Thursday, 8 March 2018

माझं आवडतं वाहन...

माझी आवडती दुचाकी आहे सायकल. सायकल हे एक कमालीचं वाहन आहे. मला हे वाहन आवडतं कारण ह्या वाहनाने कुठल्याही प्रकारचं प्रदुषण होत नाही. हे एक सगळ्यात सोपं आणि स्वस्त वाहन आहे. ह्याला मेंटेनन्स फार कमी लागतो आणि याच्या नियमित वापराने माणूस अगदी निरोगी राहतो. (थोडक्यात माणसाला सुद्धा याच्या वापरामुळे मेंटेनन्स कमी लागतो…!)

सायकल कुठल्याही प्रकारच्या प्रदेशात चालवता येते. कच्चे रस्ते असो, किंवा डोंगरांमधला खडकाळ चढाचा किंवा उताराचा रस्ता, सायकल कुठल्याही प्रदेशात कुठल्याही अडचणीशिवाय चालते. अगदी वेळ आलीच, तर सायकल हातात घेऊन सुद्धा पुढे होता येतं. सायकलला पार्किंगचा सुद्धा काहीच प्रश्न नसतो. कुठेही कोप-यात उभी केली, लॉक लावलं, की झालं काम…!

सायकल एक खूप जुनं वाहन आहे. सगळ्यात पहिल्यांदा सायकलचा शोध १८३९साली स्कॉटलंडमधे लागला. स्कॉटिश लोहार क्रिकपॅट्रिक मॅकमिलन यांनी पेडल असणा-या सायकलीचा शोध लावला. याच्या आधी जर्मनीत १८१३ साली कार्ल वॉन ड्राईस यांनी ‘द ड्राईसिंना’ (The Draisienne) चा शोध लावला होता ज्याला पुढंच चाक वळवता येत होतं पण पेडल्स नव्हते.

पुढे १८६३ साली फ्रेंच लोहार पिअर मिशॉ (Pierre Michaux) यांनी ‘विलोसिपेड बाईक’ विकसित केली. ‘विलोसिपेड बाईक’ म्हणजे पुढच्या चाकाला पेडल असणारी जुन्या प्रकारची बाईक. ह्या बाईक पॅरिसमधे इतक्या प्रसिद्ध झाल्या, की त्यांना “बोनशेकर” असं टोपणनाव पडलं.

१८७१ साली जेम्स स्टारले या इंग्रजी संशोधकाने जगातली पहिली ‘पेनी-फार्थिंग बायसिकल’ निर्माण केली. ह्या सायकलला ब्रिटिश नाण्यावरनं नाव दिलं गेलं आहे. या सायकलींचं पुढचं चाक पुढचं चाक खूप मोठं असतं. याच सायकलवरून १८८४ ते १८८७ या कालावधीत थॉमस स्टेवेन्स यांनी पूर्ण जगाला प्रदक्षिणा पूर्ण केली.

पुढे १८८५ साली जॉन केम्प स्टार्ले यांनी ‘रोवर सेफ्टी बायसिकल’ तयार केली. ह्या सायकलचं वैशिष्ट्य असं, की सद्ध्याच्या सायकल्ससारखं पहिल्यांदाच ह्या सायकल्सचे पेडल्स मागच्या चाकाला चेन आणि गिअर्सच्या मदतीने जोडलेले होते.

१९६० च्या दशकात हॅन्डल्स खाली केलेल्या, अरूंद टायर्सच्या आणि अनेक गिअर्स असणा-या ‘रेसिंग बाईक’ प्रसिद्ध झाल्या. हॅन्डल्स खाली केल्यामुळे चालवण्या-याचा सगळा जोर पॅडल्सवर पडतो. अरूंद टायर्समुळे चालवणा-याला एअर रजिस्टन्स कमी जाणवतो आणि मल्टिपल गिअर्समुळे एफोर्टलेस सायकलिंग करता येतं.

नंतर १९७० च्या दशकात ‘बिएमेक्स बाईक्स’ आल्या. बिएमेक्स (BMX) म्हणजे ‘बायसिकल मोटो क्रॉस’. नंतर कॅलिफोर्नियामधे ‘माऊंटन बाईक्स’ चा शोध लागला. ह्या सायकलींना पुर्वी ‘क्लंकर्स’ म्हणायचे.

ह्यानंतर आजपर्यंत सायकलींमधे विविध बदल होत आहेत.

१८९० च्या दशकाच्या मध्यावर तर इतके लोक सायकलच्या डिझाइनमधे बदल करायला लागले आणि पेटंट घ्यायला लागले की अमेरिकेने दोन पेटंट ऑफिस काढले. एक फक्त सायकलींसाठी आणि दुसरं इतर गोष्टींसाठी!

सायकलचे खूप प्रकार असतात. माऊंटन बाईक, रेसिंग बाईक, बिएमेक्स (BMX) बाईक, इत्यादी. ह्यातल्या काही सायकली अनेक गिअर्सच्या, मल्टिपल गिअर्सच्या, तर काही साध्या, सिंगल गिअर्सच्या असतात. मल्टिपल गिअर्सची सायकल चढावर, म्हणजेच डोंगरावर वगैरे, किंवा रेसिंगसाठी उपयोगी पडते.

मला सायकलची एक गोष्ट खूप आवडते. ती म्हणजे सायकल खूप सा-या व्यवसायांसाठी, उद्योगांसाठी वापरतात. आज पण रस्त्यावर पेरू विकणारे, चहा, पाणीपूरी, भेळ, कुल्फी, इत्यादी विकणारे सायकल वापरतात. रद्दीवाले रद्दी विकत घ्यायला, आणि भंगारवाले तेलाचे डबे वगैरे विकत घ्यायला सायकलवरनं येतात. सु-यांना, कात्र्यांना धार करणारे सुद्धा सायकल वापरतात. भारतात काही ठिकाणी सायकल रिक्षा सुद्धा आढळतात. काही देशांमधे ‘अर्जंट डिलिवरी’ द्यायची असेल, तर सायकल वापरतात. सायकल ट्रॅफिक चुकवू शकत असल्याने ‘अर्जंट डिलिवरी’ ला सायकल सोयीची पडते. पोलीस सुद्धा कुठे गुपचूप आणि पटकन जायचं असेल तर सायकल वापरतात. काही जणं बाहेरगावी जाताना सुद्धा स्वताःची सायकल घेऊन जातात. त्यासाठी खास फोल्डेबल सायकल बनवल्या जातात. म्हणजे बस प्रवास, ट्रेन प्रवास करताना सायकल फोल्ड करून स्वताःबरोबर नेता येते.

सायकलवर फार खर्च करावा लागत नाही. त्यामुळे जे छोट्या प्रमाणावर व्यवसाय करणारे आहेत, त्यांना सायकल वापरणं सोयीचं पडतं. काही बिघाड झाला तरी घरच्या घरी दुरूस्त करता येतं, आणि बाहेरून दुरूस्त करून घ्यायची वेळ आलीच, तर फार पैसे लागत नाहीत. अजून एक सायकलचं वैशिष्ट्य असं की कुठल्याही वयाच्या माणसाला सायकल चालवता येते. सायकलला कुठलही एजलिमिट नाही. त्यामुळे प्रत्येकाला सायकल चालवायचा आनंद घेता येतो. लहानपणी आई-बाबांनी पहिल्यांदाच सायकल घेऊन कुठं बाहेर जाण्याची परवानगी दिली की होणारा आनंद सुद्धा सायकलीमुळेच होतो.

पण सध्या सायकल रस्त्यावर चालवायला अडचण व्हायला लागली आहे. रस्त्यावर इतर वाहनांची गर्दी वढायला लागल्यामुळे सायकल नीट चालवता येत नाही. रस्ता मोठा असला तरी गर्दीमुळे अवस्था वाईट अरूंद असला तर आणखी वाईट. ब-याच रस्त्यावर सायकल ट्रॅक नसतात आणि काही रस्त्यावर सायकल ट्रॅक असले तरी सलग नसतात. सलग असले तर इतर गाड्या त्याला ‘सर्विस रोड’ म्हणून वापरतात. त्यावर पार्किंग होतं, अतिक्रमण होतं. त्यामुळे सायकल नीट चालवता येत नाही. म्हणून मला असं वाटतं, की जिथं शक्य होईल तिथं सायकल ट्रॅक बांधावेत. नियम करून इतर गाड्या सायकल ट्रॅकवर येणार नाहीत याची काळजी घ्यावी. आणि नियम करूनही इतर गाड्या सायकल ट्रॅकवर येतच असतील, तर मनुष्यबळ आणि तंत्रज्ञानाचा वापर करून सायकल ट्रॅक सायकलींसाठी मोकळा ठेवला पाहिजे. आणि एकदा सायकल ट्रॅक व्यवस्थित झाले, की सायकल वापरणा-यांची संख्या वाढेल याची मला खात्री आहे…


-शंतनु शिंदे
इ-मेलः shantanuspune@gmail.com