Thursday, 23 March 2017

खारफुटी


* खारफुटी खूपच वैशिष्ट्यपूर्ण आहेत. जिथं इतर कोणतेच वृक्ष तग धरू शकत नाहीत अशा दलदलीमधे खारफुटी जोमाने वाढते.
* खारफुटी ही काही एक वनस्पती नाही. समुद्राच्या लाटांच्या थेट मा-यापासून सुरक्षित, दलदल असलेल्या, भरती-ओहोटीच्या रेषांदरम्यान वाढणा-या वृक्ष आणि झुडपांच्या समुहाला खारफुटी या नावाने ओळखलं जातं.
* खारफुटी अतिशय कठोर अधिवासात वाढतात. इथं खारं पाणी असतं, पाण्यामधे मोठ्या प्रमाणात गाळ असतो, प्राणवायूदेखील कमी असतो. या असह्य अधिवासात रूजण्याकरिता आणि वाढण्याकरिता खारफुटींची मुळं वैशिष्ट्यपूर्णपणे बदलली आहेत.
* या मुळांद्वारे खारफुटी खा-या पाण्यामधून आणि हवेमधूनसुद्धा प्राणवायू मिळवू शकतात. काही खारफुटींची मूळं सुळ्यांच्या टोकांसारखी जमिनीतून वर वाढतात आणि हवेतील प्राणवायू शोषुन घेतात.
* खारफुटींना समुद्राच्या पाण्यातून अतिप्रमाणात होणा-या मीठ पुरवठ्याचा देखील सामना करावा लागतो. सर्वप्रथम खारफुटी अतिरिक्त क्षार किंवा मीठाला आपल्यामधे येण्यापासूनच रोखतात, मीठ वगळूनच या खारफुटी पाणी आपल्यात घेतात. मात्र, चहूबाजूंनी खा-या असणा-या खारफुटींकडे अनेक युक्त्या असतात. काही खारफुटी मीठ पानांमधे साठवून ठेवतात. जेव्हा ही पानं गळून पडतात तेव्हा हे मीठ देखील झाडापासून वेगळं होत. काही खारफुटींमधे पानाच्या खालच्या बाजूस छोट्या कणांच्या रूपानेही मीठ बाहेर टाकलं जातं.
* दंतमंजनामधे वापरली जाणारी मिसवाक ही खारफुटीशी संलग्न प्रजाती आहे.
* खारफुटींचं किनारपट्टीवरचं अस्तित्व अतिशय महत्वाचं आहे. का? कारण-
~किनारपट्टीवरच्या माणसांच्या वस्त्यांना खारफुटी समुद्री वादळं, चक्रीवादळांपासून संरक्षण करतात.
~भरतीच्या काळात अति प्रमाणात खारं पाणी खाड्यांमधे येण्यापासून रोखतात.
~खारफुटींचं जंगल किना-याची धूप होण्यासही अटकाव करतात.
~कितीतरी माशांच्या प्रजातीच्या चिमुकल्या पिल्लांकरिता खारफुटीचं जंगल एक सुरक्षित आसरा आहे.

(लोकरंग पुरवणी, दै. लोकसत्तामधून).

No comments:

Post a Comment