या पुढील शिक्षणासाठी त्या फिलिपाईन्सला
गेल्या. तिथं डॉक्टरीच्या शिक्षणानंतर करायला लागणारी इंटरशिप करता करता
त्या पायलेटही झाल्या! त्यानंतर त्यांनी पियानो शिकायलाही सुरूवात केली!
केवढी ती क्षेत्रांमधली विविधा!

फिलीपाईन्सला असताना शिक्षणानंतर कराव्या लागणा-या इटर्नशिपमधला त्यांनी
एक किस्सा सांगितला. तिथं चोविस तास ड्यूटी करायची असते असं त्यांनी
सांगितलं. तर, रात्री एक माणूस आला. त्याचं बोट तुटलं होतं. त्या बोटाला
शिवायचं काम त्यांना करायचं होतं. त्यांनी अर्धं शिवलं, पण त्यानंतर
त्यांना, दिवसभर काम केल्यामुळे थकवा जाणवू लागला, अशक्तपणा जाणवू लागला,
आणि त्यांनी ते काम त्यांच्या सिनियरकडे सोपवून दिलं. आता येवढं काम असून
त्या पायलट कशा काय झाल्या?

त्या पायलेट का झाल्या याचं कारण देताना त्या म्हणाल्या, "फिलीपाईन्स हा
बेटांचा देश आहे. तिथं विमानं आणि पायलट यांची सारखी गरज असते. आणि जिथं
आमचं हॉस्पिटल होतं, तिथंच जवळ एक पायलेट स्कूलही होतं. त्यात ब-याच
नव्या गोष्टी शिकवल्या जातात, या आकर्षणाने आणि वेळही हाताशी असल्याने मी
ॲडमिशन घेतलं..."

खरंच, त्यांची कॉन्संट्रेट करण्याची शक्ती, इच्छाशक्ती किती जबरदस्त
असावी, या कल्पनेनेच मला भारी वाटलं. हे सगळं अचंबा करण्यासारखंच होतं.

हे येवढं सगळं कसं काय जमतं? तर त्यांनी एक गोष्ट सांगितली, "स्पष्टपणे
नाही म्हणता आलं पाहिजे. कधी कधी लोकांच्या आपल्याकडून असलेल्या अपेक्षा
वाढतात, तेव्हा आपल्या सोईनुसार 'नाही' म्हणता आलं पाहिजे. तसंच वेळेचं
नियोजनही महत्त्वाचं आहे." खरंच, माझ्यासाठी ही खूपच मोठी प्रेरणा होती.

ह्यानंतरचे वक्ते होते, 'बुकलेट गाय' अमृत देशमुख.. त्यांच्याबद्दल
पुढच्या पोस्टमधे…

Tuesday, 9 October 2018

'वेध' एक्सपिरियन्स: सारंग गोसावी आणि यास्मिन यांचे मुद्दे

आजच्या पोस्टमधे, सारंग गोसावी, आणि असीम फाऊंडेशनच्या कार्यकर्त्या यास्मीन, यांनी ‘वेध’च्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, पुणे इथे पार पडलेल्या ८व्या आवर्तनामधे बोललेले मुद्दे, मी माझ्या शब्दांमधे मांडतोये…

‘वेध’ हा भाषणांचा कार्यक्रम असतो. इथं थीमनुसार वक्ते बोलावले जातात आणि ते त्यांच्या करीयरसंबंधी, त्यांच्या कामासंबंधी, प्रेरणादायक अशा गप्पा मारतात. ह्यावेळची थीम होती, “झपाटलेपण ते जाणतेपण”.

ज्यांनी “झपाटलेपणा”ने स्वतःला रूची वाटणा-या विषयात काम सुरू केलं, आणि आता चिकाटीने, “जाणतेपणा”ने त्याच विषयात पुढे वाटचाल करत आहेत, असे वक्ते ह्यावेळच्या ‘वेध’ला आले होते.

हा कार्यक्रम आय. पी. एच. (IPH- Institute for psychological Health) ह्यांचा फ्लॅगशिप प्रोजेक्ट होता. पुण्यात ह्याचं आयोजन एम. सी. दातार क्लासेस, आणि पळशीकर इंस्टिट्यूट, ह्यांनी केलं.

आनंद शिंदे आणि तुषार कुलकर्णी या दोघांच्या सेशननंतर, सारंग गोसावी आणि 'असीम फाऊंडेशन'च्या कार्यकर्त्या यास्मिन, यांचं सेशन सुरू झालं. सारंग गोसावी हे पुण्याचे आहेत. शिक्षणाने ते इंजिनीयर आहेत. सी. ओ. ई. पी. (COEP) मधून त्यांनी इंजिनीयरिंग केलं. २००१ला लेफ्टनंट जनरल पाटणकर हे पुण्याला आले असता, त्यांनी 'तरूणांनी काश्मिरमधे आलं पाहिजे' असं आवाहन दिलं, आणि त्या आवाहनाला साद देत सारंग गोसावी काश्मिरला गेले. त्यांनी काश्मिरला जायच्या आधीचा किस्सा सांगितला. ले. जनरल पाटणकर यांचं भाषण ऐकल्यावर त्यांनी घरी येऊन आईला विचारलं की 'मी काश्मिरला जाऊ का?' आईने सहाजिकच ठामपणे 'नाही' म्हटलं. नाही म्हटल्यावर त्यांनी 'ओके' म्हणून ‘मित्रांसोबत गोव्याला जाऊ का?' म्हणून विचारलं, त्याला संमती मिळाली, आणि मग ते गोव्याला जाण्याऐवजी काश्मिरला गेले...!

तिथे सारंग, ले. जनरल पाटणकर यांना जाऊन भेटले. तिथं त्यांनी सारंग यांना निरनिराळ्या माणसांशी ओळखी करून दिल्या, आणि त्या ओळखींद्वारे सारंग यांनी (त्यांना फक्त कॉम्प्यूटर चांगल्याप्रकारे येत असल्यामुळे) एका पडीक शाळेत कॉम्प्यूटर सेंटर चालू केलं. तिकडच्या माणसांना शिक्षणाचं महत्त्व समजावून दिलं... मग ती शाळा हळू हळू करत वापरात आली. 'ये हमारे बच्चोको सिखा रहा हैं...', अशी सगळ्यांची मानसिकता असल्यामुळे, सगळ्यांना कृतज्ञता असल्यामुळे तिकडच्या माणसांनीही त्यांना खूप पाठिंबा दिला. त्या कॉम्प्यूटर सेंटरमधे शिकता शिकता काश्मिरी तरूणांनी तर स्वतःची छोटी आय. टी. कंपनीही चालू केली!

अतिरेकींचा, आतंकवादींचा कधी त्रास झाला नाही, कारण स्थानिक माणसांचा सारंग यांना पाठिंबा होता. जिथं स्थानिक माणसांचा पाठिंबा असतो, तिथं अतिरेकी काही करू शकत नाहीत, असं सारंग यांनी सांगितलं. मुळात काश्मिरी माणसंच खूप चांगली असतात. स्वागत करणारी असतात. त्यांच्या घरी गेल्यावर ते छान तुमचं स्वागत करतात. तुम्हाला चहा देतात, त्यासोबत फराळ देतात. त्यांच्या घरून निघताना त्यांचं पहिलं वाक्य 'आज ठेहर जाओ...' असं असतं. त्यांच्या अशा वागण्यामुळे त्यांच्याशी पटकन गट्टी झाली, असं सारंग सांगतात. "आम्ही कुठं पार्कमधे कुठलं सेमिनार घेत असलो, तर उत्सुकते पोटी माणसं आजुबाजूला जमायची. अशी माणसं आजुबाजूला असली, तर अतिरेकी काही करू शकत नाहीत." सारंग म्हणतात.

एकदा काश्मिरमधे परिस्थिती पार बिघडली. तरूणांकडून दगडफेक वगैरे होऊ लागली. सारंग यांनी काश्मिरमधे जाऊन तरूणांशी बातचीत केली, तेव्हा तरूणांचं उत्तर साधारण असं होतं की, आमच्याकडे अजुन काही करण्यासारखंच नाही, आम्ही काय करू? तेव्हा सारंग यांनी काश्मिरी लोकांसाठी बेकरीज् सुरू करायच्या ठरवल्या ज्यात काश्मिरी लोक काम करून पैसे मिळवू शकतील. सारंग यांच्या असं लक्षात आलं, की सफरचंद आणि आक्रोड वापरून जर कुकिज बनवले, तर एक चांगलं उत्पादन तयार होऊ शकतं. सफरचंद आणि आक्रोड काश्मिरमधे कधीही कमी पडत नाहीत. मग ह्यावर त्यांनी खूप रिसर्च केला, आणि रेसिपी शोधून काढली. मग या उत्पादनाचा काश्मिरी लोकांना फायदा व्हावा, म्हणून त्यांनी त्यांच्या असीम फाउंडेशन अंतर्गत खूप सा-या जणांना प्रशिक्षण देऊन बेकरीज् चालू केल्या. ह्या बेकरींमधून तयार होणारी बिस्किटं पूर्ण भारतामधे विकली जातात, सारंग म्हणाले.

असीम फाउंडेशनची स्थापना २०१०ला झाली. "असीम हा परिवार आहे." सारंग म्हणतात. "मीच असीममधे सगळ्यात जास्त म्हातारा आहे." असंही ते पुढं म्हणतात. "सध्या मी सगळ्या वाढवलेल्या गोष्टींना मॅनेज करतोये. पण असीमच्या कार्यकर्त्यांनी यात पडू नये असं मला वाटतं. मी जसा पुर्वी सॅक अडकवून निघायचो, तसंच त्यांनी असावं आणि सगळ्यांशी दोस्ती करावी." असं ते म्हणाले.

आर्मी आणि बॉर्डरवरची जनता यांचं नातं दृढ करण्यासाठी सारंग यांनी ‘क्रिकेट प्रिमियर लिग’ सुरू केली! झालं असं की, बॉर्डर लाईनवरची सगळी गावं आर्मीला सपोर्ट करतात. पण एकदा अशाच एका गावाकडून आर्मीवर हल्ला झाला. मग बॉर्डर आणि गावांमधे भिंत घालायचं काम सुरू झालं. हे बघून सारंग यांना वाटलं की हा हल्लाच ह्यासाठी नसेल ना केला? आर्मी आणि जनतेमधला संबंध तोडण्यासाठी? मग ह्यावर विचार सुरू झाला आणि लक्षात आलं की काश्मिरमधला आवडता खेळ क्रिकेट, हे नातं जोडण्यासाठीचा दोर होऊ शकतो. मॅच नीट पार पडायला ग्राऊंड्स लागतात, आणि अशी ग्राऊंड्स काश्मिरमधे फक्त आर्मीचे असतात. ह्या अशा पद्धतीने दर प्रिमीयर लिगला हे नातं दृढच होत चाललं आहे.

यानंतर असीमच्या काश्मिरच्या कार्यकर्त्या यास्मिन यांच्याशी गप्पा सुरू झाल्या. 'असीम'शी जोडल्यावर स्वतःच्या पायावर उभं राहिल्याचा आनंद यास्मिन यांच्या बोलण्यातून दिसत होता. त्या सध्या सायकोलॉजी विषय घेऊन बी. ए. करत आहेत. स्वतःच्या बळावर कॉलेजमधे जायचा तो आनंद, त्यामुळे आलेला आत्मविश्वास, त्यांच्या बोलण्यातून अगदी ठळकपणे दिसत होता. बेकरी चालवून त्यातनं मिळालेल्या पैश्यांनी त्यांनी स्वतः स्वतःच्या कॉलेजसाठीची फी भरली, हे त्यांनी अगदी आत्मविश्वासाने आणि अभिमानाने सांगितलं.

सारंग यांचं एवढं मोठं काम तेही इतक्या लांब राज्यात, जाणून घेऊन अगदी आश्चर्य वाटलं. एकेक प्रोजेक्ट वाढवत त्यांनी असीमचं मोठ काम उभं केलं. काश्मिरी लोकांसाठी एवढ्या 'झपाटल्यापणे' काम करणारा माणूस मी पहिल्यांदा पाहिला. कार्यक्रमात सारंग यांना प्रेरणा ठरलेले ले. ज. पाटणकर ही होते. मग या सगळ्यांच्या समवेत आम्ही सगळ्यांनी राष्ट्रगीत म्हटलं आणि मग शनिवार, २९ सप्टेंबर २०१८चं 'वेध' संपलं.

रविवार, ३० सप्टेंबर २०१८च्या ‘वेध’च्या पहिल्या वक्त्या होत्या शारदा बापट. त्यांच्याबद्दल जाणून घेऊ पुढच्या पोस्टमधे…

Monday, 8 October 2018

'वेध' एक्सपिरियन्स: तुषार कुलकर्णी यांचे मुद्दे

मागच्या पोस्टमधे आपण यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, पुणे इथे पार पडलेल्या ‘वेध’च्या ८व्या आवर्तनामधे आनंद शिंदे यांनी बोललेले मुद्दे वाचले, या पोस्टमधे तुषार कुलकर्णी यांच्याबद्दल… ज्याप्रमाणे आनंद शिंदे हत्तींसाठी काम करतात, त्याचप्रमाणे तुषार कुलकर्णी जिराफांसाठी काम करतात. त्यांनी ‘वेध’मधे सांगितलेली जिराफांविषयीची माहिती माझ्या शब्दांमधे…

‘वेध’ हा भाषणांचा कार्यक्रम असतो. इथं थीमनुसार वक्ते बोलवले जातात आणि ते त्यांच्या करीयरसंबंधी, त्यांच्या कामासंबंधी, प्रेरणादायक अशा गप्पा मारतात. ह्यावेळची थीम होती, “झपाटलेपण ते जाणतेपण”.

ज्यांनी “झपाटलेपणा”ने स्वतःला रूची वाटणा-या विषयात काम सुरू केलं, आणि आता चिकाटीने, “जाणतेपणा”ने त्याच विषयात पुढे वाटचाल करत आहेत, असे वक्ते ह्यावेळच्या ‘वेध’ला आले होते.

हा कार्यक्रम आय. पी. एच. (IPH- Institute for psychological Health) ह्यांचा फ्लॅगशिप प्रोजेक्ट होता. पुण्यात ‘वेध’चं आयोजन एम. सी. दातार क्लासेस, आणि पळशीकर इंस्टिट्यूट, ह्यांनी केलं.

तर, आनंद शिंदे यांच्यासोबत तुषार कुलकर्णी यांच्याशीही गप्पा सुरू झाल्या. त्यांनी युगांडा आणि कलकत्त्यातही जिराफांसाठी काम केलं आहे. ते जिराफकडे वळले ते एका ‘झू’च्या माध्यमातून. त्यांना ह्या प्राण्याविषयी कुतूहल निर्माण झालं आणि त्यांनी इंटरनेटवर जिराफविषयी खूप वाचलं. त्या प्राण्याविषयी माहिती मिळवली. मला पण कुतूहल होतं की, जिराफ हा प्राणी तसा फारसा कोणाच्या बोलण्यात येत नाही. “जी फॉर जिराफ” सांगताना, किंवा “जिराफची मान उंच कशी झाली?” या प्रश्नाचं उत्तर, “उंच झाडावरची पानं खाण्यासाठी जिराफची मान उंच झाली.” असं देतानाच, आपला आणि जिराफचा तसा संबंध येतो. मग त्यांना जिराफविषयी येवढं कुतूहल कसं निर्माण झालं, की त्यांनी जिराफसंबंधी कामच सुरू करून टाकलं? आणि येवढी माहिती पण कशी काय मिळाली? मी लिहिल्याप्रमाणेच, त्यांनी इंटरनेटवरून माहिती मिळवली. मग त्यांनी झूलॉजीसंबंधी अभ्यास करून, युगांडामधे जिराफसंबंधी काम करायला आणि अभ्यास करायला ते गेले. दरम्यान सर्च करून त्यांना असं कळालं होतं की जिराफांच्या संवर्धनासाठी कोणीच काम करत नाही. जिराफांचं अस्तित्व धोक्यात आहे, हे त्यांना कळालं होतं, त्यामुळं आपण जिराफांसाठी काम करायचं, हे ठरलंच होतं.

त्यांनी युगांडामधील आणि कलकत्त्यामधील काही व्हिडियो दाखवले. एकामधे जिराफाला पकडतानाचं शुटिंग होतं. जिराफ नक्की कोणत्या जातीचा आहे हे शोधायला त्याचे रक्ताचे, केसांचे, असे वेगवेगळे नमुने घ्यायला लागतात. त्यासाठी जर तो जिराफ जंगली असेल, तर पकडावा लागतो. अत्यंत नाट्यमय असा तो व्हिडियो होता. "जिराफला पकडण्यासाठी त्याला डार्ट मारला, की तो पळायला लागतो. त्याच्यावर त्या औषधाचा अंमल येण्याआधी तो खूप पळतो, त्यामुळे त्याला दो-यांनी वगैरे जखडून पकडावं लागतं. त्यावर एकदा औषधाचा अंमल आला, की तो आपोआप बेशुद्ध होऊन आडवा होतो." तुषार कुलकर्णींनी सांगितलं. जिराफचं ब्रिडींग करण्यासाठी जात शोधावी लागते, नाहीतर क्रॉसब्रिडींग होतं आणि ते जिराफांसाठी चांगलं नसतं, असं मला एकंदरीत कळालं.

मग त्यांनी जिराफची 'अमेझिंग फॅक्ट्स' म्हणता येईल अशी काही माहिती सांगितली. जिराफ हा जगातला सगळ्यात मोठा प्राणी आहे. जेव्हा ग्रीक लोकांना जिराफचा शोध लागला, तेव्हा त्यांना वाटलं की, हा प्राणी उंट आणि चित्ता या दोन प्राण्यांपासून तयार झाला आहे. त्याला उंटासारखी लांब मान आहे, आणि चित्त्यासारखे अंगावर पॅचेस आहेत. त्यामुळं, जिराफला सायंटिफिक नाव ‘जिराफ्फा कॅमेलोपार्दालिस (Giraffa Camelopardalis) असं पडलं. आपल्या आणि जिराफाच्या मानेत एक साम्य आहे (!) की, आपल्या आणि त्याच्या मानेत सातच मणके आहेत. (!!) फरक इतकाच, की त्याचे मणके मोठे आहेत त्यामुळं त्याची मान मोठी आहे. जिराफची जिभ १९ इंच लांब असते. तो त्याच्या जिभेचा उपयोग झाडावरील पानं खायला करतो. त्याचा जास्तीत जास्त वेळ जिभ बाहर काढून खाण्यात जातो, त्यामुळं त्याच्या जिभेला उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून जिभेचा पुढचा भाग काळा असतो. जिराफ खूप कमी प्रमाणात आवाज काढतात. पुर्वी संशोधकांचा असा समज होता की जिराफांना आवाजच काढता येत नाही, त्यांना स्वरयंत्र नसतं. पण एवढ्यातच असा शोध लागला आहे, की त्यांना आवाज काढता येतो, त्यांना स्वरयंत्र असतं, पण ते खूप क्वचित आवाज काढतात. त्यांच्या अंगावरचे पॅटर्न्स हे युनिक असतात. म्हणजे त्या पॅटर्न्सवरून प्रत्येक जिराफ वेगळा ओळखता येतो. त्याच बरोबर त्यांच्या पॅटर्नचा उपयोग आजुबाजूच्या झाडांमधे वगैरे लपायला खूप होतो. आणि या सगळ्यापेक्षा मला वेगळी आणि विलक्षण वाटलेली गोष्ट म्हणजे आपल्या पिल्लाला जन्म देताना, मादी जिराफ तिचा स्वतःचा जिथे जन्म झाला, तिथेच जाऊन जन्म देते! ह्या मागचं कारण नक्की काय, हे मला माहित नाही, पण इतकी विलक्षण गोष्ट मी कधीच ऐकली नव्हती...!

तर जिराफांच्या जिभेच्या बाबतीतच तुषार कुलकर्णी यांनी एक किस्सा सांगितला. ते जेव्हा युगांडाहून आले, तेव्हा ते कलकत्त्याच्या एका झूमधे एज्युकेटर म्हणून काम करू लागले. म्हणजे जिराफ बघायला आलेल्या माणसांना त्याच्याबद्दलची १० मिनिटं मनोरंजक माहिती देण्याचं काम ते करू लागले. तर त्या दरम्यान ते जेव्हा त्या जिराफांचं निरिक्षण करत होते, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की, जिराफ सारखे भिंत चाटत आहेत... मग त्याचं कारण शोधल्यावर त्यांच्या लक्षात आलं की, जंगलात जिराफ जिभेने पानं खातात, ते सारखी जिभ हालवत असतात, ती त्यांची सततची होणारी हलचाल असते, आणि झूमधे त्यांना तोंडाने पानं खावी लागतात, कारण ती ट्रेमधे दिली जातात. जिभेचा वापर होत नाही. यानं जी गोष्ट ते दिवसातून कितीतरी तास करायचे, ती त्यांना करताच येत नाही. आणि जेव्हा त्यांच्या अशा त-हेने एका मुख्य कृती करण्यावर आडकाठी येते, तेव्हा त्यांना स्ट्रेस येतो, आणि मग ते जे दिसेल त्या गोष्टीवर जिभ घासून, जिभ वापरून आपला स्ट्रेस कमी करायचा प्रयत्न करतात. कलकत्त्याच्या झूमधे असलेल्या जिराफांच्या बाबतीत, त्यांनी भिंत चाटायला सुरूवात केली. मग त्यावर तुषार कुलकर्णी यांनी काढलेला तोडगा असा, की त्यांनी पाण्याच्या २० लि.च्या कॅन्सना बिळं पाडून त्यात पानं वगैरे घातली. त्यामुळे जिराफांना त्यांच्या जिभेचा वापर करता आला. ते त्या बिळातून जिभ आत घालून पानं खायला लागले. त्यामुळे जे अन्न खायला त्यांना १५ मिनिटं लागत होती, त्याला एक-दिड तास लागू लागला. त्यांचा जास्तीत जास्त वेळ यात जाऊ लागला. याला ते ‘एन्रिचमेंट प्रोजेक्ट’ म्हणतात.

जिराफांच्या मानसिकतेबाबत बोलताना तुषार कुलकर्णी म्हणाले की, "जिराफ कधीही आकारावरून ताकदीचा अंदाज लावत नाहीत, जे आपल्याला इतर प्राण्यांच्या बाबतीत सहज आढळून येतं. ते खूप जेंटल असतात." ते असंही म्हणाले की, "आकाशाला भिडून पाय जमिनीवर ठेवणं, मी जिराफांकडून शिकलो."

खरंच, प्राण्यांकडून इतकं शिकता येऊ शकतं, हे मला ह्या सेशनमधून कळालं.

याच्या पुढचं सेशन, ‘असीम फाऊंडेशन’चे संस्थापक सारंग गोसावी आणि असीम फाउंडेशनच्या कार्यकर्त्या यास्मिन, यांचं होतं. ते पुढच्या पोस्टमधे…

Sunday, 7 October 2018

'वेध'च्या आठव्या आवर्तनातील वक्ते...

या जगात दोन प्रकारची माणसं असतात... (हे दोन प्रकार पण कित्येक प्रकारचे
असतात, तो भाग वेगळा!) एक, जे एका चौकटीत राहून स्वतःचं आयुष्य जगतात.
पु. ल. देशपांडे यांच्या भाषेत बोलायचं झालं तर, ज्यांची नशिबं सरळ
चालतात, असे! रीतसर शाळा, रीतसर मार्क, रीतसर करीयर (इंजिनीयर, डॉक्टर
असे करीयर), रीतसर जॉब, असं सगळं रीतसर चालू असतं. पण सगळं रीतसर चालू
असलं तरी सगळं एकसूरी असतं, आवडीने चाललेलं करीयर नसतं, मनात करायचं
काहीतरी वेगळं असतं.

दुसरा प्रकार असतो, जे स्वतःला पाहिजे ते करतात. स्वतःला रूचलेल्या
वाटेने जातात. चिकाटीने काम करतात. इतरांपेक्षा थोडा वेगळा विचार करतात.

असेच काही वक्ते ह्यावेळच्या पुण्यामधे पार पडलेल्या 'वेध'च्या ८व्या
आवर्तनाला आले होते. त्यातल्या प्रत्येक वक्त्यांचे मला समजलेले काही
मुद्दे मी रोज मांडणार आहे. प्रत्येक पोस्टमधे एका वक्त्याचे काही मुद्दे
असतील.

ही पहिली पोस्ट आहे, आनंद शिंदे यांच्या प्रवासाची…

शनिवार, २९ सप्टेंबरच्या पहिल्या सेशनमधे आनंद शिंदे यांनी अगदी हत्तींचं
जगणं उलगडून दाखवलं. त्यांचं कळपात राहणं, एकमेकांना चिडवणं, एकमेकांशी
बोलणं, त्यांचे आवाज, त्यांचं वागणं, त्यांच्यातले काही सिग्नल, असं सगळं
उलगडून दाखवलं. आनंद शिंदे यांनी हत्तींसोबत घालवलेले काही क्षण त्यांनी
व्हिडियोच्या माध्यमांतून दाखवले. या व्हिडियोंमधून हत्तींचं खेळणं,
त्यांचं लाड करणं, कुरवाळणं, हे सगळं कळालं. त्यांनी बरेच प्रसंग सुद्धा
सांगितले. त्यातले काही प्रसंग अगदी विनोदी, तर काही मनाला चटका लावणारे
होते, विचार करायला लावणारे होते. जसं की त्यांनी एक व्हिडियो दाखवला,
ज्यात एक हत्तीचं पिल्लू जे स्वतःच्या आईपासून वेगळं झालं आहे, ते
आजुबाजूला असणा-या अंधारामुळे गैरसमज होऊन आईचं आचळ शोधत आहे! हा असा
प्रसंग बघितला, आणि खरंच मन दुःखी झालं. किंवा काही विनोदी किस्से ही
होते, जसं की पाय साखळीने बांधलेले असुनही एक हत्ती रस्त्याने चालता
चालता एका माणसाला लाथ मारतो! ते का? तर आनंद शिंदे यांनी सांगितलं की,
"तो माणूस त्या हत्तीच्या वाटेच्या मधून जाण्याचा प्रयत्न करत होता, जे
त्या हत्तीला पटलं नाही. एकदा हत्तींना त्यांची वाट दाखवून दिली, की
त्याच्यामधून कोणीही गेलेलं त्यांना पटत नाही. म्हणून त्या माणसाला हूल
द्यायला, म्हणून त्या हत्तीने त्याला लाथ मारली!" त्यांनी अजुन एक
व्हिडियो दाखवला, ज्यात हत्ती आनंद शिंदे यांचं नाक ओढत होता! "हा हत्ती
मला भेटला, की नेहमी जे काय माझ्याकडे दिसेल ते ओढायचा प्रयत्न करायचा!"
आनंद शिंदे सांगत होते. "माझा कॅमेरा, माझे केस, असं ओढायचं प्रयत्न
करायचा, आणि काही ओढायला मिळालं नाही, तर माझं नाक ओढायचा! आजुबाजूचे
माहूत म्हणायचे, 'तुम्ही त्याच्याशी हत्तींच्या भाषेत बोलता ना, म्हणून
त्याला वाटतं तुम्ही हत्ती आहात! म्हणून तुमचं नाक छोटं कसं, ह्या
विचाराने तो तुमचं नाक ओढून सोंड करायचा प्रयत्न करतो!" असे ते बरेच
किस्से सांगत होते. मला सगळ्यात जास्त व्हिडियो आवडला, तो हत्ती फुटबॉल
खेळतानाचा! "काही हत्तींना खेळायला शिकवावं लागतं, त्यामुळं ह्या हत्तीला
मी फुटबॉल खेळायला शिकवत होतो..." आनंद शिंदे सांगत होते. "हत्तींना माती
खूप लागते, त्यामुळं हा हत्ती सारखं खेळता खेळता बॉल त्याच्यासाठी
बनवलेल्या खड्ड्यात घेऊन जात होता. ह्याने माझे दोन फुटबॉल फोडले होते,
आणि आता हा तिसरा फुटबॉल घेऊन खेळत होता. ह्याला सांगितलं की 'फुटबॉल
फोडू नको हा!' तर तो फुटबॉल लांब फेकून देत होता..." हा व्हिडियो खरंच
मजेदार आणि निरागस होता!

आनंद शिंदे यांनी एक निरिक्षण सांगितलं, "माणसांचं निरिक्षण करून, आणि
हत्तींचं निरिक्षण करून मी एक गोष्ट ठामपणे सांगू शकतो, की बायकाच जास्त
बोलतात...! हत्तींमधे पाय आपटून बोलायची एक पद्धत असते, त्याद्वारे ते ७
कि.मी.पर्यंत संवाद पाठवू शकतात. ही पद्धत वापरून मादी हत्ती जास्त
बोलतात हे मला लक्षात आलं आहे...!" असं ते म्हणाले. यावर आनंद नाडकर्णी,
जे यांच्याशी गप्पा मारत होते, त्यांचं म्हणणं, "या तुमच्या बोलण्यामुळे
आम्हाला हत्ती अधिक जवळचा वाटायला लागला...!"

सर्वसाधारणपणे, आईपासून वेगळं झाल्यानंतर, किंवा कळपापासून वेगळा
झाल्यानंतर हत्ती एक प्रकारच्या निराशेमधे जातात, असं आनंद शिंदे
यांच्याकडून कळालं. असे निराशेमधे आल्यावर ते एकच हालचाल सारखी करत
राहतात, आणि यामुळे ते आणखी निराशेमधे जातात. अशा हत्तींना 'डान्सिंग
एलिफंट' म्हणतात, पण ते अशा वेळी निराशेत असतात. अशा हत्तींना कौन्सेलिंग
करावं लागतं, आणि या निराशेतून बाहेर काढून त्यांना परत पूर्वपदावर आणावं
लागतं. नाहीतर ते नेहमी निराशेत राहून खाणंपिणंही सोडून देतात. आनंद
शिंदे यांनी असाच एक किस्सा सांगितला, ज्यात त्यांनी सांगितलं की एक
हत्तीचं पिल्लू विहिरीत पडलं होतं. त्याला बाहेर काढल्यावर ते इतक्या
निराशेत गेलं होतं की त्याने खाणंपिणं सोडून दिलं. मग त्याच्याशी आनंद
शिंदे यांनी संवाद साधल्यावर त्याने विहिरीतून बाहेर आल्यावर पहिल्यांदा,
आणि खूप दिवसांनी २० लिटर पाणी पिलं.

आनंद शिंदे यांचे असेच काही किस्से आणि व्हिडियो दाखवल्यावर माणूसच फक्त
हुशार आणि भावना असणारा प्राणी आहे हा माझा समज दूर झाला. हत्तींनाही
भावना असतात. तेही हसतात, रडतात, विनोद करतात, विनोदाला उत्तर देतात,
खेळतात. सगळं करतात. आनंद शिंदे यांनी एक फोटो दाखवला, ज्यात त्यांनी
हत्तीच्या सोंडेवर डोळे मिटून डोकं टेकवलं होतं, आणि हत्तीनेही त्याला
मान देत, स्वतःचे डोळे मिटले होते. ह्या फोटोबद्दल सांगताना आनंद शिंदे
म्हणाले, "तुम्ही जर मनापासून त्यांच्याशी बोलला, तुमच्या भावना
एक्सप्रेस केल्या, तर तेही तुम्हाला प्रतिसाद देतात." आणि ते पटतही होतं.

आनंद शिंदे यांच्यासोबत तुषार कुलकर्णी यांच्यासोबतही गप्पा चालू होत्या,
त्यांच्याबद्दल पुढच्या पोस्टमधे…

- शंतनु शिंदे
shantanuspune@gmail.com

Friday, 5 October 2018

जेनेरिक औषधं...

काही वर्षांपूर्वी ‘डॉक्टरांनी फक्त औषधांची जेनेरिक नावं प्रिस्क्रिप्शनमधे लिहून द्यायची’ असा कायदा झाला होता हे कळालं होतं, पण कधी मी ह्या गोष्टींकडे फार लक्ष दिलं नव्हतं. फक्त कायदा झाला आहे एवढं माहित होतं. हा कायदा कशासाठी आहे, याने कोणाला फायदा होणार आहे, ह्या गोष्टी अजिबात माहित नव्हत्या.

मध्यंतरी बाबांशी चर्चा करताना ह्या कायद्याविषयी चर्चा सुरू झाली आणि बाबांनी डॉ. समित शर्मा, ज्यांनी ह्या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी चित्तोडगढ, राजस्थान इथे विशेष कष्ट घेतले, त्यांच्याविषयी आणि कायद्याविषयी वाचायला दिलं.

पहिल्यांदा औषधाचं जेनेरिक नाव म्हणजे काय, किंवा जेनेरिक औषधं म्हणजे काय, हे जाणून घेऊ. औषधामधे प्रामुख्याने काय आहे, किंवा कुठल्या केमिकल्सने ते बनलेलं आहे, हे ज्या नावामधून कळतं, ते म्हणजे जेनेरिक नाव. दुस-या शब्दांत, औषधाचं खरं नाव म्हणजे जेनेरिक नाव.

आता समस्या अशी आहे, की रूग्णांना औषधं खूप महाग मिळतात. त्यामुळं बरेच जण औषधं घ्यायचं टाळतात. डॉक्टरांकडे जाणं टाळतात. त्यामुळे खूप सारे मृत्यू हे टाळण्यासारखे असूनही घडतात. डॉक्टरांकडे न जाण्याचं कारणही औषधं महाग मिळणं हेच आहे. डॉक्टर खूप महाग औषधं लिहून देतात. मग जायचंच नाही, हा जालीम उपाय असतो. मग औषधं महाग का मिळतात? औषधांची मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट ही खूप कमी असते. म्हणजे औषधं ज्या किंमतीला मिळतात, त्याच्या ५-१० टक्केच असते. वरची सगळी कॉस्ट ही ट्रान्सपोर्टेशन, डिस्ट्रिब्यूशन, त्याच्या ठेवण्याची, साठवण्याची, आणि प्रॉफिटची असते. जर औषध मॅन्युफॅक्चर करायची कॉस्ट इतकी कमी असते, तर एवढी जास्त किंमत का ठेवतात? तर डॉ. समित शर्मा यांचे पब्लिश्ड पेपर्स वाचून मला असं कळालं, की सरकारकडून खूप कमी औषधांच्या किंमतीवर कंट्रोल ठेवला जातो. शेकडो अत्यावश्यक औषधांपैकी खूप मोजक्या औषधांवर सरकारकडून किंमतींवर कंट्रोल ठेवला जातो. त्यामुळं बाकीची औषधं बनवणा-या कंपन्या पाहिजे त्या किंमती लावतात. मग एवढ्या किंमती असूनही माणसं औषधं घेतात कशी काय? तर ही औषधं डॉक्टर त्यांच्या ब्रॅन्डनेमने लिहून देतात. त्यामुळे रूग्णांना ती औषधं घेण्याशिवाय पर्याय नसतो. मग ती कितीही महाग असो. एकाच औषधाचे अनेक ब्रॅन्ड असू शकतात हे मग रूग्णांना कळतच नाही. मलाही खूप अलिकडे पर्यंत हे माहित नव्हतं. मग जर औषधं ‘जेनेरिक नेम’नुसार लिहून दिली तर? म्हणजे जर औषधाचं मूळ नाव सांगितलं तर? मग अमुक नावाच्या औषधाचे आपल्याला वेगवेगळ्या ब्रॅन्डनुसार ऑप्शन्स समोर येतील. आपल्याला कुठला ब्रॅन्ड घ्यायचा, कुठल्या किंमतीचं औषध घ्यायचं याचा चॉईस राहिल. ब्रॅन्ड्सच्या किंमतीत फरक असेल, पण क्वालिटीत, त्याच्या स्ट्रेंन्ग्थमधे नसेल, कारण आपली औषधांची इंडस्ट्री ही खूप मोठी असून त्यातल्या ब-याच कंपन्या वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) ने, यू. एस.च्या एफ. डी. ए.नेही ॲप्रूव केलेल्या आहेत. खूप चांगल्या कंपन्या खूप कमी किंमतीत औषधं विकतात, पण डॉक्टरांनी ब्रॅन्डच्या नावाने औषधं लिहून दिल्यामुळे एका प्रकारची मोनोपॉली तयार होते, रूग्णांना ती ठराविक औषधं घेण्याशिवाय पर्याय उरत नाही, भले मग ती कितीही महाग का असेना. सर्वसाधारणपणे, कंपन्यांच्या आपापसांतल्या स्पर्धेमुळे कुठल्याही उत्पादनाची किंमत आटोक्यात राहते, पण औषधांच्या इंडस्ट्रीमधे असं होत नाही. हे सगळं टाळण्यासाठीच हा कायदा करण्यात आला.

ह्या कायद्याची चित्तोडगड (राजस्थान)मधे अंमलबजावणीनंतर छापून आलेली एक बातमी वाचताना मला असं कळालं, की सरकारी मेडिकल्स उघडल्यामुळे आणि तिकडं कमी किंमतीत औषधं उपलब्ध झाल्यामुळे सगळे तिकडे जायला लागले, त्यामुळे प्रायवेट मेडिकल्सने आपल्या किंमती कमी केल्या. सगळे रूग्ण डॉक्टरांकडे ‘जेनेरिक’ नाव लिहून द्यायला सांगू लागले, आणि त्याचबरोबर ‘आपल्याला औषधं परवडू शकतात’ हा आत्मविश्वास निर्माण झाल्याने डॉक्टरांकडे जाणा-यांची संख्या पण वाढली. हे अगदी बरोबर झालं, असं मला वाटतं. ज्याला पाहिजे, त्याने महाग औषधं घ्यावी, नाहीतर स्वस्त औषधं घ्यावी.

प्रत्येकाला चॉईस हवी, असं मला वाटतं. कोणी काय घ्यावं, हे एकच माणूस नाही ठरवू शकत, असं मला प्रामाणिकपणे वाटतं.

-शंतनु शिंदे
ई-मेल: shantanuspune@gmail.com