Friday, 5 April 2019

फरश्यांचं रहस्य

कपिल दादा उर्फ कपिल धांदरफळे नेहमीप्रमाणे शनिवारी अकरा वाजता आपल्या मित्राकडे जायला निघाला. कपिल दादा एका कंपनीत काम करतो. शनिवार - रविवार सोडून नऊ ते पाच त्याला काम असतं. शनिवार-रविवार तो आपल्या जुन्या-नव्या आणि आवडत्या मित्रांना भेटतो. त्यापैकी सगळ्यात आवडत्या अशा मित्राला भेटायला तो आज निघाला. स्वारगेट जवळच त्याच्या मित्राची खोली होती. कपिल दादा कात्रजवरून व्हाया पुणे-सातारा रोड तडक मित्राच्या घरी पोचला. दारावरच एक मोठी प्रिंटाऊट लावली होती. त्यावर लिहिलं होतं --

बौद्धिक माणसाच्या मूलभूत गरजा
- अन्न - वस्त्र - निवारा
- स्मार्टफोन/लॅपटॉप-इंटरनेट

आणि

शांती…!

कपिल दादाने दरवाजा ढकलला आणि म्हणाला, “काय मस्त गरजा आहेत रे तुझ्या!”

नेहमीप्रमाणे, समोरच वाघेश दादा आपल्या बेडवर, लॅपटॉप मांडीवर घेऊन बसला होता. बाजूला अंथरूण-पांघरूण पडलं होतं. खिडक्या बंद होत्या. वाघेश दादा नुकताच झोपेतून उठल्या सारखा वाटत होता.

वाघेश दादा, एक अजबच रसायन आहे. तो कपिल दादासारखा नोकरीला जात नाही, फ्रीलान्स काम करतो. मासिकांसाठी वगैरे लेख लिहायचे, ट्रान्सलेशन्स करायचे, व्हिडिओज बनवून युट्युब वर टाकायचे, कुठे कुठे जाऊन वॉल पेंटिंग करायचे, गोष्टी लिहायच्या, अशी त्याची कामं असतात. एका भाड्याच्या खोलीत एकटाच राहातो. त्यामुळे त्याच्या गरजा कमी असतात. कधीही गेलं तरी तो नेहमी हसतमुख असतो. त्याच्या खोलीत दरवाजातून आत गेल्यावर उजवीकडे एक टेबल, तर समोर एक बेड असतो. टेबल वर काही पुस्तकं असतात. टेबलवर एक लॅपटॉप किंवा एक फोन नेहमी चार्जिंगला असतो. टेबल पाशी एक खुर्ची असते.

त्याच्या बिझी किंवा फ्री असण्याचं गणित त्याच्या कामावर अवलंबून असतं. तो सोमवारी दुपारी १ वाजता झोपेतून उठू शकतो किंवा रविवारी पहाटे उठून काम करू शकतो. अतिशय फ्लेक्झिबल माणूस…

कपिल दादांची चाहुल लागून वाघेश भाऊंनी लॅपटॉपमधून तोंड आजिबात वर न काढता विचारलं, “कुठल्या गरजा?”

“त्याच की दरवाज्यावर लावलेल्या!”
“अच्छा, त्या होय! प्रत्येकाच्या त्याच गरजा असतात… मी काय वेगळाय?”
“चल! फक्त अन्न, वस्त्र, निवारा ह्या तीन गरजांवर जगणारी माणसं पण आहेत जगात!!”
“आहेत की! मी कुठे नाही म्हणतोय! म्हणूनच मी आधीच लिहिलंय, बौद्धिक माणसाच्या गरजा म्हणून.”
“अच्छा, बर?”
“मग काय तर! तुझ्याच बाबतीत विचार करू आपण. मी फक्त तुझ्या राहण्याची, खायची, आणि कपड्यांची सोय करतो. राहू शकशील तुझ्या फोनशिवाय, कॉम्प्युटरशिवाय?”

कपिल दादा मनातल्या मनात म्हणाला, याच्याशी वाद घालण्यात काही अर्थ नाही. याच्याकडे प्रत्येक मुद्दे तयार असतात. त्यानी लगेच विषय बदलला,

“मग बाकी काय? काय करतोयस?” कपिल दादाने विचारलं.
“काही नाही. सध्या काही काम नाहीये, पुढच्या काही दिवसांत येईल.”
“आत्ता काय करतोयस विचारलं. तुला एवढं भेटायला आलो, लांबून, आणि तू माझ्याकडे साधं बघत पण नाही?”
“अरे, आपल्याला बोलायलाच एक भारी विषय शोधून ठेवला होता. आत्ताच हरवाय, तो शोधतोय.”
“कुठला विषय?”
“एक सनसनाटी न्यूज आहे. आजचा पेपर वाचला?”
“हो! पण आजच्या पेपरमधे काय विशेष आहे?” कपिल दादाने कपाळावर आठ्या आणत आजच्या पेपरमधलं ‘सनसनाटी’ आठवायचा प्रयत्न केला.
“एक छोटीशी बातमी आहे, पण इंटरेस्टिंग आहे. ऐक -” वाघेश दादा म्हणाला. कपिल दादा सावरून बसला.
“टायटल आहे, बिबवेवाडी भागात ‘फरशी’ची चोरी!
“अरे हो! मी ही बातमी वाचलीये! काय विचित्र ना? बाकी काही चोरायचं सोडून चोर फरशी काय घेऊन गेला?” कपिल दादा उद्गारला.
“अगदी बरोबर!” वाघेश दादा उठून येरझाऱ्या घालू लागला. “ह्या चोराने शुक्रवारी मध्यरात्री किंवा पहाटे १ – २च्या दरम्यान बाकीचं काहीही चोरायची संधी असताना छिन्नी हातोडा वापरून फरशी चोरली. घरमालक आवाजाने जागे होऊन बाहेर येईस्तोवर चोराने फरशी हातात घेतली होती.

“मालक बाहेर येईस्तोवर चोराने फरशी काढली होती? छिन्नी हातोड्याचे आवाज ऐकूनही मालक एवढ्या उशिरा उठले? असे कसे घरमालक…?”

हे ऐकून वाघेश दादा नुसता गालातल्या गालात हसला.

“आतून कोणीतरी बाहेर आलंय म्हटल्यावर चोराने फरशीचा तुकडाच फेकून मारला असंही लिहिलंय ना त्यात?” कपिल दादाने विचारलं.
“हो. मालक चोराचं वर्णन फार करू शकले नाहीत, पण ते म्हणतात की चोराला खूप मोठी, म्हणजे छातीवर रेंगाळणारी दाढी होती. सहाजिकच आहे. आजुबाजूला खूप अंधार असणार. त्यात काही बाकीचं दिसलं नसणार. मालक म्हणतात आमचं घर तळमजल्यावर असल्याने चोर पटकन पळून गेला.”

“कसलं विचित्र ना? भितीदायक. असा लांब दाढीचा चोर, फरशी चोरतो, आणि कोणी आल्यावर फरशीचाच तुकडा फेकून मारतो! बापरे!” कपिल दादाने  शहारे आल्यासारखं केलं.

“हं, पण इंटरेस्टिंग वाटतंय. त्या चोराने फरशी का चोरली असेल?” वाघेश दादा कपाळावर आठ्या घालून टेबलच्या खुर्चीवर बसला.

“मी पण जरा विचार केला, पण काही समजलं नाही. काय कारण असू शकतं?”

कपिल दादाने प्रश्न विचारला, पण वाघेश दादा केव्हाच दुसऱ्या जगात पोचला होता. विचार करायला लागला की तो असाच वेगळ्या जगात हरवत असे. तो बराच वेळ असा बसला. कपिल दादाला त्याचा मूड माहित असल्याने त्याने फार त्रास दिला नाही. त्याने लॅपटॉप उचलला आणि ती बातमी परत वाचली. ती बातमी वाचून होते न होते तोच इकडे वाघेश दादा ताड्कन उठला आणि कपडे घालू लागला. कपिल दादाने आश्चर्याने विचारलं, “काय रे? कुठे चाललास?”

“अरे चल की चहा पिऊन येऊ! इथे बसून काय करणारेस? चल!”
“असंच, झोपेतून उठल्या-उठल्या, ब्रश वगैरे करणार नाहीयेस का?”
वाघेश दादा हसून म्हणाला, “माझं आवरून झालंय. आंथरूण-पांघरूण आवरायचं आहे.”

****

दोघंही बाहेर पडले. चहा प्यायला स्वारगेटच्या स्टॅन्डला आले. कपिल दादाने चहा पिताना विचारलं फरशीच्या चोरीबद्दल, पण वाघेश दादाने काही सांगितलं नाही. चहा पिऊन झाल्यावर कपिल दादा, वाघेश दादाच्या खोलीवर जायला वळणार इतक्यात वाघेश दादाने त्याला ओढलं. ते दोघं अप्पर, कात्रजच्या बसेस लागतात तिकडे गेले. अप्परची बस पकडली. वाघेश दादाने वसंत बागेचं तिकिट काढलं. कपिल दादा काही वैतागून बोलणार इतक्यात वाघेश दादा म्हणाला, “मला आत्ताच एक आयडिया सुचलीये. काही बोलू नको. ज्यांच्याकडं चोरी झालीये त्यांच्याकडे जाऊ. त्यांना काही प्रश्न विचारू. आता मी शेरलॉक आणि तू वॉटसन…!”

कपिल दादा डोळे वटारून बघतच राहिला…

दोघंही वसंतबागेला उतरले. बिबवेवाडी – कोंढवा रोडवरच ती सोसायटी होती. दोघंही गेले. सोसायटी तशी बऱ्यापैकी जुनी होती. तळमजल्यावरंच एकांच्या घराचा दरवाजा उघडा होता. आत काही माणसं बोलत होती. वाघेश दादाने बेल वाजवली आणि विचारलं, “ती फरशीची चोरी झाली ती याच घरात का?”

आतल्या सगळ्या माणसांनी वळून दोघांकडे बघितलं. त्यातले एक वयस्कर आजोबा म्हणाले, “होय, हेच ते घर, तुम्हाला काय पाहिजे?”
वाघेश दादा म्हणाला, “आम्ही इथे चोरी झाली ते पेपरमधे वाचलं आणि आलो. त्यात लिहिलं होतं ना की चोराने घरमालकावर हल्ला केला फरशीचा मोठ्ठाला तुकडा फेकून, म्हणून जरा बघायला आलो, काय भानगड आहे ते. जरा काळजी वाटली हो…”

कपिल दादाने आश्चर्याने क्षणभर वाघेश दादाकडे बघितलं. फरशीचा मोठ्ठाला तुकडा फेकून ‘हल्ला’ म्हणे…

त्या वयस्कर आजोबांनी दोघांना आत घेतलं. ती फरशीची जागा दाखवली. दरम्यान त्या हॉलमधे बसलेली दोघंही मुलं जोरात आत पळून गेली. वाघेश दादाने त्या आजोबांना विचारलं, “चोरी नेमकी किती वाजता झाली?”
आजोबा जरा आठवून म्हणाले, “मी उठलो तेव्हा साधारण १ वाजला होता. तोपर्यंत चोराने फरशी हातात घेतली होती.”

“अच्छा… मग त्या चोराने तुम्हाला तुकडा फेकून मारला का? ह्म्… बरं, ती फरशी काही विशेष होती का? म्हणजे त्यावरचं डिझाईन वगैरे असं काही होतं का ज्याने तिची किंमत वाढेल?” वाघेश दादाने विचारलं.

आजोबा डोकं खाजवत म्हणाले, “हम्… मला तरी आठवत नाही. त्या फरशीची किंमत काही फार नव्हती. अशी बारीक रंगीत खडी असलेली साधी फरशी होती ती. पण हा… ती इथे मध्यभागी लावली होती, कारण तिच्यात जरा मोठे आणि लाल-लाल खडे होते. तिच्यावर एक… हा! त्या फरशीवर ‘6’ असा आकडा पण होता. कदाचित साच्यामुळेच पडला असेल तो. पण काहीही म्हणा, आता बराच खर्च करावा लागणार. अशा रंगीत खडीच्या फरश्या आता मिळत नाहीत. आता सगळ्या घराच्या फरश्या बदलाव्या लागणार…” आजोबांनी उसासा सोडला. “२००० साली बसवल्या होत्या फरश्या. चांगल्या चालल्या होत्या, पण हे असलं काहीतरी विचित्र घडलं. आणि योगायोग बघा! आमचे एक मित्र आहेत. मुकूंदनगरलाच राहतात. आम्ही दोघांनी एकत्रच घरं विकत घेतली. त्यांनी बंगला बांधला, आणि मी फ्लॅट घेतला. त्यांच्याही घरातून काही दिवसांपुर्वी अशीच फरशी चोरी झाली!”

“अरेऽ बापरे! त्यांची फरशी महागडी तर नव्हती ना?” वाघेश दादाने विचारलं.
“नाही हो!” आजोबा खाली बसत म्हणाले, “अशाच पद्धतीची होती ती फरशी. तिच्यावर पण काहीतरी आकडा होता. काय होता बरं तो? थांबा, मी त्यांना फोन करून विचारतो.”

आजोबांनी फोन केला, आणि विचारून वाघेश दादाला सांगितलं. “त्या फरशीवर ‘5’ आकडा होता म्हणे…”

इकडे वाघेश दादाचे डोळे चमकायला लागले. तो लगेच घाईघाईने कपिल दादाला ‘चल’ म्हणाला आणि आजोबांना म्हणाला, “माहिती देण्यासाठी धन्यवाद. तुमची तब्येत चांगली आहे, हे बघून छान वाटलं. पुन्हा भेटू…!” आणि दोघं सोसायटीमधून बाहेर पडले. इकडे आजोबा आणि त्यांची दोन नातवंडं (आजोबांच्या मागून) डोळे वटारून बघत होते.

इकडे कपिल दादाला काही कळत नव्हतं. त्याने वाघेश दादाला विचारलं, “अरे, तुला काही कळालंय आहे का? काही सांगत का नाहीस?”
वाघेश दादा वसंत बागेच्या दिशेने चालत म्हणाला, “एक जबरदस्त क्ल्यू मिळालाय. आता एक काम करू. इथंच कुठंतरी मस्तपैकी जेऊ. घरी जाऊ, झोप काढू, आणि मग एक, ह्याच केस संदर्भात फोन करायचा आहे, येरवडा जेलमधे…”

“ह्या ‘केस’ संदर्भात, ऑ?” कपिल दादाने मिश्किलपणे विचारलं, “पण येरवडा जेलमधे का? कोण ओळखीचं आहे का?”
“हो. मित्र आहे एक. तिथं काम करतो. का फोन करायचा ते नंतर सांगतो. आधी जेऊया…”

दोघंही जवळच्या हॉटेलला गेले. ऑर्डर दिली आणि जणू काही झालंच नाही मघाशी, अशा पद्धतीने वाघेश दादाने विषय बदलला. तो मागच्या काही दिवसांचं त्याचं क्रियेटिव्ह काम दाखवू लागला. कपिल दादा पण केसबद्दल विसरला. वाघेश दादाचं काम खरंच खूप आणि छान होतं. थोड्यावेळाने दोघं घरी गेले. झोपले.

कपिल दादाला जरा जास्तच गाढ झोप लागली. तो उठला तेव्हा वाघेश दादा ऑलरेडी काम करत बसला होता. खिडक्यांमधून संधिप्रकाश येत होता. वाघेश दादा म्हणाला, “ए कपिल, चल उठ. माझा येरवड्याला कॉल झाला. चहा पण रेडी आहे. चल प्यायला.”

कपिल दादा काही बोलणार इतक्यात दरवाज्याची बेल वाजली. वाघेश दादा वैतागून म्हणाला, “आता कोण आलं?” त्याने दार उघडलं तर दाढी वेडी वाकडी कापलेला एक माणूस उभा होता. “काय पाहिजे?” वाघेश दादाने विचारलं. तो माणूस क्षण दोन क्षण वाघेश दादाकडे बघत राहिला. मग तोंड कसनुसं करत, “दोन दिवसांपासून उपाशी आहे होऽ जरा पोटाला काईतरी…” असं म्हणून तोंड आणखीनच कसनुसं केलं. वाघेश दादाने पण जरा त्या माणसाकडे रोखून पाहिलं, आणि एकदम कपिल दादावर ओरडला, “अरे ए कपिल! झोपला कायेस? चल उठ!! आंथरूण उचल आणि आतून ह्या माणसाला द्यायला खाऊ आण! आंथरूण उचल पहिल्यांदा!”

इकडे कपिल दादा दचकले. हे का नविन? त्याने लगेच आंथरूण उचललं, आणि आतून काही बिस्किटं आणली. वाघेश दादाने ती बिस्किटं त्या माणसाला दिली. तो माणूस अत्यानंदाने गेला.

इकडे वाघेश दादा कपिल दादाला सॉरी म्हणाला. कपिल दादा म्हणाला, “अरे ते सॉरी सोड! पण नक्की उठवलं का?” वाघेश दादा काही म्हणाला नाही. थोडा वेळ विचार करून तो म्हणाला, “आज आपल्या केसचा क्लायमेक्स आहे. कपिल, एक काम कर. आज रात्री इकडेच रहा. बघ आत्ता वाजलेत ६. थोड्या गप्पा मारू. मग फिरायला जाऊ. नंतर आपल्याला काय करायचं आहे ते सांगतो.”

तासाभराने दोघं बाहेर पडले. खाऊन, पिऊन, मजा करून दोघं, साधारण १२ वाजता घरी आले. वाघेश दादाने कपिल दादाला गेट पाशी थांबवलं आणि वर जाऊन खोलीचा दरवाजा बघून परत आला. म्हणाला, “अजुन फरशी-चोर आला नाहीये.”
“पण फरशी-चोर आपल्याकडे का --”
“श्श!” वाघेश दादा ओरडला. “ऐक, आत्ता काही बोलू नको. आपण ह्या गेटच्या दोन बाजूंना लपून राहू. अनोळखी माणूस आला की मला कळेल. कदाचित चोर येणार नाही, असंही होईल, पण आला की --”

वाघेश दादाने कपिल दादाला सगळा प्लॅन सांगितला. दोघंही लपून बसले. अर्धा तास झाला, कोणीही नाही. पाऊण तास झाला, कोणीही नाही. वेळ हळू हळू सरकत होता. साधारणपणे एकूण दिड तास झाल्यावर, बाहेर पसरलेल्या वाळूवर पावलं वाजली. दोघांनाही चाहूल लागली. दोघं अत्यंत ताठ आणि शांत बसले. तो माणूस सरळ आत जाऊन पायऱ्या चढायला लागला. वाघेश दादाने खूण केली. दोघांनीही पाठलाग केला. माणूस बरोब्बर जाऊन वाघेश दादाच्या खोली पाशी थांबला होता. कुलूप तोडायचा प्रयत्न करत होता. दोघंही त्याची हालचाल, बऱ्यापैकी लांब उभे राहून बघत होते. साधारण पंधरा मिनिटांनी त्याला कुलूप तोडण्यात यश आलं. तो आत गेला.

मागून दोघं हळूच वर आले. आणि दाराच्या दोन्ही बाजूला लपले. तो चोर खोलीच्या बरोबर मध्याभागी जाऊन बसला आणि त्याने त्याच्या झोळीतून छिन्नी हातोडा काढला, टॉर्च काढला. छिन्नीला जिथं ठोके मारतात, तिथं कापड गुंडाळलेलं होतं. इकडे वाघेश आणि कपिल दादांमधे नेत्रपल्लवी झाली. दोघं नीट बघू लागले. त्या चोराने अत्यंत कुशलतेने फरशी काढायला सुरूवात केली. हळू हळू ठोके देत त्याने पुर्ण फरशी मोकळी केली आणि अलगद वर काढली. फरशी झोळीत घालून तो चोर बाहेर पडणार इतक्यात कपिल दादाने लाईट लावली आणि वाघेश दादाने चोराला घट्ट पकडलं.

“कपिल! कपिल!! पटकन बेडवरची दोरी घे…” चोर हात – पाय झाडू लागल्यावर वाघेश दादा ओरडला. कपिल दादाने व्यवस्थित त्या चोराला बांधलं आणि “हाश हूश” करत दोघं बेडवर चोरासमोर बसले. बाजूलाच त्यांनी चोराची झोळी ठेवली. चोर आणि वाघेश दादा बराच वेळ एकमेकांकडे खूनशी नजरेने बघत होते. मग वाघेश दादा म्हणाला, “कसा आहे आपल्याकडे संध्याकाळी आलेला भिकारी उर्फ फरशी चोर उर्फ रघूवीर किष्टेपूरकर उर्फ २००० सालचा कुख्यात ज्वेल थिफ?”

कपिल दादा वाघेश दादाकडे अगदी कोड्यात असल्यासारखा बघत होता.

सकाळी कपिल दादाने पोलिसांना फोन करून बोलावलं. ते चोराला घेऊन गेले. वाघेश दादाच्या खोलीमधल्या त्या फरशीत काही माणकं (Ruby) मिळाली. ह्या फरशीच्या कोपऱ्यात ‘7’ आकडा होता. ते माणकं पोलिसांच्या हवाली करण्यात आले.

कपिल दादा म्हणाला, “हे बघ. आता तरी तुला माझ्या प्रश्नांची उत्तर द्यावी लागतील. तुला कसं कळालं त्या आणि आपल्या फरश्यांमधे मौल्यवान खडे आहेत? तो आपल्याकडे आलेला भिकारीच खरा चोर आहे हे तुला कसं कळालं?”

वाघेश दादा हसला, म्हणाला, “अरे सोपं होतं. जेव्हा मी ती बातमी वाचली तेव्हाच मला वाटलं होतं की त्या चोरी झालेल्या फरशीचं काहीतरी महत्व आहे. त्या फरशीची चोराच्या दृष्टीने किंमत खूप जास्त आहे. इतरांना ती माहीत नाही. नाहीतर कशाला कुठलाही कलंदर चोर फरशी काढण्याइतकं अवघड काम करेल? मग मी आपल्या फरश्यांकडे बघितलं. ह्या, सिमेंटमधे रंगीत रेती घालून बनवलेल्या फरश्या. म्हटलं की, यात कोणी एखाद्या रेतीच्या मोठ्या खड्या ऐवजी कुठलं तरी रत्न टाकलं, तर काय डोंबलाचं कळेल? आपण थोडी उकरून बघणार? पण ती बिबवेवाडीतल्या आजोबांकडे झालेली चोरी नेमकी याच बेसीसवर झाली, हे सांगण्याइतपत माझ्याकडे काही पुरावा नव्हता. म्हणून आपण त्यांच्याकडे गेलो.

“त्यांच्याकडे सेम फरश्या आहेत बघितल्यावर माझ्या शंकेतला एक लेअर निघून गेला. जेव्हा ते म्हणाले की आमच्या फरशीत लाल-लाल मोठ्ठे खडे होते, तेव्हा शंकेतला दुसरा लेअर गेला. आणि जेव्हा ते म्हणाले की, त्यांच्या मित्राकडे पण अशीच चोरी झाली, तेव्हा माझी खात्रीच झाली. कारण बघ ना, सेम खडे असलेल्या दोन फरश्या अंदाजे एकाच आठवड्यात चोरी झाल्यात. हा चोर एकच असणार हेही मी ताडलं. तसंच तो एक कुशल गवंडी असणार, कारण इतर बऱ्याच फरश्यांमधून एक अखंड फरशी काढणं काही सोपं नाही. जर त्याने खरंच फरश्यांमधे रत्न लपवले असतील, तर आधी तो फरश्यांच्या कारखान्यात काम करत असणार, तसंच त्याने केलेली ही रत्नांची चोरी खूप आधीची गोष्ट असणार. कारण आता अशा फरश्या तयार होत नाहीत, आणि ते बिबबेवाडीतलं घरही बरंच जुनं आहे. त्यांनी नक्कीच एवढ्यात फरश्या बदललेल्या नसणार.

मग माझ्या डोक्यात विचार सुरू झाला की, ह्या चोराला पकडायचा कसा?

मग मला आठवलं की, आजोबा म्हणाले होते चोराला खूप मोठी दाढी होती. आता कोणी मुद्दाम दाढी, छातीवर रेंगाळेपर्यंत वाढवेल का? खासकरून चोर, ज्याला वाटतं, की आपल्याला कोणी ओळखू नये? तो सर्वसामान्यासारखा दिसायचाच प्रयत्न करणार ना? मग माझी खात्री पटली की तो चोर बरीच वर्ष जेलची हवा खाल्लेला असणार. मग मी ठरवलं, आधी येरवडा जेलला फोन करू. तिकडून काही मिळालं नाही, तर इतर मार्ग शोधू…

“पण माझं काम झालं! येरवडा जेलमधून भिकारी उर्फ फरशी चोर उर्फ रघूवीर किष्टेपूरकर उर्फ २००० सालचा कुख्यात ज्वेल थिफ, याची माहिती मिळाली.

त्याकाळी झालं असं, की या रघुवीर किष्टेपूरकराने १९९५ साली एक मोठी चोरी केली. तो आधी गवंडी होता. अत्यंत कुशल. माझा पहिला तर्क चुकीचा होता. तो कारखान्यात काम करायचा नाही. खूप मोठ्या मोठ्या घरांमधे त्याला दुरूस्ती वगैरे कामासाठी बोलवायचे. अशाच एका घरात तो दुरूस्तीसाठी गेला आणि काही माणकं घेऊन आला.

दुर्दैवाने त्या माणकांच्या चोरीबद्दल त्याला शिक्षा झाली नाही. मग त्याने आणखी काही घरांमधून चोरी केली. ज्वेलथिफ म्हणून तो पटकन प्रसिद्ध झाला, पण पकडला नाही गेला. त्या रिलेटेड मी बरेच जुने पेपर वाचले. बरेच महिने, हा ज्वेल थिफ कसा दिसायचा, हे पण कोणाला माहित नव्हतं. त्यामुळे त्याचं गवंडीचं काम पण चालू होतं. त्याच्याकडे चोरीच्या ‘एकसे एक’ भारी कल्पना असायच्या. पण तरी, मला वाटतं, त्याला पकडलं जाण्याची भिती पण होती. त्यामुळं त्याने ही भारी गोष्ट केली असणार. तो एक गवंडी होता. तो एका फरश्यांच्या फ्रॅक्टरीमधून वरच्या वर लॉटने फरश्या विकत घेत असणार. त्याने ही माणकं फॅक्टरीला देऊन, ते माणिक फरश्यांमधे घाला अशी ऑर्डर दिली असणार. विचारलं, तर सांगितलं असेल की, खोटे खडे आहेत, गिऱ्हाईकाने घालून मागितलं आहे. त्या फरश्या मिळाल्यावर, त्याने त्या काही घरांमधे ‘पेरल्या’ असणार. म्हणजे आता तो पकडला गेला, तरी त्याच्या घरून त्या फरश्या कोणाच्या हाती लागणार नव्हत्या. त्या फरश्या कुठं आहेत, त्याचं रेकॉर्डही त्याच्याकडे राहणार होतं. त्या माणकांची गरज भासली, किंवा जेलमधून आल्यावर नंतरच्या आयुष्याची सोय करायची असेल, तर जाऊन फरश्या चोरायच्या. चोरायला सोपं पडावं, म्हणून त्याने ह्या फरश्या, घरांच्या हॉलमधे बसवल्या असणार.

मग एका नेहमीच्या चोरीत बिचारा किरकोळ गोष्टीमुळे पकडला गेला. बाकी सगळा माल जप्त झाला पण पोलिसांना ते माणिक जप्त नाही करता आले. त्याने पोलिसांना सांगितलं की, त्याने त्या माणकांची चोरी केली, पण मग नंतर ते हरवले. बऱ्याच कोर्ट-कचेऱ्यांनंतर, त्याला जन्मठेप झाली. काही कारणास्तव कैद काही वर्ष वाढली.

“जशी त्याची कैद संपली, काही दिवसांपुर्वी, तसं त्याने ठरवलं असणार की, आपले माणिक परत मिळवायचे. त्याने कदाचित माणिक घातलेल्या दहा फरश्या करून घेतल्या असणार. स्पेशल ऑर्डरच्या असल्यामुळे त्यावर १ ते १० आकडे असणार. १ ते ४नंबर फरश्यांचं आपल्याला माहित नाही. पण आधी ५नंबर फरशी त्याने चोरली. मग बिबवेवाडीतली ६ नंबर. आणि मग पाळी होती ७ नंबर फरशीची. जेव्हा त्या बिबवेवाडीतल्या आजोबांनी फरश्यांवरचे आकडे सांगितले, तेव्हाच माझ्या लक्षात आलं की, आता आपल्याकडची ७ नंबर फरशी चोरण्यात येणार.

“पण माझा अंदाज फार लवकर खरा ठरला. मी रघुवीरचा फोटो बघितला असल्याने, मला तो लगेच ओळखू आला आणि त्याला ती फरशी दिसावी आणि तो मोहात पडावा म्हणून मी तुला काल उठवलं. त्याला फरशी दिसली, आनंद झाला, आणि काल रात्रीच तो आला… बाकीचं तुला माहितीये…!”

कपिल दादा कौतुकाने बघतच राहिला. थोड्या वेळाने त्याला वाचा फुटली. “पण तुला ते जुने वृत्तपत्र, ज्वेलथिफचा फोटो वगैरे कधी आणि कसं मिळालं?“

वाघेश दादा मिश्किलपणे हसला आणि म्हणाला, “अर्थातच इंटरनेटवर! काही गोष्टी माझ्या येरवडा जेलमधे काम करणाऱ्या मित्राने पाठवल्या, तर काही मी स्वतः शोधल्या. तू झोपलेला असताना घडलं हे सगळं...!

लगेच कपिल दादा म्हणाला, “अच्छा, म्हणून ते दरवाज्यावर लावलं आहे का, इंटरनेट एक मुलभूत गरज आहे म्हणून?”

दोघंही मनमुराद हसले…

4 comments:

  1. I liked your रहस्य कथा.छान.

    ReplyDelete
  2. शंतनू, मस्तच 👌 फरशी या गोष्टीची चोरी होऊ शकते, ही कल्पनाच मला अफलातून वाटली!

    ReplyDelete