थंड अशी ती रात्र होती. माझा बेड संध्याकाळीच आवरून ठेवलेला होता, पण मी बराच वेळ उभाच होतो. थोड्यावेळाने, जरा रागानेच, मी बेडपाशी आलो, आणि सरतेशेवटी अंग टेकलंच. मी अंग टेकलं, म्हणून बराच वेळ आवरून बसलेला बेड, त्याने सोडलेला उसासाही मला ऐकू आल्यासारखा वाटला. मीही बराच वेळ उभा होतो, म्हणून उसासा सोडला, हात-पाय ताणले.
थोड्यावेळाने मी डोळे मिटले, तर अचानक मी उडतोय, असं मला वाटायला लागलं. डोळे पण उघडता येत नव्हते. बराच वेळ मी कुठे आहे, मी खरंच उडतो आहे का, डोळे का उघडता येत नाहीत, हे जाणायचा प्रयत्न केला, पण काही कळलं नाही.
मग, काही न करता शांतपणे वाट पाहू, असा विचार करतो न करतो, तोच माझं डोकं कुठेतरी जोरात आपटलं. कळ आली. थोड्यावेळाने डोळे उघडतो, तर... अरेच्चा! डोळे उघडले की! पण... हे कुठे आलो? वर उंचावर कौलारू असं छत होतं. अंगाखाली लाल रंगाचा गालिचा होता. हवा थंड होती; आणि बाजूला नजर टाकली तर..... बुकशेल्फ? हो! बुकशेल्फच! त्या बुकशेल्फमधे खूप सारी पुस्तकं होती. मी आडवा पडलेलो उठून उभा राहिलो. चारी बाजूला बुकशेल्फ्स होते. एका बाजूला दरवाजा पण होता. बघू तर दरवाज्यामागे काय आहे, असं म्हणत मी दरवाज्याचा नॉब फिरवला तर, दार उघडत नव्हतं! मला लगेच घाम फुटला! कधी नव्हे इतकी भिती वाटली!! मला कधीही इतकी भिती वटत नाही, पण कोंडलं की खूप भिती वाटते...! तेही एका अनोळख्या ठिकाणी...!
मी परत एकदा चौफेर बघितलं. विरुद्ध दिशेला आणखी एक दरवाजा होता. मी भीत भीतच त्या दरवाज्याचा नॉब फिरवला, आणि फिरला की!
माझी भिती एकदम उडाली! पण जितक्या लवकर ती उडाली, तितक्या लवकर ती परतही आली. ह्या दरवाज्याच्या पलिकडे काय असेल? भितीमिश्र उत्सुकतेने मी दरवाजा उघडला आणि... बापरे! एवढा मोठा हॉल? भिंती ब्राऊनिश रंगाच्या, छत आधीसारखंच उंच, पण मेंटेंड. हवा थंडगार, पायाखाली लाल रंगाचा गालिचा. सगळीकडे ब्राऊन रंगाचं फर्निचर, खिडक्या जुन्या पद्धतीच्या, त्यांना लाल वेल्वेटचे पडदे.
मुख्य गोष्ट म्हणजे, हॉलच्या मधोमध एक ब्लेझर घातलेला, उंच, धष्टपुष्ट असा माणूस बसला होता. विलक्षण गोष्ट म्हणजे, तो त्याच्या दुर्बिणीतून, त्याच्या समोर असलेल्या खिडकीतून, लांबवर काहीतरी बघत होता, आणि काहीतरी एक्सप्रेशन देऊन, कागदावर काहीतरी लिहित होता. कोण आहे हा? असा काय लिहितोय? आणि सगळ्यात महत्वाचा मला पडलेला प्रश्न होता, ‘मी कुठे आहे?’
थोडा वेळ मी तसाच उभा होतो. मग त्या माणसाच्या जवळ जाऊन त्याला हाक मारली, “हलो! मी कुठंय हे तुम्हाला माहिती आहे का? तुमचं नाव काय”? पण त्या माणसाने प्रतिसाद दिला नाही. विचित्रच प्रसंग होता तो! मी त्या माणसाच्या अवती-भोवती फिरतोय, आणि तो त्याच्या कामात व्यस्त आहे...!
शेवटी बऱ्याच वेळच्या शांततेनंतर मी अस्वस्थ झालो. काय करावं? मी निर्दय होऊन त्या खिडकीच्या समोर उभा राहिलो. त्या माणसाने बघितलं, आणि एकदम जड आवाजात खेकसला, “ए! बाजूला हो!” अरे! मी ह्याला हाका मारतोय, हा मला प्रतिसाद देत नाही, आणि वरून माझ्यावरच खेकसतोय? कोण आहे कोण हा माणूस?
शेवटी मी राग आवरून, त्याच्या टेबलजवळ जी एक्स्ट्रॉ खुर्ची होती, ती ओढली आणि त्यात बसून त्या माणसाला विचारलं, “तुमचं नाव काय? तुम्ही इथे काय करताय? माफ करा, मी स्पष्टच विचारतोय पण मला काही कळत नाहीये. ही कुठली जागा आहे?”
त्या माणसाने माझ्याकडे नीट बघितलं, आणि जड आवाजात म्हणाला, “हे माझं ऑफिस आहे.”
“तुम्ही कोण?” इति मी.
“माझं नाव ‘वेळ’...!”
वेळ?
“तोच मी, ज्याला तुम्ही घड्याळ्याच्या माध्यमातून समजून घेता.”
पण हा माणूस म्हणजे वेळ? सुटाबुटातला? टेबलवर बसून, दुर्बिणीतून बघितलेलं कागदावर लिहिणारा?
मी जरा धाडस करून, त्यांना विचारलंच, “तुम्ही हे काय करताय?”
त्यांनी माझ्याकडे परत बघितलं आणि म्हणाले, “मी ‘माझं’ व्यवस्थापन कोण कसं करत आहे ते बघून, त्याचं भविष्य वर्तवतोय.”
मला एकदम ‘अरे बापरे’ असं झालं.
“म्हणजे कसं?” मी परत एकदा धाडसाने.
“म्हणजे कसं?” असं बोलून त्यांनी थेट माझ्या डोळ्यात बघितलं, आणि “ओके, तुला सांगतो.” असं म्हणून माझ्या हातात दुर्बिण दिली आणि म्हणाले, “खिडकीतून बाहेर बघ.....”
मी एकदा मिस्टर टाईमकडे (तेवढ्यात मी त्यांना मिस्टर टाईम म्हणायचं ठरवलं) आणि दुर्बिणीकडे बघितलं, आणि डोळ्यांना दुर्बिण लावून बघितलं, तर....... एक फाटके कपडे घातलेला माणूस दिसला.
“तो माणूस दिसतोय?” इति मिस्टर टाईम.
“हो!”
“तो अत्यंत प्रतिभावान असा लेखक होता.”
“बर?”
“हो. पण तो अत्यंत आळशी होता. प्रॅक्टिस करायचा नाही. ‘माझं’ व्यवस्थापन करायचा नाही. मग शेवटी बऱ्याच वर्षांनी तो असा झाला. तो आता लिहिणं पण विसरलाय...”
“बापरे!”
“हो. आणि तो माणूस बघ.”
मी बघितलं. हा माणूस अत्यंत सुखवस्तू होता.
“त्या माणसाकडे अजिबात स्किल्स नव्हते. पण तरी, ‘माझं’ नियोजन करून, त्याने खूप स्किल्स मिळवले. आणि त्याच पद्धतीने, तो आता पैसे पण मिळवतोय.”
मी आपलं मान डोलावत होतो. मग माझ्याकडे बघून मिस्टर टाईम म्हणाले, “हे बघ, तू मला भेटायला आलाच आहेस, तर सांगतोच. जो ‘माझं’ व्यवस्थापन नीट करत नाही, तो कधीही यशस्वी होत नाही. हा शाप नाही, तर माणसांच्या जगातला नियम आहे, कळलं?”
मी मान डोलावली. काम करायला लागलेले मिस्टर टाईम, परत माझ्याकडे बघून म्हणाले, “तुला सांगायचं आणखी एक मुख्य कारण. काल तुझे बाबा तुला हेच समजावून सांगत होते ना? पण तरी, ते तुला रागावले म्हणून तू चिडलास ना? आठवली का ती रात्र?”
मी शुन्यात बघायला लागलो. ते बाबांचं सगळ्यात पहिल्यांदा ओरडणं, मग ते नियोजनाबद्दल बोलले, पण मी रागातच होतो... ती रात्र, ते डोकं...... त्या प्रसंगाचं आठवून, शुन्यात लागलेले माझे डोळे, ते इथे येणं आठवून खडबडून जागे झाले, आणि जणू माझ्या डोक्यातलं ओळखून मिस्टर टाईम म्हणाले, “तो दुसरा दरवाजा आता उघडेल. काळजी करू नको. पण लक्षात ठेव. वेळेचं नियोजन नीट करायचं, नाहीतर यश नाही. कळलं?”
मला आता घरी जायची घाई लागली. उठून उभं राहता राहता मी “ओके मिस्टर टाईम!” म्हणालो. धावत त्या आधीच्या दरवाज्यापाशी आलो, धावत धावत तो नॉब धरणार इतक्यात...
दारावर डोकं आपटलं. कळ आली. डोळ्यासमोर अंधारी आली. डोळे मिटले. थोड्यावेळाने डोळे उघडतो तर... अरेच्चा! हे आपलंच छत! आपला फॅन, आणि बेड असा वर का दिसतोय? ओ! आपण बेड वरून खाली पडलो तर...!
हे स्वप्न होतं तर!!
No comments:
Post a Comment