Wednesday, 2 October 2019

शाई पेन

पहिल्यांदा शाई पेन वापरायला मिळालं, तेव्हा कसं वाटलं होतं हे मला अजुनही आठवतंय... मला शाई पेन हवं असा मी हट्ट धरला होता. मग मला अट घालण्यात आली की, जेव्हा मी सलग दोन (ए - ४ साईज) पानं भरून लिहिल, तेव्हा मला शाई पेन मिळेल. त्या नंतर काहीच दिवसांनी मी पाच ए - ५ पानं भरून माझ्या मनात येईल तसं सलग लिहिलं, आणि बाबांना दाखवलं.

थोड्याच दिवसांनी मला छान रॅप केलेला बॉक्स मिळाला. त्यात होतं 'हिरो' कंपनीचं ब्राऊन आणि गोल्डन कलरचं एक शाईपेन!

असा प्रत्येकाचा काही ना काही किस्सा असतो. प्रत्येकाची शाई पेनशी संबंधित अशी आठवण असते असं मला वाटतं; आणि २९ तारखेला शाई पेनांचं प्रदर्शन बघायला गेल्यावर हा विचार पक्काच झाला.

हो. २९ सप्टेंबरला स्वप्नशिल्प - श्रेयस बॅन्क्वेट्स इथे 'द पुणे फाऊंटन पेन शो २०१९' झाला. आत जाण्याआधी एन्ट्री करायला सुद्धा शाई पेन देण्यात आले. आम्ही आत गेलो... आणि खेळण्याच्या दुकानात गेल्यावर छोट्या मुलाचं व्हावं तसं आमचं झालं.

१३ देशातले २५ हून अधिक ब्रॅन्ड्सचे पेन त्या प्रदर्शनात होते, आणि ते हाताळायलाही परवानगी होती! त्यामुळे प्रत्येक पेनाचा फील घेता येत होता.

पूर्वी चौथीनंतर शाळेत शाई पेन वापरणं कंपल्सरी असायचं. इतर कोणतंही पेन वापरू दिलं जायचं नाही. पण जसं जसं बॉल पेन आणि जेल पेन यांचं प्रस्थ वाढलं, तसं शाई पेनचा वापर कमी झाला. आता कोणी रोज शाई पेन वापरत नसलं, तरी चांगल्या हस्ताक्षरासाठी, सुलेखनासाठी शाई पेन 'मस्ट' आहे. हा विचार रुजवण्यासाठी, शाई पेनांचा वापर वाढवण्यासाठी, आणि त्यांचे विविध प्रकार सगळ्यांना बघायला मिळावे, म्हणून हे प्रदर्शन होतं.

आता तिथे ठेवलेल्या पेनांबद्दल बोलायचं, तर खूप सारे ब्रॅन्ड होते. उदाहरणार्थ, जर्मनीचे वाल्डमन (Waldmann), जपानचे उरुशी स्टुडियो (Urushi Studio), पॅरिसमधून वॉटरमॅन (Waterman), यु.एस.ए.ची प्रसिद्ध कंपनी पार्कर (Parker), जर्मनीची फॅबर कॅसल (Faber - Castell), ऑनलाईन (Online), आणि इतर खूप... प्रत्येकाची स्वतःची स्पेशॅलिटी होती. काहींचे फायबरचे पेन होते. काहींचे लाकडी पेन होते, काहींचे मेटलचे पेन होते. काहींचे पेन ट्रान्सपरंट होते, काहींचे पेन हॅन्ड पेंटेड होते. मटेरियलपेक्षाही प्रत्येकावरची कलाकुसर बघण्यासारखी होती. काही पेन वीतभर लांब होते, तर काही पेन बोटाएवढे पण नव्हते. थोडक्यात बघायला खूप व्हरायटी होती. सोबत शाईच्या बाटल्या (दौत), कार्ट्रेज, निब पण होत्या. निबचे वापरानुसार प्रकार होते. शाईच्या बाटल्यांचे वेगवेगळे आकार, प्रकार होते. आम्हाला तिथून एक पुस्तिका मिळाली, ज्यात पेन, शाईच्या बाटल्या, शाई, निब, इत्यादी बद्दल भरपूर माहिती आहे.

खूप मजा आली. शाई पेनमधे इतके प्रकार असू शकतात, असं वाटलं नव्हतं... माझ्यासोबत माझे बाबा पण होते. खूप माहिती मिळाली. मी रोज वापरत नसलेले शाई पेन आठवले.

ह्या सगळ्यासाठी मी आयोजक केअर स्टेशनर्सचे आभार मानतो. हा एक मस्त असा अनुभव होता. 

No comments:

Post a Comment