Tuesday, 11 July 2017

पट्टी आणि बरंच काही...


रोजच्या वापरात असणा-या काही वस्तुंमधे मोजपट्टीसुद्धा असते, ह्याच मोजपट्टीच्या अवतारांबद्दल थोडं…

मोजायच्या साधनांना 'प्रमापी' साधनं म्हणतात. प्रमापी साधनांमधे दोन प्रकार असतात. एक म्हणजे वाचिक प्रमापी साधनं आणि दुसरा म्हणजे तौलनिक प्रमापी साधनं.

वाचिक प्रमापी साधनं म्हणजे अशी मोजायची साधनं ज्यावर खुणा करून मापं दाखवलेली असतात, उदाहरणार्थ, पट्टी. पट्टीवर सेंटीमीटर, इंच, अशा खुणा असतात. पट्टीचे तीन प्रकार असतात. एक म्हणजे १५० मिलीमिटरची पट्टी, जी कंपास बॉक्समधे असते. दुसरी म्हणजे ३०० मिलिमीटरची पट्टी म्हणजेच फूटपट्टी आणि तिसरी म्हणजे कपड्यांच्या दुकानात असते तशी मीटर पट्टी.

अजून काही वाचिक प्रमापी साधनं असतात. सामान्य माणसांना माहित असेलच असं नाही, पण कुठल्याही मॅन्युफॅक्चरिंग कंपनीत काम करणा-या माणसाला विचारा की व्हर्निअर कॅलिपर म्हणजे काय? तो तोंड भरून माहिती देईल. व्हर्निअर कॅलिपर म्हणजे काय आणि ते कशासाठी वापरतात? तर व्हर्निअर कॅलिपर एक मिलिमीटरपेक्षा कमी अंतर एक्युरेटली मोजतं. ह्याचा उपयोग मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रिमधे मोठ्या प्रमाणावर केला जातो.

चित्रात दाखवल्याप्रमाणं व्हर्निअर कॅलिपरच्या 'मेन स्केल' ला 'अप्पर जॉ' बसवलेला असतो व 'स्लाइडिंग स्केल' ला ' लोअर जॉ' बसवलेला असतो. ह्या 'जॉ' मधे वस्तू ठेऊन स्लाइडिंग स्केल हलवून वस्तू पकडली जाईल असा जॉ सेट करतात आणि मग मोजतात.

मेन स्केलवर मिलिमीटर आणि सेंटीमीटरच्या खुणा असतात व स्लाइडिंग स्केलवर ०.१ किंवा ०.०१ मिलिमीटर किंमतीच्या खुणा असतात. (स्लाइडिंग स्केलवरच्या खुणांमधलं अंतर ०.१ किंवा ०.०१ नसतं, तर खुणांमधल्या अंतराची किंमत ०.१ किंवा ०.०१ असते.) व्हर्निअर कॅलिपरने मोजतात कसं, तर जॉमधे वस्तू पकडल्यानंतर मेन स्केलवर वस्तू किती मिलिमीटरची आहे ते बघतात. उदाहरणार्थ, वस्तू ३ मिलिमीटर पूर्ण आणि ४ मिलिमीटरला थोडी कमी भरत असेल, तर स्लाइडिंग स्केल बघतात. स्लाइडिंग स्केलवरच्या १ ते १० किंवा १ ते १०० लाईन्सपैकी कुठलीही लाईन मेन स्केलवरच्या कुठल्यातरी लाईनशी व्यवस्थित जुळली पाहिजे. चालू उदाहरणातच बघू. तीन मिलिमीटर पूर्ण आणि ४थ्या मिलिमीटरला थोडं कमी असं माप भरतंय. डिटेल्ड माप हवं असेल तर स्लाइडिंग स्केल बघायची. १ ते १० मधली समजा ७ वी लाईन जुळली तर माप होतं ३.७ मिलिमीटर.

ह्याच टेकनिकने व्हर्निअर कॅलिपरच्या 'रिव्हर्स जॉ' ने नळीच्या आतला व्यास मोजता येतो.

असंच अजून एक साधन असतं ते म्हणजे मायक्रोमीटर. चित्रात दाखवल्याप्रमाणे एका सेमिसर्कल चपट्या पट्टीला एक दांडा जोडलेला असतो. त्या दांड्यावर मेन स्केल असते आणि त्याच्यावरच 'रोटेटिंग स्केल' असते. रोटेटिंग स्केलनुसार दांड्यातनं एक पट्टी आत बाहेर होत असते. ती पट्टी पार पुढे सेमिसर्कलच्या दुस-या टोकाला टेकू शकते. काही मोजायचं असेल तर सेमीसर्कलच्या टोकावर वस्तू टेकवायची आणि रोटेटिंग स्केल फिरवून पट्टी त्या वस्तूवर टेकवायची. मायक्रोमीटरच्या मेन स्केलवरनं ०.५० मिलिमीटर अंतर नीट मोजता येतं. त्याहुन कमी अंतर मोजायला रोटेटिंग स्केल लागते. उदाहरणार्थ, मायक्रोमीटरमधे मी एक वस्तू मोजली आणि माप आलं १४.५० मिलिमीटरपेक्षा थोडं जास्त, तर ते थोडं जास्तवालं अंतर रोटेटिंग स्केलवर दिसतं. जर रोटेटिंग स्केल १६ दाखवत असेल, तर १४.५० + ०.१६ असं गणित करतात. फायनल माप येतं १४.६६ मिलिमीटर.

व्हर्निअर कॅलिपर आणि मायक्रोमीटर ही दोन साधनं मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीत खूप महत्वाची साधनं आहेत. त्यामुळेच कंपनीकडनं ह्या साधनांची  खूप काळजी घेतली जाते.

आता तुम्हाला कळालंच असेल की आपल्या पट्टीचे काय-काय अवतार असतात आणि ती किती महत्वाची असते. हे कळायला लागल्यापासून तर मी माझ्या पट्टीला खूप जपायला लागलोय...!

(दि. २८ जून आणि २९ जून २०१७ च्या दै. लोकसत्तामधे 'कुतूहल' ह्या
सदरात आलेल्या सई पगारे - गोखले यांच्या लेखांमधून संदर्भ.)

1 comment: