Thursday, 7 May 2020

चमत्कार (स्टॉप मोशन ॲनिमेशन विडियो)



तुम्हाला, पिंगू पेंग्विन, शाव्न द शीप ही कार्टून्स माहिती आहेत? कदाचित तुम्ही ती बघतही असाल. नसेल माहित तर नक्की शोधा. ही कार्टून्स स्टॉप मोशन कार्टून्स आहेत. काही डिजीटल कार्टून्स सोडली, तर सध्या सुद्धा स्टॉप मोशन कार्टून बनवली जातात. अशा कार्टूनमधली प्रत्येक वस्तू हाताने बनवतात. हेच ह्या स्टॉप मोशन ॲनिमेशनचं वैशिष्ट्य आहे. 

तुम्ही तुमच्या वहीत एका कोपऱ्यात चित्र काढून त्यात लहान लहान बदल करून फ्लिप बूक बनवलं असेल ना? 

स्टॉप मोशन हे सुद्धा त्याच एक प्रकारचे अनिमेशन
असते. यात एखाद्या गोष्टीचे वेगवेगळ्या अवस्थेत फोटो काढले जातात आणि त्यांना सलग बघितलं की ती वस्तू हलल्याचा भास होतो. त्याला म्हणतात स्टॉप मोशन! 

स्टॉप मोशन हे कार्टून आणि विडियो बनवायचं सगळ्यांत जुनं तंत्र आहे. सगळ्यांत पहिला विडियो कसा तयार झाला तुम्हाला माहितीये? एका माणसाबरोबर दुसऱ्या एका माणसाने पैज लावली. दुसरा माणूस म्हणत होता की घोडा जोरात पळताना स्वतःचे चारही पाय हवेत उचलतो. पहिला माणूस म्हणाला काय पण काय बोलतो? घोड्याने चारही पाय उचलले तर तो पडणार नाही का? दुसऱ्या माणसाने स्वतःचं म्हणणं पुराव्यासकट दाखवायचं ठरवलं. त्यानुसार, त्याने बारा फोटो काढायचे कॅमेरे ओळीने मांडले, घोडा समोर आला की फोटो काढण्यासाठी माणसं उभी केली आणि घोडा त्या कॅमेऱ्या समोरून पळत नेला. घोडा पळतानाचे बारा फोटो आले आणि घोडा पळताना आपले चारही पाय उचलतो हे त्यातल्या एका फोटोमधून कळालं. तो पैज तर जिंकलाच, पण त्यातून त्याला कळालं की ते बारा फोटो एका नंतर एक पटपट बघितले, तर घोडा पळताना दिसतो! असा विडियोचा शोध लागला. 

आता घोडा जिवंत होता, म्हणून त्याचे हलतानाचे फोटो काढून विडियो बनवता आला. पण निर्जिव वस्तूंचे हलतानाचे विडियो कसे बनवणार? स्टॉप मोशन ॲनिमेशनची पद्धत वापरून कुठलीही निर्जिव वस्तू जिवंत करता येते. खेळायच्या क्लेचे मॉडेल्स, कागदाचे कट-आऊट, कागदावर काढलेली चित्रे, खेळणी, अगदी काहीही. त्यांचे वेगवेगळ्या पोजमधले भरपूर फोटो काढावे लागतात. वस्तू सुरळीतपणे हलताना दिसावी म्हणून तिच्यात छोटे छोटे बदल करून एका पद्धतीने फोटो काढावे लागतात. कष्ट करावे लागतात खूप, पण एन्ड रिझल्ट भन्नाट असतात.

कॉम्प्युटर अनिमेशनमुळे कार्टून्स करणं सोपं झालं, पण त्यात त्याचे स्वतःचे लिमिटेशन आले. त्यामुळे, अजुनही स्टॉप मोशन ॲनिमेशन चालू आहे...

- शंतनु शिंदे
मोब. नंः 7887881031
ईमेल - shantanuspune@gmail.com

No comments:

Post a Comment