Wednesday, 22 May 2019

पास्कल


एवढ्यात ओडिसा, पश्चिम बंगाल इथं मोठं चक्रिवादळ येऊन गेलं. त्याचं नाव 'फॉनी'. ह्या चक्रिवादळातल्या वाऱ्यांचा वेग २२० किमी प्रति तास इतका होता. ह्यात बरीच वित्तहानी झाली असली तरी जिवितहानी बोटावर मोजण्याइतकीच झालीये, ही आनंदाची बाब.


असो. सांगायचा मुद्दा असा, की मी ह्या चक्रिवादळावर earth.nullschool.net ह्या साईटमार्फत लक्ष ठेवत होतो. ह्या साईटवर मला चक्रीवादळाचा वेग, तो नक्की कुठं आहे, हे सगळं दिसत होतं. दरम्यान ती साईट एक्सप्लोर करताना मला असं कळालं की, त्या साईटवर जी उंची सिलेक्ट करू, त्या उंचीवरच्या वाऱ्यांची माहिती मिळते. मी बघितलं, तर उंची ‘hPa’ ह्या एककात होती. मी जरा नेटवर शोधलं, आणि मला ‘पास्कल (pascal)’ ह्या एककाबद्दल माहिती मिळाली. ‘hPa’ म्हणजे ‘हेक्टोपास्कल’.

पास्कल हे हवेचा दाब मोजण्यासाठीचं आंतरराष्ट्रीय मेट्रिक एकक आहे. एक पास्कल म्हणजे, एका चौरस मीटरवर पडलेला एक न्यूटन इतका भार. शंभर पास्कल्स म्हणजे एक हेक्टोपास्कल (hectoPascal - hPa). एक हजार पास्कल्स (किंवा दहा हेक्टोपास्कल्स) म्हणजे एक किलोपास्कल (kiloPascal - kPa). एक हजार किलोपास्कल्स म्हणजे एक मेगापास्कल (megaPascal - mPa), आणि एक हजार मेगापास्कल्स म्हणजे एक गिगापास्कल (gigaPascal - gPa).

हवेचा दाब साधारणपणे हेक्टोपास्कल किंवा किलोपास्कलमधे मोजतात. समुद्रपातळीला हवेचा दाब 1013.25 hPa (हेक्टोपास्कल) असतो. जशी उंची वाढत जाईल, तसा हवेचा दाब कमी होत जातो. त्यामुळं उंची सांगताना जितकी जास्त उंची, तितके पास्कल्स कमी होणार.

आता एक मजा सांगतो. त्यासाठी मला ‘बार’ ह्या अजून एका दाब मोजायच्या एककाविषयी माहिती द्यावी लागेल. ‘बार’ हेही मेट्रिक एकक आहे. फक्त फरक इतका, की १ बार = १,००,००० पास्कल्स... म्हणजे १,००,००० न्युटन्सचा भार एका चौरस मीटरवर दिल्यास त्याला एक बार म्हणता येईल. आणि मी सांगत होतो ती मजा म्हणजे, सी.एन.जी हे इंधन जे सध्या बऱ्याचशा वाहनांमधे वापरता येतं, ते २०० बार्स इतकं कॉम्प्रेस्ड असतं... म्हणजे २००x१,००,००० पास्कल्स... विचार करा... गाडीच्या डिक्कीत बसवलेल्या एका टाकीत आपण २०० बार्स इतका कॉम्प्रेस केलेला सी.एन.जी घेऊन फिरत असतो...

पास्कल हे फक्त हवेचा दाब मोजण्यासाठी नाही वापरत, तर ह्या एककाचा बऱ्याच गोष्टीसाठी वापर होतो. पृथ्वीतल्या विविध थरांमधला दाब मोजण्यासाठी गिगापास्कल्स वापरले जातात. 

इलॅस्टोग्राफी अंतर्गत माणसांच्या काही स्नायूंचा कडकपणा – मऊपणा मोजण्यासाठी किलोपास्कल्सचा वापार केला जातो.

इंजिनीयरिंगमधे पदार्थांचा दणकटपणा, लवचिकता, कडकपणा मोजण्यासाठीही मेगापास्कल्स वापरले जातात. अशा अनेक गोष्टींमधे पास्कल वापरला जातो. 

आधी हवामानशास्त्रात पास्कलच्या जागी ‘बार’ वापरला जायचा, पण जशी आंतरराष्ट्रीय मानकं ठरवली गेली, तसं बऱ्याच जणांनी ‘बार’ सोडून दिला. पास्कल वापरायला सुरूवात केली. पी.एस.आय (psi) पाउंड्स पर स्क्वेअर इंच हे एककही बरंच वापरलं जायचं. पण पास्कल, बार सारखी मेट्रिक एककं आल्यावर ह्या इंपेरियल पद्धतींचा वापर कमी झाला...

बघा, कुठली गोष्ट कुणाला कुठे घेऊन जाईल, काही सांगता येत नाही. एका चक्रिवादळाने मला दाब मोजायच्या दोन एककांशी ओळख करून दिली. एक पास्कल आणि दुसरा बार. 

असो, ही सगळी माहिती विकीपिडिया (Wikipedia)वरून घेतली आहे. आकडे तपासले आहेत. माहिती उपयोगी पडली असेल अशी आशा करतो. 

धन्यवाद
लेखक : शंतनु शिंदे
ईमेल : shantanuspune@gmail.com
मो. क्र. : 7887881031

No comments:

Post a Comment