आपल्या जगात खूप सारे देश आहेत. प्रत्येक देशाची भाषा, संस्कृती, इतिहास वेगवेगळा आहे. कायदे वेगवेगळे आहेत. पुर्वी मोजमाप करायची पद्धत सुद्धा वेगवेगळी होती. आता ती ब-यापैकी एकसारखी झाली असली, तरी अजुन बरेच असे देश आहेत जे मोजमाप करण्यासाठी थोडे वेगळे एकक वापरतात.
म्यानमार, लायबेरिया
आणि युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका (यु.एस.ए.) हे जगातले तीनच असे देश आहेत जे इम्पिरियल
मापनपद्धती वापरतात. ह्या पद्धतीत पाऊंड, गॅलन, फूट ही एककं असतात. बाकीचे सगळे देश
मेट्रिक मापनपद्धती वापरतात. ह्या पद्धतीत मीटर, किलोमीटर, ग्रॅम, किलोग्रॅम ही एककं
असतात. ह्या दोन पद्धती जोपर्यंत स्वतंत्रपणे वापरात असतात तोपर्यंत ठीक असतं, पण जेव्हा
ह्या दोन पद्धती एकत्र येतात तेव्हा मात्र खूप भयंकर प्रसंग घडू शकतात. पुर्वी असे
काही प्रसंग घडले आहेत.
१९९९चा प्रसंग. मंगळावर
सोडलेलं ‘मार्स ऑर्बिटर’ हे यान मंगळाच्या वातावरणात शिरताच अक्षरशः जळुन खाक होतं!
काहीशे लाख डॉलर्सचं मिशन वाया जातं. खूप शोधाशोध करून कारण मिळतं की ‘मार्स ऑर्बिटर’
वरचं एक सॉफ्टवेअर फोर्स मोजण्यासाठी इम्पिरिअल पद्धत म्हणजे ‘पाऊंड’ वापरत होतं आणि
एक सॉफ्टवेअर मेट्रिक पद्धत म्हणजे ‘न्यूटन’ वापरत होतं…
कॅनडामधला १९८३ चा
प्रसंग. एअर कॅनडाची एक फ्लाईट हवेत बंद पडते. विमानातलं फ्युएल संपतं. विमानाचं इंधनमापक बंद पडलेलं असतं आणि बाकीच्या ब-याचश्या यंत्रणासुद्धा ठप्प पडलेल्या असतात. त्यावेळी
पायलेट विमान कसंबसं ग्लाइड करून उतरवतात. नंतर चौकशी केल्यावर असं समजतं एअरपोर्टवरच्या
कर्मचार्यांनी विमानात फ्युएल भरताना २२,३०० किलो फ्युएल ऐवजी २२,३०० पाऊंड फ्युएल
भरलेलं असतं. म्हणजे गरजेपेक्षा निम्याहुन कमी. मग विमान हवेत बंद पडणार नाही तर काय
होणार?
आता एक जूना प्रसंग.
१० ऑगस्ट १६२८ चा. स्वीडन तीन वर्ष बांधून तयार केलेलं वॉसा नावाचं नवंकोरं जहाज पाण्यात
सोडतं. ते जहाज जेमतेम मैलभर पुढं जातं आणि उजवीकडे कलून ३० खलाश्यांसकट पाण्यात बुडतं.
त्यावेळी खूप चौकशी होते पण कोणाला शिक्षा होत नाही. नंतर १९६१ साली ते जहाज पाण्याबाहेर
काढलं जातं आणि अत्याधुनिक साधनांनी त्याचं मोजमाप केलं जातं. त्यातनं कळतं की उजव्या बाजूची
जाडी डाव्या बाजूपेक्षा जास्त झाल्यामुळे जहाज बुडतं. पण उजवी बाजू जास्त जाड का होते?
तर जहाज बांधताना त्यावेळी दोन प्रकारच्या पट्ट्या वापरल्या होत्या. एक म्हणजे १२ इंचाच्या
स्विडिश पट्ट्या आणि दुस-या म्हणजे ११ इंचाच्या ॲमस्टरडॅम पट्ट्या!
अशी इतिहासात खूप उदाहरण
आहेत. ही सगळी उदाहरणं आपल्याला एकंच सांगतात, की मापन ही जगातली अतिशय महत्वाची गोष्ट
आहे. थोडंस जरी चूकलं की….
(दि. ११ जुलै आणि १२ जुलै २०१७ च्या दै. लोकसत्तामधे 'कुतूहल' ह्या
सदरात आलेल्या मेघश्री दळवी यांच्या लेखांमधून संदर्भ.)
(दि. ११ जुलै आणि १२ जुलै २०१७ च्या दै. लोकसत्तामधे 'कुतूहल' ह्या
सदरात आलेल्या मेघश्री दळवी यांच्या लेखांमधून संदर्भ.)
No comments:
Post a Comment