लेखक : शंतनु शर्मिष्ठा शिंदे
मो.क्र. : 7887881031
ईमेल : shantanuspune@gmail.com
दुपार आणि संध्याकाळच्या मधली अशी ही वेळ होती, म्हणजे चार किंवा साडे चार वाजले होते. बालगंधर्वच्या स्टॉपला थांबलो होतो. तेवढ्यात अगदी बस स्टॉपच्या जवळून एक कळकट ट्रक खूपसारा धूर मारून गेला. मी पटकन रूमाल काढून तोंड पुसलं. तेवढ्यात दोन ‘मी’ प्रकट झाले… घाबरू नका… हे दोघंही माझ्या ओळखीचे होते. ते दोघं होते, ‘मन’ आणि ‘मेंदू’. हे दोघे प्रकट झाले, की मी नुसता ऐकतो.
मेंदू नाक दाबून म्हणाला, “काय हे!”
मनानं न्युट्रली विचारलं, “काय?”
“केवढा हा धूर!”
“मग? रस्त्यावर उभे आहोत, असं होणारच!”
“होणारंच काय? केवढा धुर उडवून गेला ट्रक बघितलं ना?! सगळा कार्बन मोनॉक्साईड! किती धूर मारत असेल हा दिवसभर! ह्याच्यामुळे पर्यावरणावर काय परिणाम होतो माहितीये ना?
“आता ट्रकला काय करणार? त्याला लागतंच एवढं डिझेल…”
“का? का लागतं? जर बसला सीएनजी चालू शकतं, तर ट्रकला न चालायला काय झालं?”
मनाला काय बोलावं काही कळेनासं झालं. थोडा पॉज पडला. मग मनाने बोलायला सुरूवात केली, “कार्स आणि बसेसला सीएनजी वापरतात, ट्रकला पण वापरू शकतो, मग टू-व्हिलर्सचं काय? आणि पुण्यात तर टू-व्हिलर्सचीच संख्या जास्त आहे…”
“सायकल्स अल्टरनेटिव ऑप्शन म्हणून आहेतच…”
मन तोंड वाकडं करून म्हणालं, “हॅ! आता बघ, आपल्याला घरून इथं, बालगंधर्वला यायचं असेल प्रोग्रामसाठी, तर सायकलने किती वेळ लागेल! एक तास आधी निघालो तरी नाही पोचायचो!”
“मग पर्यावरणपूरक म्हटलं, तर इलेक्ट्रिक स्कूटर आहे.”
“मग अशा भारी गाड्या कधी चालवायच्या माणसानं? असं मस्त गाडी घेऊन ---”
“हे बघ,” मेंदू समजूतीच्या सुरात म्हणाला, “प्रत्येक माणसाने त्याला योग्य ती गाडी घ्यावी आणि गाडी घेताना पर्यावरणाचा विचार करावा. आपण झाडं कापतोय, हवा प्रदूषण, पाणी प्रदूषण करतोये, हे कंट्रोलमधे यायला नको? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, क्रूड ऑईलचा पण साठा मर्यादित आहे. तो संपला, की पेट्रोल, डिझेल बनवणार कसं?”
हे त्यांचं बोलण संपलं, तेवढ्यात बस आली, आणि मी चढलो.
No comments:
Post a Comment