Friday, 11 October 2019

पुणे वेध २०१९ : लालसू नागोटी व उज्वला बोगामी

२१ सप्टेंबर आणि २२ सप्टेंबरला, 'आय. पी. एच' प्रस्तुत आणि एम. सी. दातार क्लासेस व पळशीकर इन्स्टिट्यूट आयोजित 'वेध, पुणे' ह्या कार्यक्रमाला गेलो होतो. ह्या वर्षीच्या वेधचं सूत्र होतं, "बदल पेरणारी माणसं".

शनिवारचं तिसरं सत्र लालसू नागोटी आणि उज्वला बोगामी यांचं होतं. लालसू नागोटी हे भामरागड इथले असून ते माडिया ह्या आदिवासी जमातीतून पहिले वकिल आहेत. उज्वला बोगामी ह्या शिक्षक असून, त्यांनी इयत्ता पहिली मराठी माध्यमाच्या सर्व पाठ्यपुस्तकांचे माडिया भाषेत भाषांतर केलं आहे.

लालसू नागोटी हे मुळचे भामरागडचे. ते लहान असताना त्यांचे वडिल गेले. ते एकटे पडले. त्यावेळेस त्यांना हेमलकसाच्या बाबा आमटे यांच्या आश्रमशाळेत कोणीतरी घेऊन गेलं. तिकडे त्यांना शिक्षणाची गोडी लागली. हेमलकसातलं शिक्षण झाल्यानंतर त्यांना आनंदवनमधे शिकायला पाठवलं गेलं. आनंदवनमध्ये जितकं शिकता येत होतं तितकं ते शिकले. पुढे शिकण्यासाठी ते पुण्याला आले. ते म्हणाले, की पुण्याला येताना मी पहिल्यांदा ट्रेनमधे बसलो. त्याच्या आधी कधीच मी ट्रेनमधे बसलो नव्हतो...

फर्ग्युसन कॉलेजमधे त्यांना ॲडमिशन मिळाली. त्यांनी एम. ए. (सोश्योलॉजी) आणि एम. ए. (जर्नलिझम) अशा दोन डिग्रीज वेगवेगळ्या युनिवर्सिटीमधून घेतल्या. त्यांच्या राहण्याची सोय हॉस्टेलमधे होती. त्यांनी त्यांच्या हॉस्टेलमधली एक गंमत सांगितली. लालसू यांना जेवणात नेहमी भात लागायचा. कारण त्यांच्या गावाचं मुख्य अन्न भातच होतं. त्यांना चपाती वगैरे आवडायची नाही. पण डब्यात चपात्या आणि थोडासा भात यायचा. मग ज्यांना अजुन चपाती हवी आहे, त्यांना ते चपात्या द्यायचे, आणि त्या बदल्यात त्यांना सगळ्यांकडून भात मिळायचा. सगळ्यांसोबत हे डील ठरलेलं असायचं.

पुढे त्यांनी एल.एल.बी. पुण्याच्या आय.एन.एस. लॉ कॉलेजमधून केलं. एल.एल.बी. झाल्यानंतर ते परत भामरागडला गेले.

एल.एल.बी. झाल्यानंतर त्यांना पुण्यासारख्या शहरात नोकरी नक्कीच मिळाली असती. मग ते भामरागडला परत का गेले? ते म्हणाले की, भामरागडमधे भरपूर प्रॉब्लेम होते, आत्ताही आहेत. जेव्हा मी भामरागडला होतो, तेव्हाच ते दिसत होते, आणि त्यावर आपण काहीतरी केलं पाहिजे असं वाटत होतं. म्हणून मी लॉ शिकल्यावर भामरागडला गेलो.

तिथं गेल्यावर त्यांनी बरेच उपक्रम राबवले. स्थानिक लोकांना कायद्याची जाण व्हावी म्हणून त्यांनी काम केलं. पक्षाने उमेदवार उभा करण्यापेक्षा समाजाने मिळून उमेदवार उभा करणे शक्य आहे, हे त्यांनी भामरागडमधे कृतीतून शक्य करून दाखवलं.

ते स्वतः जिल्हा परिषदेत सदस्य आहेत. अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थांचे ते सदस्यही आहेत.

उज्वला बोगामी ह्या लालसू यांच्या पत्नी आहेत, व जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका आहेत. त्यांना मराठी भाषेची विशेष जाण आहे. त्यांनी इयत्ता पहिलीच्या पाठ्यपुस्तकांचं भाषांतर माडिया भाषेत केलं आहे. हे त्यांना कसं सुचलं? तर त्या म्हणाल्या की शिक्षिका कुठूनही असो, तिला आमच्याकडील मुलांना शिकवायला अडचण यायची. ती जर स्थानिक नसेल, तर तिची भाषा मुलांना समजायची नाही. आणि जरी ती स्थानिक असली, तरी पुस्तकामधली अवघड भाषा तिला समजावता यायची नाही. मग काही शिक्षिकांनी मिळून पाठ्यपुस्तकांच्या भाषांतराचा प्रस्ताव पाठवला, आणि ते मंजूर झाल्यावर पाठपुस्तकांच्या भाषांतराला सुरूवात झाली.

इयत्ता पहिलीची सगळी मराठी पुस्तकं त्यांनी माडिया भाषेत भाषांतरीत केली आहेत. भामरागड व जवळच्या जिल्हा परिषद शाळांमधे हीच पुस्तकं वापरली जातात.

ह्या दोघांचंही बोलणं फार प्रेरणादायक होतं. लालसू यांचा खडतर प्रवास आणि त्यांना उज्वला यांची साथ; व दोघांचंही अचाट काम त्यांच्याकडूनच माहित करून घेणं रोमांचक होतं.

हे शनिवारचं शेवटचं सत्र होतं. रविवारचं पहिलं सत्र नाट्यकर्मी अतुल पेठे यांचं होतं. त्याबद्दल पुढच्या ब्लॉगमधे.

- शंतनु शिंदे
ईमेल : shantanuspune@gmail.com
मोबाईल क्र.:7887881031

No comments:

Post a Comment