Thursday, 10 October 2019

पुणे वेध २०१९ : ध्रुवांग हिंगमिरे आणि प्रियांका गुंजीकर

२१ सप्टेंबर आणि २२ सप्टेंबरला, 'आय. पी. एच' प्रस्तुत आणि एम. सी. दातार क्लासेस व पळशीकर इन्स्टिट्यूट आयोजित 'वेध, पुणे' ह्या कार्यक्रमाला गेलो होतो. ह्या वर्षीच्या वेधचं सूत्र होतं, "बदल पेरणारी माणसं".

शनिवारचं दुसरं सत्र होतं, ध्रुवांक हिंगमिरे आणि प्रियांका गुंजीकर यांचं. हे दोघं सिमेंट-वाळूची घरं बांधायच्याऐवजी माती, दगड इत्यादींचा वापर करून पर्यावरणपुरक घरं बांधतात. ते म्हणाले की सिमेंट न वापरता किंवा कमीत कमी सिमेंट वापरून घरं बनवणे ही कल्पना आमची नसून ख्यातनाम आर्किटेक्ट लॉरी बेकर यांची आहे. ते भारतीय आर्किटेक्चर शिकायला भारतात आले, तेव्हा  गांधीजींना भेटले. त्यांच्याकडून लॉरी बेकर यांना असा दृष्टिकोन मिळाला की, घर बांधण्यासाठी लागणारं मटेरियल हे त्या साईटच्या काही किलोमीटरच्या परिघातून गोळा केलेलं असावं. त्याने घर पर्यावरणपुरक होण्यास मदत होते.

लॉरी यांनी ही पद्धत त्यांच्या बऱ्याच कलाकृतींमधे वापरली. त्यात प्रयोग केले. त्यासाठी स्वतः श्रम केले.

आम्ही हीच पद्धत वापरून घर बनवतो, असं ध्रुवांक आणि प्रियांका यांनी सांगितलं. साईटजवळ जे मटेरियल असेल ते वापरायचा त्यांचा प्रयत्न असतो.

पर्यावरणपुरक घरं बांधायचं त्यांचं ठरलं कधी पासून? तर कॉलेजमधे त्यांचे प्रोफेसर होते मलकसिंग गिल. ते लॉरी बेकर यांचे शिष्य होते व त्यांचाही पर्यावरणपुरक बांधकामाकडे ओढा होता. त्यांचा विषय होता आर्किटेक्चर ॲन्ड बायोलॉजी. यांच्याकडूनच ध्रुवांक आणि प्रियांका यांच्यात पर्यावरणपुरक बांधकामाची आवड निर्माण झाली. मलकसिंग गिल बऱ्याचदा त्यांच्या स्टुडंट्सना फिल्ड विजिटला घेऊन जायचे. अशाच एका फिल्ड विजिटला त्यांनी एक घर बघितलं. ते पुर्ण मातीचं होतं. आत त्या घरात राहणाऱ्या आजींनी मातीच्या भिंतीवर बांगड्या चिकटवून छान डिझाईन बनवलं होतं. ते घर, त्यातलं वातावरण, आजींचं आदरातिथ्य वगैरे बघून त्यांनी ठरवलं, की आपण अशी घरं बांधायची.

त्यांनी मलकसिंग गिल यांच्यासोबत काही काळ काम केलं. मग स्वतःचं काम सुरू केलं.

सिमेंटचा वापर कमी का करावा, याबद्दल त्यांनी सांगितलं. सिमेंट हे लाईमस्टोन, दगड इत्यादीवर रेषीय प्रक्रिया करून घडवलेलं प्रॉडक्ट आहे. त्यामुळं सिमेंटवर परत प्रक्रिया करून आपल्याला लाईमस्टोन आणि दगड मिळू शकत नाही. म्हणून सिमेंट पर्यावरणास हानिकारक ठरतं. सिमेंटचा राडारोडा जमिनीत पुरला, तरी त्याचं काहीही होत नाही. त्याचा कशालाही उपयोग होत नाही. तसंच सिमेंटने केलेलं बांधकाम टिकाऊ असतंच असं नाही. त्याचं २५ – ३० वर्षात रिनोवेशन करवं लागतं. या उलट दगड, चुना, मातीचं बांधकाम खूप टिकाऊ असतं. बऱ्याच जुन्या बांधकामांत दगड, चुना, माती वापरली गेलीये.

ध्रुवांक आणि पियांका यांचा पर्यावरणपुरक घराचा पहिला प्रोजेक्ट भोरला होता. त्यांनी त्या प्रोजेक्टची माहिती दिली, फोटोज दाखवले. अजुन बऱ्याच प्रोजेक्ट्सबद्दल त्यांनी सांगितलं.

त्यांनी आणखी एक महत्त्वाचं सांगितलं. ते म्हणाले की जेवढ्या प्रोजेक्ट्समधे आम्हाला व्यक्तिशः लक्ष घालता येईल, तेवढेच प्रोजेक्ट्स आम्ही घेतो. आम्ही ‘संख्या’ वाढवण्याऐवजी ‘गुणवत्ता’ वाढवतो.

यानिमित्ताने ‘ग्रोथ’ आणि ‘डेव्लोपमेंट’मधला फरक खूपच छान रितीने कळाला.

- शंतनु शिंदे
ईमेल : shantanuspune@gmail.com
मोबाईल क्र.: 7887881031

No comments:

Post a Comment