Tuesday, 13 June 2017

ॲस्ट्रोनाईटमधे आलेला अनुभव...

२० मे २०१७ला मी 'ॲस्ट्रोनाईट' ह्या कार्यक्रमासाठी 'पराशर ॲग्रीटूरिझम' ह्या ठिकाणी गेलो होतो. 'ॲट्रोनाईट' हा कार्यक्रम 'ॲस्ट्रोन' ही संस्था ऑर्गनाईज करते. हा कार्यक्रम ओवरनाईट असतो कारण ह्या कार्यक्रमात प्लॅनेट्स दाखवतात, स्टारगेझिंग असतं, तसंच स्टारक्लस्टर, मिल्की वे, डबल स्टार ह्या फारश्या कोणाला माहित नसलेल्या गोष्टी सुध्दा दाखवतात. दुसरी गोष्ट म्हणजे, ह्या सगळ्या गोष्टी नुसत्या डोळ्यांना दिसण्यासाठी, म्हणजे ग्रह व्यवस्थित बघण्यासाठी टेलिस्कोप वापरावा लागतोच,  पण नक्षत्र आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे 'मिल्की वे' ही आकाशगंगा जर पुण्यात राहुन बघायची असेल तर पुण्यापासून निदान १०० कि. मी. लांब जावं लागतं. नाहीतर शहरातल्या 'लाईट पोल्यूशन'मुळे नीट बघता येत नाही. म्हणून 'ॲस्ट्रोनाईट हा कार्यक्रम 'पराशर ॲग्रीटूरिझम' येथे ऑर्गनाईज केला होता.

आम्हाला तिथं पोचल्या-पोचल्या ज्यूपिटर बघायला मिळाला. मग आम्हाला श्वेता कुलकर्णी आणि निमिश आगे ह्यांनी प्रेझेंटेशन दिलं. त्यामधे पहिल्यांदा संस्थेची माहिती दिली. मग प्रमुख खगोलशास्त्रज्ज्ञ आणि पुर्वीचे पृथ्वीबद्दलचे आणि एकूणच सोलार सिस्टिमबद्दलचे गैरसमज ह्या विषयावर त्यांनी माहिती दिली. मग नंतर गॅलेक्सी म्हणजे काय, आपली सोलार सिस्टिम गॅलेक्सीत कुठं आहे, आणि आपली पृथ्वी पूर्ण युनिवर्सचा किती छोटा पार्ट आहे, हे श्वेताताईने नीट समजावून सांगितलं. मग निमिषदादाने प्रत्येक ग्रह पृथ्वी समोर ठेवला, तर केवढा दिसेल याची इमेज, आणि प्रत्येक ग्रह पृथ्वी पासून चंद्र जितका लांब आहे तितक्या अंतरावर आणून ठेवला तर केवढा दिसेल याची ईमेज, असं दाखवलं.

मग आम्ही सगळे स्टारगेझिंगला बाहेर गेलो. श्वेताताईने खूप सारे नक्षत्र दाखवले. स्कॉर्पिओन नक्षत्र दाखवलं, डॉल्फिन, किटल, समर ट्रॅन्गल, आणि हर्क्युलस हे प्रसिध्द आणि स्पॉट करायला आवघड असं नक्षत्र सुध्दा श्वेताताईने दाखवलं. ध्रूवतारा कसा ओळ्खायचा ते सांगितलं.

मग आम्ही स्टारक्लस्टर बघितले. स्टारक्लस्टर म्हणजे काय? तर नेब्यूला ( ज्यातनं तारे जन्माला येतात ) मधला गॅस जेव्हा संपतो, तेव्हा त्यातनं जन्माला आलेले 'तरूण' तारे तिथेच जवळ-जवळ राहतात. त्यालाच स्टारक्लस्टर म्हणतात. नुसत्या डोळ्यांना स्टारक्लस्टर नीट दिसत नाहीत, पण टेलिस्कोपमधून प्रत्येक तारा नीट दिसतो. मग आम्ही काही ग्रह बघितले. पहिले शनि बघितला. शनिच्या कडा आणि त्याचे चंद्र सुध्दा दिसले. टेलिस्कोपमधून शनि व्यवस्थित दिसत होता, पण तसा छोटाच दिसत होता. प्रत्यक्षात शनि एवढा मोठा असतो, की त्याच्या रिंगच्या विड्थमधे ७ पृथ्वी बसतात. म्हणजे शनि आपल्यापासून किती लांब असतो हे फक्त इमॅजिन करावं...

मग आम्ही व्हिनस बघितला.  चंद्राची जशी कोर असते अगदी तशीच शुक्राची सुध्दा कोर असते हे मला त्या दिवशीच कळालं. मग आम्ही चंद्र बघितला. चंद्रावरचे खूप डिटेल्स बघायला मिळाले.

मग आम्ही डबल स्टार बघितला. डबल स्टार म्हणजे काय, तर दोन असे स्टार जे एकमेकांच्या खूप जवळ असतात. त्यातला एक ब्यू असतो तर एक रेड असतो.

हे सगळं बघायला खूप छान वाटलं. खूप नविन गोष्टी बघायला मिळाल्या. जागा तर खूप छान होती.