Thursday, 7 February 2019

संकल्प व्याख्यानमाला : निपूण धर्माधिकारी आणि वैदेही वैद्य यांची मुलाखत

नुकतंच मी एका भन्नाट कार्यक्रमाला जाऊन आलो. ‘संकल्प व्याख्यानमाला’मधली ही मुलाखत होती, रायटर, ॲक्टर, डिरेक्टर निपूण धर्माधिकारी, आणि ‘वुमेन इन स्पोर्ट, इंडिया’च्या फाउंडर, आणि ‘ऑफिशियल फिफा फॅन फोरम’च्या सदस्या वैदेही वैद्य, यांची. खूप सुंदर मुलाखत. त्यांना विचारलेले प्रश्नही छान होते, आणि दोघांनीही दिलेल्या उत्तरांमधून समजत होतं की, ही उत्तरं, भरपूर स्ट्रगल केलेल्या माणसांकडूनच येऊ शकतात.

आता ह्याच प्रश्नाचं बघा. त्यांना विचारण्यात आलं की, आपण जे करतोय त्यात आपलं काही खरं नाहीये, आपण सोडून द्यावं आत्ता जे करतोय ते, आणि जगावं इतरांसारखं, असं वाटतं का? गिव-अप करावंसं वाटतं का?

दोघांची उत्तरं काहीशी कॉन्ट्राडक्ट्री होती. वैदेही ताई म्हणाली की, मला असं रोज वाटतं. तिने ह्याचं कारण असं सांगितलं की, “आपण नॅचरली आपलं कंपॅरिझन इतरांशी करत असतो. ह्याने असं वाटायला लागतं की, आपल्याला आपल्या फिल्डमधून काहीच मिळत नाही. माझ्यासोबत असलेले मित्र वगैरे एकदम सुखात असतात, पैसे कमावत असतात. मग असं वाटतं की, सोडून द्यावं आपलं फिल्ड आणि जगावं इतरांसारखं. पण मग मी स्वतःला सांगते, की पैसे, बंगला वगैरे सगळेच मिळवतात, पण आपल्याला आनंद कशात मिळतोय, समाधान कशात वाटतंय, ते करायचं. मी होप्स कधीच सोडत नाही.”

निपूण दादाने सांगितलं की, “मला फिल्ड सोडावंसं कधी वाटत नाही, पण सोशल मिडियाच सोडून द्यावं असं वाटतं. त्या सोशल मिडियामुळे नेहमी असं वाटत राहतं की सगळ्यांचं सगळं छान चाललं आहे, आणि आपलंच काहीतरी गंडलेलं आहे. खरंतर असं काही नसतं. मला असं वाटतं की सगळं मृगजळ आहे. कधीकधी मला वाटलेलं आहे गिव-अप करावंसं, पण माझ्या मित्रांनी नेहमी मला इन्स्परेशन दिलेलं आहे. मला असं मित्रांपाशी मोकळं व्हावसं वाटतं. मी तसा मोकळा होतो, आणि माझे मित्र मला नेहमी इन्स्पायर करून पुढे घेऊन जातात.”

मी इनोव्हेटिव्ह फिल्ड्समधे काम करणाऱ्या बऱ्याचशा लोकांच्या मुलाखती ऐकल्या आहेत. बहुतेकांना त्यांच्या फिल्डमधे अधिकृतरित्या पाऊल टाकण्यासाठी एक गोष्ट करावी लागते, ती म्हणजे, आई-बाबांना समजावणं, आणि त्यांच्याकडून पुढे जाण्यासाठी परवानगी मिळवणं. ही गोष्ट दोघांनी कशी पार पाडली ह्याबद्दल त्यांना विचारण्यात आलं.

दोघांचं साधारणपणे असं मत होतं की, आई-बाबांना सहाजिकच आपली काळजी असते, आणि म्हणूनच जर आपण निवडलेलं फिल्ड जर मेनस्ट्रिममधलं नसेल, तर ते त्यावर ऑब्जेक्शन घेतात. वैदेही ताईचं असं म्हणणं होतं की, त्यांच्याशी बोला, भांडा… भांडणं, हेही संवाद साधण्याचं एक माध्यम आहे. त्यांना त्यांची मतं बदलण्यासाठी वेळ द्या. त्यांना आपली आवड कशात आहे ते सांगा, पुढचे प्लॅन्स सांगा. आपल्याला आपल्या फिल्डमधे काम करायला जमतंय, डिसीजन्स घ्यायला जमतंय, हे त्यांना समजू द्या. ते आपोआप विश्वास ठेवतील.

निपूण दादाने एक खास गोष्ट सांगितली. ती म्हणजे त्याचा मित्रांनी त्याला कधी वाईट व्यसनं नाही लावली. उलट नेहमी इन्स्परेशन देत राहिले. वाईट संगतींपासून तो कसा लांब राहिला, हे त्याला विचारण्यात आलं. तो म्हणाला की, “मी पॉझिटिव्ह लोकांसोबत राहतो. आपल्या डोक्यात असं भरवलेलं असतं, की ‘सिगारेट पिणारा, दारू पिणारा माणूस खराब’. पण अलिकडेच मला समजलंय, की त्या गोष्टींचा आणि चांगला माणूस असण्याचा काही संबंध नसतो. मी कधीही ‘मोठे व्यसन करतात म्हणून आपण करायचं’ असं केलं नाही. मी पॉझिटिव्ह माणूस बघून मैत्री करतो. नेगिटिव्ह माणसांसोबत माझं जमत नाही. तसंच उगाच ‘उदो उधो’ करणाऱ्या माणसांपासूनही मी लांब राहतो, कारण मला माहितीये त्याने माझी प्रगती खुंटू शकते.”

तुमचे मेंटॉर कोण असा त्यांना प्रश्न विचारण्यात आला.

वैदेही ताई म्हणाली, “तसं बघितलं, तर माझा खरा मेंटॉर म्हणजे माझी आई. ती मला नेहमी जमिनीवर ठेवायचं काम करते. पण अजुन एक सगळ्यात मोठा मेंटॉर म्हणजे चुका. माझ्या मते चुकांमधून माणूस शिकत असतो. त्यामुळे माझं असं मत आहे की, चुका, डिसिजन्स घ्या, ते चुकले तरी घाबरू नका. त्यातून तुम्ही शिकत असतात.”

निपूण दादाने सांगितलं, आणि ते मला खूप आवडलं, ते म्हणजे, “माझे खूप गुरू आहेत, खूप मेंटॉर आहेत. मी ज्यांना भेटलो नाही, पण त्यांचे व्हिडियोज वगैरे बघून मी शिकलोय, त्यांनाही मी गुरू मानतो. एक लक्षात घेतलं पाहिजे की, कोणताही गुरू, आपल्याला असं पकडून तयार नाही करत. आपल्याला तयार व्हावं लागतं.

निपूण दादाला एक प्रश्न विचारण्यात आला की, एक स्वतःचं, वेगळं असं फिल्ड निवडून ‘तिची १७ प्रकरणे’ सारखं नाटक उभं करतना लोकप्रतिसादाबद्दल काय वाटलं होतं? तर त्यावर निपूण दादाने दिलेलं उत्तर मला खूप आवडलं. तो म्हणाला, “लोक काय म्हणतील ही भिती मला आजिबात नाही! मला करायला जे छान वाटेल, ते मी करतो.”

ह्या गोष्टीची क्लिॲरिटी असणं किती महत्वाचं असतं ह्याची जाणीव मला आहे.

नंतरचा प्रश्न दोघांना होता. आवडत्या फिल्ड निवडताना स्वतःत काही बदल करावा लागला का?

दोघांचं एकंदरीत मत होतं की, बदल आपोआप झालाय. वैदेही ताईचं म्हणणं होतं, की ती सिरियस झालीये. निपूण दादाने सांगितलं की तो जरा निवांत झालाय. निवांत अणि सिरियस.

तुम्ही सेटल झालाय का, असं विचारताच त्यांचं उत्तर होतं नाही. दोघं म्हणाले की, त्यांचे गोल्स वाढत आहेत आणि ते वाढत राहतील. वैदेही ताई म्हणाली की, ती एकदा सेटल झाली की तिची वाढ खुंटेल. निपूण दादा म्हणाला की, मी एक गोल पार केलं की लगेच दुसरं दिसायला लागतं…

दोघांच्या बोलण्यातून असं दिसलं की त्यांनी बऱ्यापैकी स्ट्रगल केला आहे. त्यांच बोलणं अगदी तळमळीचं वाटत होतं. निपूण दादाने बोलता बोलता सांगितलं की, जेव्हा त्याचा चार्टर्ड अकौंटन्सीचा कोर्स चालला होता, तेव्हा त्याला सकाळी आठ – साडे आठनंतर तालमीला वेळ नसायचा. मग त्यांच्या ग्रूपची तालीम सकाळी ६ ला चालू व्हायची!

खरंच, पॅशन कसं असावं, हे सांगणारी मुलाखत…