Monday, 20 May 2019

ग्रह, तारे, ऋषी, नेब्युला, आणि बरंच काही...

११ मे, शनिवारी मी स्टारगेझिंगच्या प्रोग्रामला गेलो होतो. 'मिती फाऊंडेशन' आणि 'असिमित स्पेस ॲन्ड एन्वॉईर्मेंट सेंटर'ने ह्या प्रोग्रामचं आयोजन केलं होतं. आमचे फॅकल्टी होते, सारंग ओक सर. त्यांनी खूपच छान पद्धतीने समजावलं. सोबतचे वॉलेंटियर्सही खूप हेल्पफुल होते. मला इथे टेलिस्कोप हाताळायला पण मिळाला. ह्या प्रोग्रामचं टायमिंग होतं ११ मे सायंकाळी. ६ ते १२ मे सकाळी. ५ ... १० - ११ तास मी आकाश निरिक्षण करत होतो...

सगळ्यात पहिल्यांदा सप्तर्षी किंवा उर्सा मेजर हे नक्षत्र बघितलं. हे नक्षत्र बरंच महत्वाचं आहे. ह्या नक्षत्राच्या आधारे बरीच आणखी नक्षत्रं शोधता येतात, आणि सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे ध्रुवतारा शोधता येतो. ह्या नक्षत्राला 'सप्तर्षी' का म्हणतात, ह्याची कथा सारंग सरांनी सांगितली.

पूर्वी जंगलात सात ऋषी राहायचे. त्या सातही जणांची लग्नं झालेली होती. पण कालांतराने सहा ऋषींच्या बायका त्यांना सोडून गेल्या. त्यातल्या एका ऋषींची बायको तेवढी राहिली. त्या ऋषींचं नाव 'वशिष्ठ' व बायकोचं नाव 'अरूंधती'! सप्तर्षी नक्षत्रातले सात तारे हे ते ऋषी आहेत. (सप्त + ऋषी = सप्तर्षी) त्यातल्या सहाव्या ताऱ्याचं नाव 'वशिष्ठ' आहे. वरवर बघितल्यास तो एक तारा वाटतो, पण नीट नुसत्या डोळ्यांनी बघितल्यावरही लक्षात येतं की ते दोन तारे आहेत. त्यातला एक म्हणजे वशिष्ठ आणि दुसरा अरूंधती. टेलिस्कोपमधून बघितल्यावर तर आणखीनच स्पष्ट दिसतं.

असं म्हणतात की पूर्वी, मुलीचं लग्न ठरलं, की मुलीला हे दोन तारे वेगळे दिसताहेत का असं विचारण्यात यायचं. ते वेगवेगळे दिसले की डोळे ठणठणीत आहेत असं समजायचे. ही एक प्रकारची 'आय-टेस्ट' होती!

सप्तर्षी नक्षत्रावरून आम्ही ध्रुवतारा बघितला. ध्रुवतारा ओळखायला दोन पद्धती आहेत. 'सप्तर्षी' नक्षत्रावरून ध्रुवतारा ओळखता येतो तसंच 'कॅसिओपिया' किंवा 'शर्मिष्ठा' नक्षत्रावरूनही ध्रुवतारा ओळखता येतो. ध्रुवतारा हा उत्तर धृवाच्या बरोब्बर वर आहे. उत्तर धृव ते दक्षिण धृव अशी काल्पनिक काठी घुसवली, तर तो पृथ्वीचा अक्ष होईल. त्यामुळे उत्तर धृवावरचा हा ध्रुवतारा, पृथ्वीवरून हलताना दिसत नाही. उत्तर गोलार्धावरच्या सगळ्यांना हा तारा उत्तर दिशा दाखवतो. दक्षिण गोलार्धावरून हा तारा दिसत नाही. विषुववृत्तावरून बघितलं तर हा तारा क्षितिजाजवळ दिसतो.

सप्तर्षी नक्षत्रावरूनच आम्ही स्वाती नक्षत्र बघितलं. मग चित्रा, मग हस्त नक्षत्र बघितलं. फक्त सप्तर्षीवरून आम्ही अजून तीन नक्षत्रं बघितली. त्याच बरोबर आम्ही बोटांच्या आधारे ताऱ्यांमधलं दृष्य अंतर मोजायला पण शिकलो.

आम्ही गुरू (ज्यूपिटर) बघितला. दुर्बिणीतून गुरूवरचे पट्टे आणि चार चंद्र पण दिसत होते. चौघांनी गुरूला अगदी 'चार चॉंद' लावले बघा! शनिकडे बघितलं तर त्याचे कडे पण दिसत होते. नुसत्या डोळ्यांनी काहीच फरक दिसत नव्हता, पण टेलिस्कोपमधून बघितल्यावर दोघांमधला फरक दिसत होता.

आम्ही फक्त ग्रह तारेच बघितले नाहीत, तर नेब्यूला, जिथे ताऱ्यांचा जन्म होतो, ते पण बघितले.

नेब्यूला नुसत्या डोळ्यांना दिसायला अवघड असतात. टेलिस्कोपमधून बघितल्यावर एक ताऱ्यांचा गुच्छ दिसतो. त्यातले काही तारे ठळक असतात, तर काही पुसट असतात. त्यांच्या आजुबाजूला धुळीचा ढग असतो. 'ब्ल्यू लगून नेब्यूला'मधे तो निळसर दिसतो, तर 'डम्बेल्स नेब्यूला'मधे तो राखाडी दिसतो. 'डम्बेल्स नेब्यूला' खरंच डम्बेल्ससारखा दिसतो, पण तसा आकार दिसायला खूप अंधार लागतो, असं मला कळलं.

आम्ही आकाश निरिक्षणाच्या मधेमधे काही ॲक्टिव्हिटीज् करत होतो. सगळ्यात पहिल्यांदा आम्हाला एक चंद्राचा मॅप देण्यात आला. प्रत्यक्ष आकाशात दिसणारा अर्धा चंद्र मॅपमधल्या पुर्ण चंद्रातला नक्की कुठला अर्धा भाग आहे, हे ओळखायचं होतं. त्यासाठी तिथं असलेले सगळे (तीन) टेलिस्कोप चंद्राकडे लावण्यात आले होते. सगळ्यांनी उत्साहाने ही ॲक्टिव्हिटी पार पाडली.

दुसरी ॲक्टिव्हिटी होती, दिलेल्या कागदावरील नक्षत्र ओळखणे व त्यातल्या ताऱ्यांमधले दृष्य अंतर मोजणे. ही ॲक्टिव्हिटीही उत्साहाने पार पाडण्यात आली. सारंग सर जेव्हा उत्तर सांगत होते, तेव्हा तर सगळ्यांचा उत्साह ओसांडून वाहत होता!

सारंग सरांनी एक प्रेझेंटेशन पण दिलं. त्यात त्यांनी मुख्यतः पृथ्वीसारखे अजुन ग्रह आहेत का? एखाद्या ताऱ्याभोवती फिरणारा ग्रह कसा शोधला जातो? पृथ्वीसारखा जर ग्रह असला तर तो किती लांब असेल? आपल्याला तिथपर्यंत पोचता येईल का? अशा प्रश्नांची उत्तरे दिली. ते म्हणाले की, पृथ्वी हा ग्रह अपघाताने तयार झाला आहे. त्यावरची जीवसृष्टी एक अपघात आहे.

मुख्य म्हणजे आपली पृथ्वी प्रदक्षिणा घालते ती सूर्याभोवती, जो एकटा आहे. विश्वातले जवळजवळ ८५ टक्के तारे हे 'दुकटे' म्हणजेच डबल आहेत. हे तारे एकमेकांभोवती फिरतात. आपण अशा दुकट्या ताऱ्याभोवती फिरत असतो तर काय झालं असतं विचार करा. एका सूर्याची उष्णता आपल्याला सहन होत नाही...

दुसरं म्हणजे आपण सूर्यापासून अशा अंतरावर आहोत, की ज्यामुळे पृथ्वीवर जास्त उष्णता नसते, की जास्त थंडी नसते. वातावरण पण स्थिर असतं. वादळं आपल्याकडे फार होत नाहीत. आपल्याकडे पाणी पण मुबलक आहे. हा सगळा अपघात आहे, असं काही शास्त्रज्ञ मानतात, सारंग सर म्हणाले.

ह्यानंतर सारंग सरांनी पृथ्वीवरच्या समस्यांवरच्या शॉर्ट्फिल्म्स दाखवल्या. त्या फिल्म्समधे पृथ्वीवरच्या पाण्याची समस्या, वाढतं तापमान, वातावरणात वाढत असलेलं कार्बन वायूचं प्रमाण, वाढत्या समुद्रपातळीची समस्या आणि असं बरंच काही दाखवलं होतं.

मग त्यांनी विचारलं, की मागच्या स्लाईड्स आणि आत्ताच्या ह्या शॉर्टफिल्म्स, ह्यामधे काही सबंध दिसतोय का? ॲस्ट्रॉनॉमीचा अभ्यास का करायचा हे ह्यातून कळतंय का?

ह्याचं उत्तर एका छोट्या मुलाने दिलं.

"ॲस्ट्रॉनॉमीचा अभ्यास केल्याने आपण किती छोटे आहोत आणि आपली पृथ्वी किती मौल्यवान आहे हे कळतं!"

कुठेही पृथ्वीसारखा ग्रह नाही, असला, तरी तो आपल्यापासून काहीशे, काही हजार, काही लाख प्रकाशवर्ष दूर असणार. इतका जवळ तर तो ग्रह नक्कीच नसणार, की इथून उठलो आणि त्या ग्रहावर गेलो.

आणि समजा आपल्याला पाहिजे तसा ग्रह सापडला. लांब असला तरी आपण प्रकाशाहून जास्त वेगाने तिथे पोहोचू शकलो. (प्रकाशाचा वेग : ३ लाख किलोमटर प्रति सेकंद) तरी तिथपर्यंत जाण्याचा खर्चच इतका असणार की काही मोजकेच लोक तिथं जाऊ शकणार.

एवढं सगळं असूनही आपण आपले नैसर्गिक घटक वाट्टेल तसे वापरतो. वाट्टेल तसं पाणी वापरतो, वाट्टेल तितकी झाडं कापतो, वाट्टेल तितकी हवा दुषित करतो, वाट्टेल तितकं पाणी दुषित करतो. आपल्या ग्रहाचं मुल्य कळावं म्हणून ॲस्ट्रॉनॉमी शिकणं गरजेचं आहे. "ॲस्ट्रॉनॉमी आपल्याला 'हम्बल' करते", सारंग सर म्हणाले.

माझ्यासाठी ही कल्पना अगदी डोळे उघडणारी व एकदम नवी होती. त्यामुळे हा स्टारगेझिंगचा प्रोग्राम माझ्यासाठी स्पेशल होता.

No comments:

Post a Comment