Sunday, 13 October 2019

पुणे वेध २०१९ : असिता सेन व अनिश सेन

२१ सप्टेंबर आणि २२ सप्टेंबरला, 'आय. पी. एच' प्रस्तुत आणि एम. सी. दातार क्लासेस व पळशीकर इन्स्टिट्यूट आयोजित 'वेध, पुणे' ह्या कार्यक्रमाला गेलो होतो. ह्या वर्षीच्या वेधचं सूत्र होतं, "बदल पेरणारी माणसं".

पुढचं सत्र होतं अनिश नाथ आणि असिता नाथ याचं. दोघांनी लखनौ जवळच्या पश्चिम नावाच्या गावात “गुड हार्वेस्ट स्कूल” नावाची मुलींसाठी शेतीचं शिक्षण देणारी भारतातील पहिली प्राथमिक शाळा सुरू केलीये. आणि विशेष म्हणजे दिल्लीतली चांगली, भरपूर पैसे देणारी नोकरी सोडून दोघं त्यांच्या आवडत्या क्षेत्रात आहेत. त्यामुळं शाळा का सुरू करावीशी वाटली हा प्रश्न आहेच, पण त्यांना आधी विचारण्यात आलं, की तुम्हाला नोकरी सोडावीशी का वाटली?

अनिश नाथ म्हणाले, की त्यांच्या कंपनीत काम करणारे सगळे सिनिअर्स हे खूप स्ट्रेसमधे असायचे. त्यांच्याकडे बघून असं वाटायचं, की आपल्याला प्रमोशन मिळाल्यावर आपण पण असंच स्ट्रेस खाली वावरणार का? हे लक्षात आल्यापासून त्यांनी ठरवून टाकलं, की आपण एखाद्या गावात जाऊन शेती करायची. त्यांनी पटकन निर्णय घेतला, आणि लखनौजवळच्या ‘पश्चिम’ नावाच्या गावात २ एकर जागा घेतली.

आता हे गाव म्हणजे काही त्यांचं मुळचं गाव नव्हे. त्यामुळे तिथं रहायचं म्हणजे ओळखी बनवण्यापासून सुरूवात होती. असं सगळं होत असताना, त्यांना काही गोष्टी लक्षात आल्या, पहिली गोष्ट, इकडची बरीचशी मुलं मुली कुठंही शिकायला जात नाहीत. बरीचशी घरकामातच मदत करतात, छोट्या भावंडांना संभाळतात, गुरं चरायला नेतात, इकडं तिकडं हिंडतात. दुसरी, इकडच्या तरूण लोकांना शेती करायची अजिबात इच्छा नाही. प्रत्येकाला शहरात जायचं आहे. गावात खूप कमी लोक आहेत की ज्यांना शेती करायची आहे. ह्या दोन्ही गोष्टी बघून अनिश आणि असिता ह्यांना वाटलं, ह्या लोकांना शिक्षण तर मिळालं पाहिजे, तसंच तरूण लोकांनी शेती सुरू करावी, म्हणूनही काहीतरी केलं पाहिजे. ह्या गावात शेती जरा जुन्या पद्धतीने होते. इतर ठिकाणी एका वर्षात ३ पिकं काढली जातात. पश्चिम गावात एका वर्षात एकच पिक काढलं जातं. त्यामुळं त्यांना शेतीतल्या नविन पद्धती शिकवणं भाग होतं. त्यासाठी शाळा काढली पाहिजे.

मग त्यांनी गावकऱ्यांना समजावायला सुरूवात केली. गावकऱ्यांना वाटायचं की हे आपल्याला शेती काय शिकवणार? अजुन काय शिकायचंय? इतकी वर्षं शेती तर करतोय… असे भरपूर प्रश्न असायचे. मुलांना काय शिकवणार? शाळा कुठे भरवणार? बिल्डिंग नाही तर शाळा कशी भरवणार?

अशा सगळ्या प्रश्नांची त्यांनी उत्तरं दिली. थोडा विश्वास बसल्यावर त्यांनी काही मुलींना पाठवलं. पहिल्यांदा एकूण ६ मुली होत्या, पण सध्या वाढत वाढत संख्या ४६च्या वर गेलीये. २०१६ साली त्यांनी गूड हार्वेस्ट स्कूल चालू केली. २०१४ साली अनिश आणि असिता नाथ या गावात राहायला आले होते.

त्यांना विचारण्यात आलं, की त्यांनी फक्त मुलींची शाळा का काढली? मुलींना शेतीचं शिक्षण द्यायचं का ठरवलं? सर्वसाधारणपणे आपण बघतो, की शेतकरी पुरूष असतात. मग फक्त मुलींना शेतीचं शिक्षण का?

त्यांनी सांगितलं, हा दृष्टिकोन थोडा चुकीचा आहे. आपल्याला ट्रॅक्टर चालवताना किंवा काही ठराविक कामं करताना पुरूष दिसतात, म्हणून आपण म्हणतो की शेतकरी पुरूष असतात. खरंतर शेतीतली बरीच कामं स्त्रिया करतात. शेतातली बरीच कामं अशी असतात, की जी फक्त स्त्रियाच करू शकतात. त्यामुळे त्यांना शिक्षण मिळणं सगळ्यात जास्त महत्त्वाचं होतं.

ह्या शाळेत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, ह्या शाळेत इयत्ता नाहीत. इकडच्या अगदी लहान मुलीपासून १५ – १६ वर्षांच्या मुलींपर्यंत सगळे एकत्रच शिकतात. प्रत्येकाचा शिकण्याचा कल, वेग वेगवेगळा असू शकतो. त्यामुळे ह्या शाळेत मुलं त्यांना जे आवडेल ते, आवडेल तेव्हा शिकतात. कोणावरही बंधनं नसतात.

ह्या शाळेत फक्त शेती शिकवली जात नाही, तर शेतीपूरक ‘पशूपालन’ आणि इतरही काही गोष्टी शिकवल्या जातात. वेगवेगळे विषय, लिहायला वाचायला शिकवलं जातं. अनिश आणि असिता यांनी २०२२ पर्यंत शाळेला शाळेच्या उत्पन्नातून सक्षम बनवायचं ठरवलं आहे.

मी ह्या शाळेबद्दल कधीच ऐकलं नव्हतं. मुलींना शेतीविषयक शिक्षण देणारी प्राथमिक शाळा बघून, त्याबद्दल ऐकून खरंच खूप छान वाटलं.

Saturday, 12 October 2019

पुणे वेध २०१९ : अतुल पेठे

२१ सप्टेंबर आणि २२ सप्टेंबरला, 'आय. पी. एच' प्रस्तुत आणि एम. सी. दातार क्लासेस व पळशीकर इन्स्टिट्यूट आयोजित 'वेध, पुणे' ह्या कार्यक्रमाला गेलो होतो. ह्या वर्षीच्या वेधचं सूत्र होतं, "बदल पेरणारी माणसं".

रविवारचं पहिलं सत्रं होतं प्रसिद्ध नाट्यकर्मी अतुल पेठे यांचं.

अतुल पेठे हे प्रसिद्ध लेखक, अभिनेता, नाट्य प्रशिक्षक, माहितीपटकार, आणि नाट्य दिग्दर्शक आहेत. पहिला प्रश्न होता, की त्यांच्या आयुष्यात नाटक आलं कुठून?

ते म्हणाले की त्यांनी लहाणपणी खूप नाटकं पाहिली. शाळेत पण नाटकांत काम करायची संधी मिळाली. त्यामुळं लहानपणीच त्यांनी ठरवलं होतं, की आपण मोठं होऊन नाटकांत काम करायचं. भाषा त्यांचा आवडता विषय होता. कॉलेजमधे असताना त्यांनी खूप साऱ्या एकांकिका लिहिल्या. या सगळ्याच्या दरम्यान जगात आजुबाजूला चालणाऱ्या वेगवेगळ्या गोष्टी त्यांना दिसत होत्या, अस्वस्थ करत होत्या. त्या अस्वस्थतेमुळे ते लिहायला लागले.

मग ते त्यांच्या काही प्रसिद्ध नाटकांबद्दल बोलले. सत्यशोधक, सुर्य पाहिलेला माणूस, व समाजस्वास्थ्य. या नाटकांच्या क्लिप्स पण त्यांनी दाखवल्या. मग ही नाटकं कशी तयार झाली, त्याच्या मागची प्रेरणा काय यावर चर्चा झाली.

त्या ४ – ५ मिनिटांच्या क्लिप्स पाहून, ह्या नाटकांना काही सांगायचं आहे, हे कळत होतं. प्रत्येकाचे विषय एकच नसले तरीही त्यांना जोडणारा दुवा एकच होता. तो म्हणजे सत्याचा शोध.

मग अतुल पेठे यांच्या माहितीपटातला, ‘कचराकोंडी’मधला एक सीन बघितला. त्या माहितीपटासाठी त्यांनी कचरा कामगारांसोबत काही वर्षं घालवली. त्या दरम्यान त्यांचं व्यक्तिमहत्वच बदललं. कचरा कामगार दिवसभर जे काम करतात, किंवा त्यांना जे करावं लागतं, ते अगदी अंगावर काटा आणणारं असतं. हे सगळं त्यांनी त्यांच्या ‘कचराकोंडी’ या माहितीपटात दाखवलंय.

जाता जाता ते एक अगदी छान विचार सांगून गेले. ते म्हणाले की टि.व्ही., चित्रपट, आणि नाटक ही माध्यमं एक सारखी नाहीयेत. टि.व्ही. हा आपल्याला नेहमीपेक्षा छोटं करून दाखवतं, चित्रपट आपल्याला ७० एम.एम. च्या पडद्यावर नेहमीपेक्षा मोठं करून दाखवतं. नाटक हे एकमेव माध्यम आहे, जे आपल्याला आहे तसं सगळं दाखवतं.

अतुल पेठे यांचं काम फारच छान आणि प्रेरणादायक आहे. ह्या सत्रात तर त्यांनी मोजक्याच नाटकांबद्दल, माहितीपटांबद्दल सांगितलं, पण प्रत्यक्षात त्यांचं काम खूप मोठं आहे. त्यांनी तिथे दाखलेल्या क्लिप्स बघूनच त्यांच्याबद्दल खूप उत्सुकता निर्माण झाली. मी तर त्यांचे माहितीपट, नाटकं जरूर बघणार...

- शंतनु शिंदे
ईमेल : shantanuspune@gmail.com
मोबाईल क्र.: 7887881031

Friday, 11 October 2019

पुणे वेध २०१९ : लालसू नागोटी व उज्वला बोगामी

२१ सप्टेंबर आणि २२ सप्टेंबरला, 'आय. पी. एच' प्रस्तुत आणि एम. सी. दातार क्लासेस व पळशीकर इन्स्टिट्यूट आयोजित 'वेध, पुणे' ह्या कार्यक्रमाला गेलो होतो. ह्या वर्षीच्या वेधचं सूत्र होतं, "बदल पेरणारी माणसं".

शनिवारचं तिसरं सत्र लालसू नागोटी आणि उज्वला बोगामी यांचं होतं. लालसू नागोटी हे भामरागड इथले असून ते माडिया ह्या आदिवासी जमातीतून पहिले वकिल आहेत. उज्वला बोगामी ह्या शिक्षक असून, त्यांनी इयत्ता पहिली मराठी माध्यमाच्या सर्व पाठ्यपुस्तकांचे माडिया भाषेत भाषांतर केलं आहे.

लालसू नागोटी हे मुळचे भामरागडचे. ते लहान असताना त्यांचे वडिल गेले. ते एकटे पडले. त्यावेळेस त्यांना हेमलकसाच्या बाबा आमटे यांच्या आश्रमशाळेत कोणीतरी घेऊन गेलं. तिकडे त्यांना शिक्षणाची गोडी लागली. हेमलकसातलं शिक्षण झाल्यानंतर त्यांना आनंदवनमधे शिकायला पाठवलं गेलं. आनंदवनमध्ये जितकं शिकता येत होतं तितकं ते शिकले. पुढे शिकण्यासाठी ते पुण्याला आले. ते म्हणाले, की पुण्याला येताना मी पहिल्यांदा ट्रेनमधे बसलो. त्याच्या आधी कधीच मी ट्रेनमधे बसलो नव्हतो...

फर्ग्युसन कॉलेजमधे त्यांना ॲडमिशन मिळाली. त्यांनी एम. ए. (सोश्योलॉजी) आणि एम. ए. (जर्नलिझम) अशा दोन डिग्रीज वेगवेगळ्या युनिवर्सिटीमधून घेतल्या. त्यांच्या राहण्याची सोय हॉस्टेलमधे होती. त्यांनी त्यांच्या हॉस्टेलमधली एक गंमत सांगितली. लालसू यांना जेवणात नेहमी भात लागायचा. कारण त्यांच्या गावाचं मुख्य अन्न भातच होतं. त्यांना चपाती वगैरे आवडायची नाही. पण डब्यात चपात्या आणि थोडासा भात यायचा. मग ज्यांना अजुन चपाती हवी आहे, त्यांना ते चपात्या द्यायचे, आणि त्या बदल्यात त्यांना सगळ्यांकडून भात मिळायचा. सगळ्यांसोबत हे डील ठरलेलं असायचं.

पुढे त्यांनी एल.एल.बी. पुण्याच्या आय.एन.एस. लॉ कॉलेजमधून केलं. एल.एल.बी. झाल्यानंतर ते परत भामरागडला गेले.

एल.एल.बी. झाल्यानंतर त्यांना पुण्यासारख्या शहरात नोकरी नक्कीच मिळाली असती. मग ते भामरागडला परत का गेले? ते म्हणाले की, भामरागडमधे भरपूर प्रॉब्लेम होते, आत्ताही आहेत. जेव्हा मी भामरागडला होतो, तेव्हाच ते दिसत होते, आणि त्यावर आपण काहीतरी केलं पाहिजे असं वाटत होतं. म्हणून मी लॉ शिकल्यावर भामरागडला गेलो.

तिथं गेल्यावर त्यांनी बरेच उपक्रम राबवले. स्थानिक लोकांना कायद्याची जाण व्हावी म्हणून त्यांनी काम केलं. पक्षाने उमेदवार उभा करण्यापेक्षा समाजाने मिळून उमेदवार उभा करणे शक्य आहे, हे त्यांनी भामरागडमधे कृतीतून शक्य करून दाखवलं.

ते स्वतः जिल्हा परिषदेत सदस्य आहेत. अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थांचे ते सदस्यही आहेत.

उज्वला बोगामी ह्या लालसू यांच्या पत्नी आहेत, व जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका आहेत. त्यांना मराठी भाषेची विशेष जाण आहे. त्यांनी इयत्ता पहिलीच्या पाठ्यपुस्तकांचं भाषांतर माडिया भाषेत केलं आहे. हे त्यांना कसं सुचलं? तर त्या म्हणाल्या की शिक्षिका कुठूनही असो, तिला आमच्याकडील मुलांना शिकवायला अडचण यायची. ती जर स्थानिक नसेल, तर तिची भाषा मुलांना समजायची नाही. आणि जरी ती स्थानिक असली, तरी पुस्तकामधली अवघड भाषा तिला समजावता यायची नाही. मग काही शिक्षिकांनी मिळून पाठ्यपुस्तकांच्या भाषांतराचा प्रस्ताव पाठवला, आणि ते मंजूर झाल्यावर पाठपुस्तकांच्या भाषांतराला सुरूवात झाली.

इयत्ता पहिलीची सगळी मराठी पुस्तकं त्यांनी माडिया भाषेत भाषांतरीत केली आहेत. भामरागड व जवळच्या जिल्हा परिषद शाळांमधे हीच पुस्तकं वापरली जातात.

ह्या दोघांचंही बोलणं फार प्रेरणादायक होतं. लालसू यांचा खडतर प्रवास आणि त्यांना उज्वला यांची साथ; व दोघांचंही अचाट काम त्यांच्याकडूनच माहित करून घेणं रोमांचक होतं.

हे शनिवारचं शेवटचं सत्र होतं. रविवारचं पहिलं सत्र नाट्यकर्मी अतुल पेठे यांचं होतं. त्याबद्दल पुढच्या ब्लॉगमधे.

- शंतनु शिंदे
ईमेल : shantanuspune@gmail.com
मोबाईल क्र.:7887881031

Thursday, 10 October 2019

पुणे वेध २०१९ : ध्रुवांग हिंगमिरे आणि प्रियांका गुंजीकर

२१ सप्टेंबर आणि २२ सप्टेंबरला, 'आय. पी. एच' प्रस्तुत आणि एम. सी. दातार क्लासेस व पळशीकर इन्स्टिट्यूट आयोजित 'वेध, पुणे' ह्या कार्यक्रमाला गेलो होतो. ह्या वर्षीच्या वेधचं सूत्र होतं, "बदल पेरणारी माणसं".

शनिवारचं दुसरं सत्र होतं, ध्रुवांक हिंगमिरे आणि प्रियांका गुंजीकर यांचं. हे दोघं सिमेंट-वाळूची घरं बांधायच्याऐवजी माती, दगड इत्यादींचा वापर करून पर्यावरणपुरक घरं बांधतात. ते म्हणाले की सिमेंट न वापरता किंवा कमीत कमी सिमेंट वापरून घरं बनवणे ही कल्पना आमची नसून ख्यातनाम आर्किटेक्ट लॉरी बेकर यांची आहे. ते भारतीय आर्किटेक्चर शिकायला भारतात आले, तेव्हा  गांधीजींना भेटले. त्यांच्याकडून लॉरी बेकर यांना असा दृष्टिकोन मिळाला की, घर बांधण्यासाठी लागणारं मटेरियल हे त्या साईटच्या काही किलोमीटरच्या परिघातून गोळा केलेलं असावं. त्याने घर पर्यावरणपुरक होण्यास मदत होते.

लॉरी यांनी ही पद्धत त्यांच्या बऱ्याच कलाकृतींमधे वापरली. त्यात प्रयोग केले. त्यासाठी स्वतः श्रम केले.

आम्ही हीच पद्धत वापरून घर बनवतो, असं ध्रुवांक आणि प्रियांका यांनी सांगितलं. साईटजवळ जे मटेरियल असेल ते वापरायचा त्यांचा प्रयत्न असतो.

पर्यावरणपुरक घरं बांधायचं त्यांचं ठरलं कधी पासून? तर कॉलेजमधे त्यांचे प्रोफेसर होते मलकसिंग गिल. ते लॉरी बेकर यांचे शिष्य होते व त्यांचाही पर्यावरणपुरक बांधकामाकडे ओढा होता. त्यांचा विषय होता आर्किटेक्चर ॲन्ड बायोलॉजी. यांच्याकडूनच ध्रुवांक आणि प्रियांका यांच्यात पर्यावरणपुरक बांधकामाची आवड निर्माण झाली. मलकसिंग गिल बऱ्याचदा त्यांच्या स्टुडंट्सना फिल्ड विजिटला घेऊन जायचे. अशाच एका फिल्ड विजिटला त्यांनी एक घर बघितलं. ते पुर्ण मातीचं होतं. आत त्या घरात राहणाऱ्या आजींनी मातीच्या भिंतीवर बांगड्या चिकटवून छान डिझाईन बनवलं होतं. ते घर, त्यातलं वातावरण, आजींचं आदरातिथ्य वगैरे बघून त्यांनी ठरवलं, की आपण अशी घरं बांधायची.

त्यांनी मलकसिंग गिल यांच्यासोबत काही काळ काम केलं. मग स्वतःचं काम सुरू केलं.

सिमेंटचा वापर कमी का करावा, याबद्दल त्यांनी सांगितलं. सिमेंट हे लाईमस्टोन, दगड इत्यादीवर रेषीय प्रक्रिया करून घडवलेलं प्रॉडक्ट आहे. त्यामुळं सिमेंटवर परत प्रक्रिया करून आपल्याला लाईमस्टोन आणि दगड मिळू शकत नाही. म्हणून सिमेंट पर्यावरणास हानिकारक ठरतं. सिमेंटचा राडारोडा जमिनीत पुरला, तरी त्याचं काहीही होत नाही. त्याचा कशालाही उपयोग होत नाही. तसंच सिमेंटने केलेलं बांधकाम टिकाऊ असतंच असं नाही. त्याचं २५ – ३० वर्षात रिनोवेशन करवं लागतं. या उलट दगड, चुना, मातीचं बांधकाम खूप टिकाऊ असतं. बऱ्याच जुन्या बांधकामांत दगड, चुना, माती वापरली गेलीये.

ध्रुवांक आणि पियांका यांचा पर्यावरणपुरक घराचा पहिला प्रोजेक्ट भोरला होता. त्यांनी त्या प्रोजेक्टची माहिती दिली, फोटोज दाखवले. अजुन बऱ्याच प्रोजेक्ट्सबद्दल त्यांनी सांगितलं.

त्यांनी आणखी एक महत्त्वाचं सांगितलं. ते म्हणाले की जेवढ्या प्रोजेक्ट्समधे आम्हाला व्यक्तिशः लक्ष घालता येईल, तेवढेच प्रोजेक्ट्स आम्ही घेतो. आम्ही ‘संख्या’ वाढवण्याऐवजी ‘गुणवत्ता’ वाढवतो.

यानिमित्ताने ‘ग्रोथ’ आणि ‘डेव्लोपमेंट’मधला फरक खूपच छान रितीने कळाला.

- शंतनु शिंदे
ईमेल : shantanuspune@gmail.com
मोबाईल क्र.: 7887881031

Wednesday, 9 October 2019

पुणे वेध २०१९ : नुपुरा किर्लोस्कर आणि जान्हवी जोशी


  • २१ सप्टेंबर आणि २२ सप्टेंबर २०१९ला, 'आय. पी. एच' प्रस्तुत आणि एम. सी. दातार क्लासेस व पळशीकर इन्स्टिट्यूट आयोजित 'वेध, पुणे' ह्या कार्यक्रमाला गेलो होतो. ह्या वर्षीच्या वेधचं सूत्र होतं, "बदल पेरणारी माणसं".


बदल 'पेरणारी'च माणसं का? घडवणारी का नाही?

आनंद नाडकर्णी म्हणाले, बदल नेहमी पेरायचा असतो. बदल घडतो. तो घडवता येत नाही. तो बीजाच्या स्वरूपात पेरला जातो. तो कधी वाढेल की नाही ह्याची शाश्वतीही नसते. तरीही पेरणारा माणूस त्या बदलावर काम करत राहतो. त्याची काळजी घेतो. तो बदल वाढू लागला की त्यावर पण काम करतो. त्याला कोणी दाद दिली, नाही दिली, त्याला काही घेणं देणं नसतं. आपल्याला नेहमी वाटतं की, बदल घडवणारी माणसं काही वेगळी असतात, महान असतात. पण असं नसतं. ती पण आपल्यासारखीच माणसं असतात. फक्त त्यांना आपली खूबी समजलेली असते. आपलं वेगळेपण समजलेलं असतं, आणि त्यावरच ते काम करत असतात. ह्या वेळचं वेधचं गाणंही तसंच होतं.

"कुंपणे तोडूनि सारी, विरघळून गेले काही
काळाने द्यावी दाद, हा हट्टही धरला नाही"

ह्या वेधला सगळी अशीच माणसं आली होती. मी प्रत्येक सत्राचा एक, याप्रमाणं ब्लॉग लिहिले आहेत. मी रोज एक, अशा प्रकारे पोस्ट करत राहीन.

पहिलं सत्र होतं, नुपुरा किर्लोस्कर आणि जान्हवी जोशी यांचं. दोघीही प्रॉडक्ट डिझाईनर आहेत. त्यांचं एक स्टार्ट - अप आहे, ब्ली टेक इनोवेशन्स प्रायव्हेट लिमिटेड नावाचं. या कंपनी अंतर्गत ते कर्णबधिरांसाठी काही प्रॉडक्ट तयार करतात. त्यांचं प्रसिद्ध प्रॉडक्ट आहे "ब्ली वॉच". हे असं वॉच आहे जे आवाज ऐकून, ओळखून तसं वायब्रेट होतं. याची कर्णबधिरांना फार मदत होते. कोणी आपल्याला बोलवत आहे, किंवा कुकरची शिट्टी वाजत आहे, बाळ रडत आहे, अशा छोट्या पण महत्वाच्या गोष्टी त्यांना कळतात.

या प्रकारची कल्पना नुपूरा आणि जान्हवी यांना आली, ती डान्समधून. दोघी एका कथ्थकच्या कार्यक्रमाला गेल्या होत्या. तिथे एका ग्रूपने सुरेख असं सादरीकरण केलं, आणि मग सांगण्यात आलं, की हा पूर्ण ग्रूप कर्णबधिरांचा होता. त्यांची ताई पुर्णवेळ समोर उभी राहून त्यांना ठेका दाखवत होती व तो ग्रूप तिच्याकडे बघून नाचत होता.

आधी दोघींना वाटलं की शाळेतून त्यांना सादरीकरण कंपल्सरी केलं असेल. कारण जी गोष्ट ऐकूच येत नाही त्यावर डान्स करायला त्यांना कसं आवडेल? पण त्या शाळेत गेल्यावर त्यांना कळालं, की कर्णबधिरांना डान्स करायची खूप आवड असते, पण ऐकू येत नसल्याने त्यांना काही मर्यादा येतात. मग त्यांना एकजण गाणं ऐकून ठेका हाताने दाखवतो, आणि तो ठेका बघून ते डान्स करतात.

मग हेच काम करणारा बॅन्ड दोघींनी बनवला, जो ठेका दाखवायच्या ऐवजी तसा हातात वायब्रेट होतो. त्यामुळे त्यांची अवलंबता कमी झाली. त्यांना कुठंतरी बघून नाचायच्या ऐवजी स्वतःहून डान्स करता आला. हा त्यांनी कॉलेज प्रोजेक्ट म्हणून पुर्ण केला. त्यातूनच त्यांना 'ब्ली वॉच'ची कल्पना आली. आणि हळूहळू करत त्यांनी त्यांच्या वॉचमधे रिदमसोबतच आणखी विविध फिचर्स ॲड केले.

तसंच त्यांनी 'ब्ली टिव्ही' नावाचं ॲप बनवलं. ज्यात कर्णबधिरांसाठी खास चिन्हभाषेमधे माहितीपुर्वक विडियो असतात. यात आजवर काहीशे विडियोज उपलब्ध आहेत. नुपुरा आणि जान्हवी यांनी सांगितलं, की कर्णबधिरांना ऐकू येत नसल्यामुळे त्यांना बऱ्याच लहान सहान गोष्टींची माहिती नसते. त्यासाठी त्यांनी हे ॲप बनवलं.

हे सगळं त्यांनी कसं केलं यावर ते बोलले. त्यांचे अनुभव, गमती जमती, अभिमानाचे क्षण त्यांनी शेअर केले. त्या म्हणाल्या की, कर्णबधिरांना हियरिंग एडची गरज असते असं आपल्याला वाटतं. पण प्रत्यक्षात त्यांच्याशी बोलल्यावर कळालं त्यांना त्याची गरज नसते. त्यांना ऐकायची सवय नसते. त्यामुळे अचानक ऐकू यायला लागलं की त्यांना कळेनासं होतं. आवाज डोक्यात फिरतात. त्यामुळं ते हियरिंग एड्स वापरत नाहीत. दोघी म्हणाल्या, आपण जेव्हा एका विशिष्ट वर्गासाठी काम करतो, तेव्हा त्यांचे अनुभव, त्यांची मतं लक्षात घेणं खूप महत्त्वाचं असतं. दोघींचंही चिन्हभाषेवर प्रभुत्व आहे.

या सत्रातून नवा दृष्टिकोन मिळाला. 'ज्यांना ऐकू येत नाही त्यांच्यासाठी हिअरिंग एड' असं साधं समीकरण आपल्या डोक्यात असतं. पण त्याचाही पलीकडे काही असू शकतं हे ह्या सत्रात कळालं. एका साध्या कल्पनेचं, एका कंपनीमधे रूपांतर कसं होतं, एक एक टप्पा कसा वाढत जातो, हे मला कळालं.


लेखक : शंतनु शिंदे
ई-मेल : shantanuspune@gmail.com
फोन नं.: 7887881031

Wednesday, 2 October 2019

शाई पेन

पहिल्यांदा शाई पेन वापरायला मिळालं, तेव्हा कसं वाटलं होतं हे मला अजुनही आठवतंय... मला शाई पेन हवं असा मी हट्ट धरला होता. मग मला अट घालण्यात आली की, जेव्हा मी सलग दोन (ए - ४ साईज) पानं भरून लिहिल, तेव्हा मला शाई पेन मिळेल. त्या नंतर काहीच दिवसांनी मी पाच ए - ५ पानं भरून माझ्या मनात येईल तसं सलग लिहिलं, आणि बाबांना दाखवलं.

थोड्याच दिवसांनी मला छान रॅप केलेला बॉक्स मिळाला. त्यात होतं 'हिरो' कंपनीचं ब्राऊन आणि गोल्डन कलरचं एक शाईपेन!

असा प्रत्येकाचा काही ना काही किस्सा असतो. प्रत्येकाची शाई पेनशी संबंधित अशी आठवण असते असं मला वाटतं; आणि २९ तारखेला शाई पेनांचं प्रदर्शन बघायला गेल्यावर हा विचार पक्काच झाला.

हो. २९ सप्टेंबरला स्वप्नशिल्प - श्रेयस बॅन्क्वेट्स इथे 'द पुणे फाऊंटन पेन शो २०१९' झाला. आत जाण्याआधी एन्ट्री करायला सुद्धा शाई पेन देण्यात आले. आम्ही आत गेलो... आणि खेळण्याच्या दुकानात गेल्यावर छोट्या मुलाचं व्हावं तसं आमचं झालं.

१३ देशातले २५ हून अधिक ब्रॅन्ड्सचे पेन त्या प्रदर्शनात होते, आणि ते हाताळायलाही परवानगी होती! त्यामुळे प्रत्येक पेनाचा फील घेता येत होता.

पूर्वी चौथीनंतर शाळेत शाई पेन वापरणं कंपल्सरी असायचं. इतर कोणतंही पेन वापरू दिलं जायचं नाही. पण जसं जसं बॉल पेन आणि जेल पेन यांचं प्रस्थ वाढलं, तसं शाई पेनचा वापर कमी झाला. आता कोणी रोज शाई पेन वापरत नसलं, तरी चांगल्या हस्ताक्षरासाठी, सुलेखनासाठी शाई पेन 'मस्ट' आहे. हा विचार रुजवण्यासाठी, शाई पेनांचा वापर वाढवण्यासाठी, आणि त्यांचे विविध प्रकार सगळ्यांना बघायला मिळावे, म्हणून हे प्रदर्शन होतं.

आता तिथे ठेवलेल्या पेनांबद्दल बोलायचं, तर खूप सारे ब्रॅन्ड होते. उदाहरणार्थ, जर्मनीचे वाल्डमन (Waldmann), जपानचे उरुशी स्टुडियो (Urushi Studio), पॅरिसमधून वॉटरमॅन (Waterman), यु.एस.ए.ची प्रसिद्ध कंपनी पार्कर (Parker), जर्मनीची फॅबर कॅसल (Faber - Castell), ऑनलाईन (Online), आणि इतर खूप... प्रत्येकाची स्वतःची स्पेशॅलिटी होती. काहींचे फायबरचे पेन होते. काहींचे लाकडी पेन होते, काहींचे मेटलचे पेन होते. काहींचे पेन ट्रान्सपरंट होते, काहींचे पेन हॅन्ड पेंटेड होते. मटेरियलपेक्षाही प्रत्येकावरची कलाकुसर बघण्यासारखी होती. काही पेन वीतभर लांब होते, तर काही पेन बोटाएवढे पण नव्हते. थोडक्यात बघायला खूप व्हरायटी होती. सोबत शाईच्या बाटल्या (दौत), कार्ट्रेज, निब पण होत्या. निबचे वापरानुसार प्रकार होते. शाईच्या बाटल्यांचे वेगवेगळे आकार, प्रकार होते. आम्हाला तिथून एक पुस्तिका मिळाली, ज्यात पेन, शाईच्या बाटल्या, शाई, निब, इत्यादी बद्दल भरपूर माहिती आहे.

खूप मजा आली. शाई पेनमधे इतके प्रकार असू शकतात, असं वाटलं नव्हतं... माझ्यासोबत माझे बाबा पण होते. खूप माहिती मिळाली. मी रोज वापरत नसलेले शाई पेन आठवले.

ह्या सगळ्यासाठी मी आयोजक केअर स्टेशनर्सचे आभार मानतो. हा एक मस्त असा अनुभव होता.