Sunday, 3 September 2017

कोड लँग्वेज

नरफमस्कार!

तुम्ही म्हणाल की ही कुठली भाषा? तर ही ‘रफ’ ची भाषा. ‘रफ’ ची भाषा ‘कोड लँग्वेज’ म्हणून वापरली जाते. ही केवळ मराठीतच वापरतात. ही भाषा बोलणं अतिशय सोपं आहे. कुठल्याही शब्दाच्या पहिल्या अक्षराचे अवयव ‘रफ’ मधल्या ‘फ’ ला लावायचे. उदाहरणार्थ, ‘कुठल्याही’ या शब्दाचं ‘रफ’ च्या भाषेत रूपांतर होणार, ‘करफुठल्याही’! असं सगळ्या शब्दांचं करता येतं. ह्याचा थोडा सराव केला की ही भाषा न अडखळता बोलता येते. ही भाषा बोलून दुस-याला गंडवण्यात मजा काही औरच!

अशीच अजून एक भाषा आहे ती म्हणजे ‘च’ ची भाषा. ही भाषा थोडीशी अवघड आहे. शब्दातलं पहिलं अक्षर त्याच्या अवयवांसकट शब्दाच्या शेवटी टाकायचं आणि त्या अक्षराच्या जागी ‘च’ लावायचा. पहिल्या अक्षराला जर अनुस्वार असेल तर तो शब्दाच्या शेवटी उच्चारता येत नाही म्हणून ‘च’ ला लावायचा. उदाहरणार्थ, ‘बावळट’ हा शब्द ‘च’ च्या भाषेत ‘चवळटबा’ होईल, आणि ‘नंतर’ हा शब्द ‘चंतरन’ होईल.

अश्या ‘कोड लँग्वेजेस’ तयार सुद्धा करता येतात. ‘रफ’ च्या जागी दुसरी दोन अक्षरं लावायची. टेकनिक सेम फक्त अक्षरं बदलयची. ह्या अश्या ‘कोड लँग्वेज’ बोलायला खूप मजा येते. करून आणि बोलून बघाच ह्या ‘कोड लँग्वेज’…

तरफुर्त बरफाय बरफाय…!

-शंतनु शिंदे
shantanuspune@gmail.com