Friday, 28 July 2017

हायली इम्फ्लेमेबल? पण किती?

कुठल्याही पेट्रोलच्या टॅंकरवर बघा, हमखास लिहिलेलं असतं, “हायली इम्फ्लेमेबल”. माझ्या डोक्यात येतं की हायली इम्फ्लेमेबल म्हणजे नक्की किती? आणि ते कसं मोजतात?

कुठलंही फ्युएल किती इम्फ्लेमेबल आहे हे मोजण्यासाठी त्याचा फ्लॅश पॉइंट काढतात. फ्लॅश पॉइंट म्हणजे काय, तर ज्या कमीत - कमी तापमानात फ्युएल पटकन जळतं ते तापमान म्हणजे फ्लॅश पॉइंट. फ्लॅश पॉइंट जितका कमी, तितकं फ्युएल धोकादायक. फ्लॅश पॉइंट जितका जास्त, तितकं फ्युएल कमी धोकादायक. ह्या फ्लॅश पॉइंटच्या मदतीने फ्युएल्सचं तीन ग्रेड्समधे वर्गीकरण करतात. ज्यांचा फ्लॅश पॉइंट २३ डिग्री सेल्सिअसपेक्षाही कमी असतो त्यांना ‘ए’ ग्रेड फ्युएल्स म्हणतात. ही फ्युएल्स खूप धोकादायक असतात. पेट्रोल आणि नाफ्था ‘ए’ ग्रेडमधे येतात.

ज्यांचा फ्लॅश पॉइंट २३ ते ६५ डिग्री सेल्सिअसमधे असतो, त्यांना ‘बी’ ग्रेड फ्युएल्स म्हणतात. केरोसीन आणि डिझेल ‘बी’ ग्रेडमधे येतात.

ज्यांचा फ्लॅश पॉइंट ६५ ते ९६ डिग्री सेल्सिअसमधे असतो त्यांना ‘सी’ ग्रेड फ्युएल्स म्हणतात. ही फ्युएल्स कमी धोकादायक असतात. फर्नेस ऑईल ‘सी’ ग्रेडमधे येतं.

जास्त फ्लॅश पॉइंट असणारे फ्युएल्स कमी धोकादायक असतात हे खरं, पण जर त्यांच्यात कमी फ्लॅश पॉइंटवाला पदार्थ किंवा फ्युएल मिक्स झालं की त्यांचा सुद्धा फ्लॅश पॉइंट उतरतो. अशा फ्युएल्समुळे खूप भयंकर प्रसंग घडू शकतात. कारण वापरणारे ह्याचा फ्लॅश पॉइंट कमी आहे म्हणुन वापरतात, पण प्रत्यक्षात त्याचा फ्लॅश पॉइंट जास्त झालेला असतो. म्हणुन फ्युएल्सची खूप काळजी घ्यावी लागते…

(संदर्भ- दि. २४ जुलै २०१७च्या दै. लोकसत्तामधल्या 'कुतूहल' 
सदरात आलेला जोसेफ तुस्कानो ह्यांच्या लेखामधुन.)

Friday, 14 July 2017

थोडंस जरी चुकलं की...


आपल्या जगात खूप सारे देश आहेत. प्रत्येक देशाची भाषा, संस्कृती, इतिहास वेगवेगळा आहे. कायदे वेगवेगळे आहेत. पुर्वी मोजमाप करायची पद्धत सुद्धा वेगवेगळी होती. आता ती ब-यापैकी एकसारखी झाली असली, तरी अजुन बरेच असे देश आहेत जे मोजमाप करण्यासाठी थोडे वेगळे एकक वापरतात.

म्यानमार, लायबेरिया आणि युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका (यु.एस.ए.) हे जगातले तीनच असे देश आहेत जे इम्पिरियल मापनपद्धती वापरतात. ह्या पद्धतीत पाऊंड, गॅलन, फूट ही एककं असतात. बाकीचे सगळे देश मेट्रिक मापनपद्धती वापरतात. ह्या पद्धतीत मीटर, किलोमीटर, ग्रॅम, किलोग्रॅम ही एककं असतात. ह्या दोन पद्धती जोपर्यंत स्वतंत्रपणे वापरात असतात तोपर्यंत ठीक असतं, पण जेव्हा ह्या दोन पद्धती एकत्र येतात तेव्हा मात्र खूप भयंकर प्रसंग घडू शकतात. पुर्वी असे काही प्रसंग घडले आहेत. 
१९९९चा प्रसंग. मंगळावर सोडलेलं ‘मार्स ऑर्बिटर’ हे यान मंगळाच्या वातावरणात शिरताच अक्षरशः जळुन खाक होतं! काहीशे लाख डॉलर्सचं मिशन वाया जातं. खूप शोधाशोध करून कारण मिळतं की ‘मार्स ऑर्बिटर’ वरचं एक सॉफ्टवेअर फोर्स मोजण्यासाठी इम्पिरिअल पद्धत म्हणजे ‘पाऊंड’ वापरत होतं आणि एक सॉफ्टवेअर मेट्रिक पद्धत म्हणजे ‘न्यूटन’ वापरत होतं…
कॅनडामधला १९८३ चा प्रसंग. एअर कॅनडाची एक फ्लाईट हवेत बंद पडते. विमानातलं फ्युएल संपतं. विमानाचं इंधनमापक बंद पडलेलं असतं आणि बाकीच्या ब-याचश्या यंत्रणासुद्धा ठप्प पडलेल्या असतात. त्यावेळी पायलेट विमान कसंबसं ग्लाइड करून उतरवतात. नंतर चौकशी केल्यावर असं समजतं एअरपोर्टवरच्या कर्मचार्यांनी विमानात फ्युएल भरताना २२,३०० किलो फ्युएल ऐवजी २२,३०० पाऊंड फ्युएल भरलेलं असतं. म्हणजे गरजेपेक्षा निम्याहुन कमी. मग विमान हवेत बंद पडणार नाही तर काय होणार? 
आता एक जूना प्रसंग. १० ऑगस्ट १६२८ चा. स्वीडन तीन वर्ष बांधून तयार केलेलं वॉसा नावाचं नवंकोरं जहाज पाण्यात सोडतं. ते जहाज जेमतेम मैलभर पुढं जातं आणि उजवीकडे कलून ३० खलाश्यांसकट पाण्यात बुडतं. त्यावेळी खूप चौकशी होते पण कोणाला शिक्षा होत नाही. नंतर १९६१ साली ते जहाज पाण्याबाहेर काढलं जातं आणि अत्याधुनिक साधनांनी त्याचं मोजमाप केलं जातं. त्यातनं कळतं की उजव्या बाची जाडी डाव्या बाजूपेक्षा जास्त झाल्यामुळे जहाज बुडतं. पण उजवी बाजू जास्त जाड का होते? तर जहाज बांधताना त्यावेळी दोन प्रकारच्या पट्ट्या वापरल्या होत्या. एक म्हणजे १२ इंचाच्या स्विडिश पट्ट्या आणि दुस-या म्हणजे ११ इंचाच्या ॲमस्टरडॅम पट्ट्या!
अशी इतिहासात खूप उदाहरण आहेत. ही सगळी उदाहरणं आपल्याला एकंच सांगतात, की मापन ही जगातली अतिशय महत्वाची गोष्ट आहे. थोडंस जरी चूकलं की….

(दि. ११ जुलै आणि १२ जुलै २०१७ च्या दै. लोकसत्ताधे 'कुतूहल' ह्या 
सदरात आलेल्या मेश्री दळवी यांच्या लेखांमून संदर्भ.) 

Tuesday, 11 July 2017

पट्टी आणि बरंच काही...


रोजच्या वापरात असणा-या काही वस्तुंमधे मोजपट्टीसुद्धा असते, ह्याच मोजपट्टीच्या अवतारांबद्दल थोडं…

मोजायच्या साधनांना 'प्रमापी' साधनं म्हणतात. प्रमापी साधनांमधे दोन प्रकार असतात. एक म्हणजे वाचिक प्रमापी साधनं आणि दुसरा म्हणजे तौलनिक प्रमापी साधनं.

वाचिक प्रमापी साधनं म्हणजे अशी मोजायची साधनं ज्यावर खुणा करून मापं दाखवलेली असतात, उदाहरणार्थ, पट्टी. पट्टीवर सेंटीमीटर, इंच, अशा खुणा असतात. पट्टीचे तीन प्रकार असतात. एक म्हणजे १५० मिलीमिटरची पट्टी, जी कंपास बॉक्समधे असते. दुसरी म्हणजे ३०० मिलिमीटरची पट्टी म्हणजेच फूटपट्टी आणि तिसरी म्हणजे कपड्यांच्या दुकानात असते तशी मीटर पट्टी.

अजून काही वाचिक प्रमापी साधनं असतात. सामान्य माणसांना माहित असेलच असं नाही, पण कुठल्याही मॅन्युफॅक्चरिंग कंपनीत काम करणा-या माणसाला विचारा की व्हर्निअर कॅलिपर म्हणजे काय? तो तोंड भरून माहिती देईल. व्हर्निअर कॅलिपर म्हणजे काय आणि ते कशासाठी वापरतात? तर व्हर्निअर कॅलिपर एक मिलिमीटरपेक्षा कमी अंतर एक्युरेटली मोजतं. ह्याचा उपयोग मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रिमधे मोठ्या प्रमाणावर केला जातो.

चित्रात दाखवल्याप्रमाणं व्हर्निअर कॅलिपरच्या 'मेन स्केल' ला 'अप्पर जॉ' बसवलेला असतो व 'स्लाइडिंग स्केल' ला ' लोअर जॉ' बसवलेला असतो. ह्या 'जॉ' मधे वस्तू ठेऊन स्लाइडिंग स्केल हलवून वस्तू पकडली जाईल असा जॉ सेट करतात आणि मग मोजतात.

मेन स्केलवर मिलिमीटर आणि सेंटीमीटरच्या खुणा असतात व स्लाइडिंग स्केलवर ०.१ किंवा ०.०१ मिलिमीटर किंमतीच्या खुणा असतात. (स्लाइडिंग स्केलवरच्या खुणांमधलं अंतर ०.१ किंवा ०.०१ नसतं, तर खुणांमधल्या अंतराची किंमत ०.१ किंवा ०.०१ असते.) व्हर्निअर कॅलिपरने मोजतात कसं, तर जॉमधे वस्तू पकडल्यानंतर मेन स्केलवर वस्तू किती मिलिमीटरची आहे ते बघतात. उदाहरणार्थ, वस्तू ३ मिलिमीटर पूर्ण आणि ४ मिलिमीटरला थोडी कमी भरत असेल, तर स्लाइडिंग स्केल बघतात. स्लाइडिंग स्केलवरच्या १ ते १० किंवा १ ते १०० लाईन्सपैकी कुठलीही लाईन मेन स्केलवरच्या कुठल्यातरी लाईनशी व्यवस्थित जुळली पाहिजे. चालू उदाहरणातच बघू. तीन मिलिमीटर पूर्ण आणि ४थ्या मिलिमीटरला थोडं कमी असं माप भरतंय. डिटेल्ड माप हवं असेल तर स्लाइडिंग स्केल बघायची. १ ते १० मधली समजा ७ वी लाईन जुळली तर माप होतं ३.७ मिलिमीटर.

ह्याच टेकनिकने व्हर्निअर कॅलिपरच्या 'रिव्हर्स जॉ' ने नळीच्या आतला व्यास मोजता येतो.

असंच अजून एक साधन असतं ते म्हणजे मायक्रोमीटर. चित्रात दाखवल्याप्रमाणे एका सेमिसर्कल चपट्या पट्टीला एक दांडा जोडलेला असतो. त्या दांड्यावर मेन स्केल असते आणि त्याच्यावरच 'रोटेटिंग स्केल' असते. रोटेटिंग स्केलनुसार दांड्यातनं एक पट्टी आत बाहेर होत असते. ती पट्टी पार पुढे सेमिसर्कलच्या दुस-या टोकाला टेकू शकते. काही मोजायचं असेल तर सेमीसर्कलच्या टोकावर वस्तू टेकवायची आणि रोटेटिंग स्केल फिरवून पट्टी त्या वस्तूवर टेकवायची. मायक्रोमीटरच्या मेन स्केलवरनं ०.५० मिलिमीटर अंतर नीट मोजता येतं. त्याहुन कमी अंतर मोजायला रोटेटिंग स्केल लागते. उदाहरणार्थ, मायक्रोमीटरमधे मी एक वस्तू मोजली आणि माप आलं १४.५० मिलिमीटरपेक्षा थोडं जास्त, तर ते थोडं जास्तवालं अंतर रोटेटिंग स्केलवर दिसतं. जर रोटेटिंग स्केल १६ दाखवत असेल, तर १४.५० + ०.१६ असं गणित करतात. फायनल माप येतं १४.६६ मिलिमीटर.

व्हर्निअर कॅलिपर आणि मायक्रोमीटर ही दोन साधनं मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीत खूप महत्वाची साधनं आहेत. त्यामुळेच कंपनीकडनं ह्या साधनांची  खूप काळजी घेतली जाते.

आता तुम्हाला कळालंच असेल की आपल्या पट्टीचे काय-काय अवतार असतात आणि ती किती महत्वाची असते. हे कळायला लागल्यापासून तर मी माझ्या पट्टीला खूप जपायला लागलोय...!

(दि. २८ जून आणि २९ जून २०१७ च्या दै. लोकसत्तामधे 'कुतूहल' ह्या
सदरात आलेल्या सई पगारे - गोखले यांच्या लेखांमधून संदर्भ.)