Saturday, 12 October 2019

पुणे वेध २०१९ : अतुल पेठे

२१ सप्टेंबर आणि २२ सप्टेंबरला, 'आय. पी. एच' प्रस्तुत आणि एम. सी. दातार क्लासेस व पळशीकर इन्स्टिट्यूट आयोजित 'वेध, पुणे' ह्या कार्यक्रमाला गेलो होतो. ह्या वर्षीच्या वेधचं सूत्र होतं, "बदल पेरणारी माणसं".

रविवारचं पहिलं सत्रं होतं प्रसिद्ध नाट्यकर्मी अतुल पेठे यांचं.

अतुल पेठे हे प्रसिद्ध लेखक, अभिनेता, नाट्य प्रशिक्षक, माहितीपटकार, आणि नाट्य दिग्दर्शक आहेत. पहिला प्रश्न होता, की त्यांच्या आयुष्यात नाटक आलं कुठून?

ते म्हणाले की त्यांनी लहाणपणी खूप नाटकं पाहिली. शाळेत पण नाटकांत काम करायची संधी मिळाली. त्यामुळं लहानपणीच त्यांनी ठरवलं होतं, की आपण मोठं होऊन नाटकांत काम करायचं. भाषा त्यांचा आवडता विषय होता. कॉलेजमधे असताना त्यांनी खूप साऱ्या एकांकिका लिहिल्या. या सगळ्याच्या दरम्यान जगात आजुबाजूला चालणाऱ्या वेगवेगळ्या गोष्टी त्यांना दिसत होत्या, अस्वस्थ करत होत्या. त्या अस्वस्थतेमुळे ते लिहायला लागले.

मग ते त्यांच्या काही प्रसिद्ध नाटकांबद्दल बोलले. सत्यशोधक, सुर्य पाहिलेला माणूस, व समाजस्वास्थ्य. या नाटकांच्या क्लिप्स पण त्यांनी दाखवल्या. मग ही नाटकं कशी तयार झाली, त्याच्या मागची प्रेरणा काय यावर चर्चा झाली.

त्या ४ – ५ मिनिटांच्या क्लिप्स पाहून, ह्या नाटकांना काही सांगायचं आहे, हे कळत होतं. प्रत्येकाचे विषय एकच नसले तरीही त्यांना जोडणारा दुवा एकच होता. तो म्हणजे सत्याचा शोध.

मग अतुल पेठे यांच्या माहितीपटातला, ‘कचराकोंडी’मधला एक सीन बघितला. त्या माहितीपटासाठी त्यांनी कचरा कामगारांसोबत काही वर्षं घालवली. त्या दरम्यान त्यांचं व्यक्तिमहत्वच बदललं. कचरा कामगार दिवसभर जे काम करतात, किंवा त्यांना जे करावं लागतं, ते अगदी अंगावर काटा आणणारं असतं. हे सगळं त्यांनी त्यांच्या ‘कचराकोंडी’ या माहितीपटात दाखवलंय.

जाता जाता ते एक अगदी छान विचार सांगून गेले. ते म्हणाले की टि.व्ही., चित्रपट, आणि नाटक ही माध्यमं एक सारखी नाहीयेत. टि.व्ही. हा आपल्याला नेहमीपेक्षा छोटं करून दाखवतं, चित्रपट आपल्याला ७० एम.एम. च्या पडद्यावर नेहमीपेक्षा मोठं करून दाखवतं. नाटक हे एकमेव माध्यम आहे, जे आपल्याला आहे तसं सगळं दाखवतं.

अतुल पेठे यांचं काम फारच छान आणि प्रेरणादायक आहे. ह्या सत्रात तर त्यांनी मोजक्याच नाटकांबद्दल, माहितीपटांबद्दल सांगितलं, पण प्रत्यक्षात त्यांचं काम खूप मोठं आहे. त्यांनी तिथे दाखलेल्या क्लिप्स बघूनच त्यांच्याबद्दल खूप उत्सुकता निर्माण झाली. मी तर त्यांचे माहितीपट, नाटकं जरूर बघणार...

- शंतनु शिंदे
ईमेल : shantanuspune@gmail.com
मोबाईल क्र.: 7887881031

No comments:

Post a Comment