- २१ सप्टेंबर आणि २२ सप्टेंबर २०१९ला, 'आय. पी. एच' प्रस्तुत आणि एम. सी. दातार क्लासेस व पळशीकर इन्स्टिट्यूट आयोजित 'वेध, पुणे' ह्या कार्यक्रमाला गेलो होतो. ह्या वर्षीच्या वेधचं सूत्र होतं, "बदल पेरणारी माणसं".
बदल 'पेरणारी'च माणसं का? घडवणारी का नाही?
आनंद नाडकर्णी म्हणाले, बदल नेहमी पेरायचा असतो. बदल घडतो. तो घडवता येत नाही. तो बीजाच्या स्वरूपात पेरला जातो. तो कधी वाढेल की नाही ह्याची शाश्वतीही नसते. तरीही पेरणारा माणूस त्या बदलावर काम करत राहतो. त्याची काळजी घेतो. तो बदल वाढू लागला की त्यावर पण काम करतो. त्याला कोणी दाद दिली, नाही दिली, त्याला काही घेणं देणं नसतं. आपल्याला नेहमी वाटतं की, बदल घडवणारी माणसं काही वेगळी असतात, महान असतात. पण असं नसतं. ती पण आपल्यासारखीच माणसं असतात. फक्त त्यांना आपली खूबी समजलेली असते. आपलं वेगळेपण समजलेलं असतं, आणि त्यावरच ते काम करत असतात. ह्या वेळचं वेधचं गाणंही तसंच होतं.
"कुंपणे तोडूनि सारी, विरघळून गेले काही
काळाने द्यावी दाद, हा हट्टही धरला नाही"
ह्या वेधला सगळी अशीच माणसं आली होती. मी प्रत्येक सत्राचा एक, याप्रमाणं ब्लॉग लिहिले आहेत. मी रोज एक, अशा प्रकारे पोस्ट करत राहीन.
पहिलं सत्र होतं, नुपुरा किर्लोस्कर आणि जान्हवी जोशी यांचं. दोघीही प्रॉडक्ट डिझाईनर आहेत. त्यांचं एक स्टार्ट - अप आहे, ब्ली टेक इनोवेशन्स प्रायव्हेट लिमिटेड नावाचं. या कंपनी अंतर्गत ते कर्णबधिरांसाठी काही प्रॉडक्ट तयार करतात. त्यांचं प्रसिद्ध प्रॉडक्ट आहे "ब्ली वॉच". हे असं वॉच आहे जे आवाज ऐकून, ओळखून तसं वायब्रेट होतं. याची कर्णबधिरांना फार मदत होते. कोणी आपल्याला बोलवत आहे, किंवा कुकरची शिट्टी वाजत आहे, बाळ रडत आहे, अशा छोट्या पण महत्वाच्या गोष्टी त्यांना कळतात.
या प्रकारची कल्पना नुपूरा आणि जान्हवी यांना आली, ती डान्समधून. दोघी एका कथ्थकच्या कार्यक्रमाला गेल्या होत्या. तिथे एका ग्रूपने सुरेख असं सादरीकरण केलं, आणि मग सांगण्यात आलं, की हा पूर्ण ग्रूप कर्णबधिरांचा होता. त्यांची ताई पुर्णवेळ समोर उभी राहून त्यांना ठेका दाखवत होती व तो ग्रूप तिच्याकडे बघून नाचत होता.
आधी दोघींना वाटलं की शाळेतून त्यांना सादरीकरण कंपल्सरी केलं असेल. कारण जी गोष्ट ऐकूच येत नाही त्यावर डान्स करायला त्यांना कसं आवडेल? पण त्या शाळेत गेल्यावर त्यांना कळालं, की कर्णबधिरांना डान्स करायची खूप आवड असते, पण ऐकू येत नसल्याने त्यांना काही मर्यादा येतात. मग त्यांना एकजण गाणं ऐकून ठेका हाताने दाखवतो, आणि तो ठेका बघून ते डान्स करतात.
मग हेच काम करणारा बॅन्ड दोघींनी बनवला, जो ठेका दाखवायच्या ऐवजी तसा हातात वायब्रेट होतो. त्यामुळे त्यांची अवलंबता कमी झाली. त्यांना कुठंतरी बघून नाचायच्या ऐवजी स्वतःहून डान्स करता आला. हा त्यांनी कॉलेज प्रोजेक्ट म्हणून पुर्ण केला. त्यातूनच त्यांना 'ब्ली वॉच'ची कल्पना आली. आणि हळूहळू करत त्यांनी त्यांच्या वॉचमधे रिदमसोबतच आणखी विविध फिचर्स ॲड केले.
तसंच त्यांनी 'ब्ली टिव्ही' नावाचं ॲप बनवलं. ज्यात कर्णबधिरांसाठी खास चिन्हभाषेमधे माहितीपुर्वक विडियो असतात. यात आजवर काहीशे विडियोज उपलब्ध आहेत. नुपुरा आणि जान्हवी यांनी सांगितलं, की कर्णबधिरांना ऐकू येत नसल्यामुळे त्यांना बऱ्याच लहान सहान गोष्टींची माहिती नसते. त्यासाठी त्यांनी हे ॲप बनवलं.
हे सगळं त्यांनी कसं केलं यावर ते बोलले. त्यांचे अनुभव, गमती जमती, अभिमानाचे क्षण त्यांनी शेअर केले. त्या म्हणाल्या की, कर्णबधिरांना हियरिंग एडची गरज असते असं आपल्याला वाटतं. पण प्रत्यक्षात त्यांच्याशी बोलल्यावर कळालं त्यांना त्याची गरज नसते. त्यांना ऐकायची सवय नसते. त्यामुळे अचानक ऐकू यायला लागलं की त्यांना कळेनासं होतं. आवाज डोक्यात फिरतात. त्यामुळं ते हियरिंग एड्स वापरत नाहीत. दोघी म्हणाल्या, आपण जेव्हा एका विशिष्ट वर्गासाठी काम करतो, तेव्हा त्यांचे अनुभव, त्यांची मतं लक्षात घेणं खूप महत्त्वाचं असतं. दोघींचंही चिन्हभाषेवर प्रभुत्व आहे.
या सत्रातून नवा दृष्टिकोन मिळाला. 'ज्यांना ऐकू येत नाही त्यांच्यासाठी हिअरिंग एड' असं साधं समीकरण आपल्या डोक्यात असतं. पण त्याचाही पलीकडे काही असू शकतं हे ह्या सत्रात कळालं. एका साध्या कल्पनेचं, एका कंपनीमधे रूपांतर कसं होतं, एक एक टप्पा कसा वाढत जातो, हे मला कळालं.
लेखक : शंतनु शिंदे
ई-मेल : shantanuspune@gmail.com
फोन नं.: 7887881031
No comments:
Post a Comment