नमस्कार,
माझं नाव शंतनु आणि माझ्या वक्तृत्वाचा विषय आहे, आजचा बदलता मिडिया… तर मला असं वाटतं, बदलत्या मिडियाबद्दल बोलण्यापुर्वी इतिहासात काळानुसार मिडिया कसा बदलला आहे हे आधी आपण जाणून घेऊ.
मिडियामधे अनेक पातळ्यांवर खूप वेळा बदल झालेला आहे. एका माणसाला किंवा एका समुहाला अनेक माणसांसमोर व्यक्त होता येणं हे प्रसार माध्यमांचं मूळ तत्व आहे. त्यानुसार मौखिक परंपरा, ही खरंतर जगातलं पहिलं प्रसार माध्यम आहे असं म्हणता येईल. निरनिराळ्या काळी, निरनिराळ्या ठिकाणी, निरनिराळ्या परंपरेत मौखिक परंपरेनं माहिती पोहचवायचं, विचार पोहचवायचं, मनोरंजन करायचं काम वेगवेगळ्या पद्धतीने छानपैकी पार पाडलेलं आहे. आपल्याकडे हेच काम भजन, किर्तन, नाट्यप्रयोग याप्रकारच्या पद्धतींनी पार पाडलं.
मौखिक परंपरेनंतर छापील प्रसार माध्यमांचा, म्हणजेच प्रिंट मिडियाचा शोध लागला. जगातलं सगळ्यात जुनं पुस्तक चीनमधे लिहिलं गेलं असं म्हणतात. त्याकाळी आणि त्याच्या आधीही पुस्तकं असायची आणि ती छापली जात नसून लिहिली जायची. त्यामुळे त्यांचा प्रसार मर्यादित असायचा. ठराविक माणसांकडेच ती असायची आणि जनसामान्यात त्यांचा प्रसार मौखिक परंपरेनं झाला तर व्हायचा. जसा प्रिंटिंग प्रेसचा शोध लागला, तशी वर्तमानपत्रं सुरू झाली. वर्तमानपत्रांमुळं बातम्यांचा पुरावा रहायला लागला, पण साक्षरांनाच वाचता येत असल्यामुळे त्यांचा प्रसार तसा मर्यादितच राहिला. जवळपास शतका – दिड शतकानंतर तंत्रज्ञान अधिक स्वस्त व प्रगत झाल्यावर आणि दळणवळणासाठी आगगाडीचा शोध लागल्यावर वर्तमानपत्रांचा प्रसार वाढला, किंमत उतरली आणि आधिक माणसांना वर्तमानपत्रं मिळायला लागली.
नंतर साधारण दुसऱ्या महायुद्धानंतर, टि.व्ही आणि रेडियो प्रसिद्ध झाले. वाचायला जसं साक्षर असावं लागतं, तसं ऐकायल आणि बघायला असावं लागत नाही. तसंच वाचायला जितका वेळ द्यावा लागतो, तितका वेळ बघायला आणि ऐकायला द्यावा लागत नसल्यामुळे रेडियो आणि टि.व्ही. खूप प्रसिद्ध झाले. महायुद्धात माहिती पोहचवायचं मुख्य काम तर रेडियो आणि टि.व्ही.नेच केलं. त्यानंतरही मनोरंजनासाठी, आणि इतर माहिती पोहचवण्यासाठी बरंच काम ह्या प्रसार माध्यमांनी केलं आणि अजूनही करत आहेत.
मग आलं ते इंटरनेट. आधीच्या प्रसार माध्यमांच्या मर्यादा ह्याने बऱ्यापैकी खोडून काढल्या. भजन, किर्तन किंवा नाट्यप्रयोग एका वेळेस किती जणांसमोर करता येईल ह्याला मर्यादा असतात. तुम्ही त्याचा विडियो बनवून इंटरनेटवर टाका, लाखो माणसं एका वेळेस तो बघू शकतात. सगळी छापील वर्तमानपत्रं सगळीकडेच मिळू शकतील असं नाही, पण इंटरनेटवर तुम्ही कुठलंही वर्तमानपत्रं वाचू शकता. जगातलं कुठलंही रेडियो चॅनल तुम्ही ऐकू शकता आणि कुठलाही टि.व्ही. शो तुम्ही बघू शकता. इंटरनेटने पहिल्यांदा समाजमाध्यम हा प्रकार आणला. त्यामुळे नेहमी जे फक्त बघायचे, ऐकायचे किंवा वाचायचे, त्यांनाही काहीतरी निर्मिती करायची, जगभरात व्यक्त होण्याची संधी मिळाली.
वापरायला सोपं, नवं, आकर्षक, मोठं, काहीतरी वेगळं असं मिळाल्यावर त्याचे वापरकर्ते वाढायला लागले, आणि आधीच नियंत्रण करायला अवघड असणारं हे माध्यम अधिक नियंत्रणाबाहेर जायला लागलं. आजही कुठल्याही शासनाचं इंटरनेटवर पुर्ण नियंत्रण नाहीये. त्यामुळेच इंटरनेटवर फसवणूक, अफवा सर्रास पसरतात. खरंतर सरकारचं पुर्ण नियंत्रण नसणं हे एक चांगलं लक्षणही म्हणता येईल. त्यामुळं बऱ्याच अशा माणसांना व्यक्त होता येतं, ज्यांना रेडियो, टिव्ही, वर्तमानपत्रं अशा ‘सेंसॉर्ड’ माध्यमांतून व्यक्त होता येत नाही.
तर, आपण मागच्या काही शतकांत प्रसार माध्यमांत झालेला बदल बघितला. प्रत्येक बदलातला समान धागा काय? प्रत्येक बदल त्या वेळच्या गरजेनुसार झालेला आहे. त्यामुळं काही गोष्टी सोप्या झाल्या, तर काही गोष्टी अवघडही झाल्या. मौखिक परंपरेने बातमी पसरू शकते, पण ती शेवटपर्यंत एकसारखी राहील ह्याचा भरवसा नाही. छापील प्रसार माध्यमांत बातमी एकसारखी राहते, पण प्रसार फक्त वाचू शकणाऱ्यांतच होतो. रेडियो आणि टि.व्ही. मार्फत प्रसार सगळीकडे होतो, पण त्यालाही प्रसाराच्या काही मर्यादा होत्या. इंटरनेट ह्या सगळ्याच्या पुढे आलंय. अत्यंत सोपं, सगळ्यांसाठी वाचायला, ऐकायला, बघायला कुठंही, काहीही उपलब्ध करणारं असं हे माध्यम अगदी दोषविरहित वाटतं, पण अर्थातच, ह्यातही काही मर्यादा, तोटे आहेत.
आपण काय इंटरनेटच्या सगळ्या फायद्या तोट्यांची चर्चा करणार नाही आहोत. कुठल्याही माध्यमाच्या मर्यादा आणि तोटे – फायदे वापरणाऱ्यावर आधारित असतात. जसं इंटरनेट चांगल्यासाठी वापरता येतं, तसं ते वाईटासाठीही वापरता येतं. जशा चांगल्या बातम्या पसरवता येतात तसंच अफवाही पसरवता येतात. जशा उपयुक्त जाहिराती देता येतात तशा फसव्या जाहिरातीही देता येतात. फसव्या जाहिराती, अफवा ह्या गोष्टी रेडियो, टि.व्ही., वर्तमानपत्रं ह्यात सुद्धा आलेल्या आहेत. पण काळानुसार, ह्या माध्यमांत ह्या गोष्टी आपण कमी करत आलेलो आहोत. वेळेचा जर विचार केला, तर आपण वर्तमानपत्रं आता शतकाहून जास्त काळ वापरतोय. रेडियो टि.व्ही येऊनही ९० ते १०० वर्षं झालीत. त्या तुलनेत इंटरनेट फारच नवं आहे. जसा बाकीच्या माध्यमांवर आपला विश्वास आहे, तसा इंटरनेटवर यायला अजून वेळ लागेल. हा विश्वास आणण्यासाठी शिक्षण हे एक मोठं माध्यम आहे. टिव्ही, रेडियो, वर्तमानपत्रं आल्यावर जशी त्याला पुरक शिक्षण क्षेत्रं आली, तशी क्षेत्रं इंटरनेटसाठीही आली पाहिजेत. प्रसिद्ध झाली पाहिजेत.
भविष्यात अनेक नविन माध्यमं येणारेत. वर्च्युअल रियालिटी, ऑग्युमेंटेड रियालिटी ही माध्यमं अजून तेवढी प्रसिद्ध नसली तरी लवकरच होणार आहेत. बघण्याच्या पद्धती बदलल्या तरी इंटरनेट राहणारच आहे. त्यामुळे पुर्वग्रह न बाळगता आपल्याला पाहिजे तसाच आणि तेव्हाच इंटरनेटचा वापर करायला शिकलं पाहिजे…
- शंतनु शिंदे
Web: http://www.infogelic.com
Email: s@infogelic.com